अरे व्वा! आज तू मला सरप्राइज द्यायचं ठरवलं होतंस तर. तशी थोडी कुणकुण लागली होतीच मला. बरं…एक मिनिट.. हे पत्र कुणी कुणाला लिहिलंय ते तरी सांगू की नको आधी. इतके दिवस मी लिहिलेली पत्र वाचली जात होती. आज तुझं पत्र वाचून दाखवणार आहे मी. तू.. तुझं… म्हटल्यावर कसं कळणार बरं. तर हे पत्र म्हणजे मी लिहिलेल्या पहिल्या पत्राला आलेलं उत्तर आहे. हो.. माझ्या मनाला जे मी पत्र लिहिलं होतं त्या पत्राला मनाने दिलेलं हे उत्तर आहे. आहे ना मजेची बात!
प्रिय…
मला माहित आहे की, तू ही जी पत्रं माझ्या सोबतीने लिहिलीस ती उत्तर येईल या अपेक्षेने मुळीच लिहिली नव्हतीस. पण म्हटलं आता हे शेवटचं पत्र… तुला सरप्राइज द्यावं. मला आठवतंय, पहिलं पत्र लिहून तू मला खरंतर सरप्राइज देणार होतीस. पण मला आधीच कळल्यामुळे तेव्हा तुझा हिरमोड झाला होता ना? आता माझंही तेच झालंय गं. तू आणि मी वेगळे राहू शकतो का? एकमेकांपासून काही लपवू शकतो का? तुलाही कळलं होतं ना हे?
तुला कबूल केल्याप्रमाणे तुझ्या पत्रं लिखाणात मी लुडबुड केली बरं. तू खुश आहेस ते कळतंय मला आणि आता हा अध्याय संपणार म्हणून थोडं वाईटही वाटतंय ते ही कळतंय. पण वाईट का वाटून घ्यायचं? यापुढेही तू लिहू शकतेस की. मी काही फक्त या अध्यायापुरती मदत करायचं कबूल केलं नव्हतं.. लक्षात आहे ना? तू जे जे काय करशील त्याला माझी साथ कायमच असेल गं.
तू मला लिहिलेल्या पत्रात विचारलं होतंस ना की मनालाही मन असतं का… एखादी गोष्ट करावी हे सुचतं कसं…वगैरे वगैरे. त्या पत्रात म्हणाली होतीस तसं हे प्रश्न आपण ऑप्शनलाच टाकूया. आणि काय गं…मला हळवं काय म्हणालीस, मूडी काय म्हणालीस. पण मला काय वाटतं सांगू… आम्हालाही वय असेल का? वयाचा एक टप्पा येतो असा की तेव्हा हळवेपण ठळक होत असेल. काय जाणे…असे बरेच प्रश्न आहेत जे ऑप्शनला टाकायला लागतील किंवा मग मनाचा नीट अभ्यास करतेस का बघ. नाहीतरी म्हणत होतीसच ना त्या पत्रात की, माझ्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी करायला तुला सुचत असतं म्हणून. अभ्यास करतेस का विचारलं खरं पण कितपत शक्य होईल गं ते? हल्ली तर काहीजण आमचं अस्तित्वच नाकारायला लागलेत. पण मला ती तुमच्या बहिणाबाईंची कविता फार आवडते बघ. किती छान ओळखलं आहे त्यांनी आम्हाला. मनातल्या मनात नको, आज मोठ्याने म्हणतेस का ती कविता माझ्यासाठी? मला नीट ऐकता येईल म्हणजे. त्यापेक्षा थांब…या पत्रातूनच ती कविता तुझ्या माझ्यापर्यंत पोहोचवली तर…
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥
बाकी त्या पत्रात माझ्याबद्दल जे म्हणत होतीस तसं काही फक्त मीच नाहीये गं. सगळ्यांची मनं थोडीफार तशीच. आता आणखी किती काय काय म्हणशील मला? पण काहीही झालं तरी मला खात्री आहे की, तुझं माझ्या अस्तित्वाबद्दलचं मत बदलणार नाही. पहिल्या आणि शेवटच्या श्वासामधलं अंतर आपल्याला दोघांना मिळूनच तर पार पाडायचं आहे. हा… कधी कधी आपल्यात रुसवे फुगवे झाले तरी आपण एकमेकांना सोडून तर नक्कीच जाणार नाही. असं जरी असलं तरी तुला जसं कधी कधी एकटं रहायला आवडतं म्हणालीस तसं मलाही आवडतं बरं. नको वाटते कुठलीच लुडबुड. आता यापुढे तुला कधी एकटं रहावं वाटलं तर माझ्या कप्प्याची दारं बंद करून घेत जा…बघ जमतंय का. आणि हो एक गोष्ट परत लक्षात ठेव…बट्टी तर आपली कायमच आहे. त्यामुळं जर पुढं कधी मला पत्र लिहिलंस तर ही काळजी व्यक्त करू नकोस. बाकी उत्साहाबद्दल म्हणशील तर आपण दोघंही वाचनात, लिखाणात, पानाफुलात आणि इतरही अनेक गोष्टीत जीव रमवूया म्हणजे मरगळ कधी यायची नाही. मोगऱ्याच्या, चाफ्याच्या गंधासारखं दरवळत राहूया. हा दरवळच आपल्याला कायम फ्रेश ठेवेल. काय वाटतंय तुला?
बरं आता ह्या जाहीर गप्पा बास करूया. उरलेल्या गप्पा हात इतर कामात गुंतलेले असतील तेव्हा होतीलच…आपल्या आपल्यात. त्याच गप्पांच्या प्रतिक्षेत आहे आता मी. चला लागूया कामाला.
जिथे तू तिथे मी…..
- जस्मिन जोगळेकर