Eat, pray, love

युवा विवेक    16-Oct-2021   
Total Views |
बीटविन द लाइन्स

eat pray and love_1 
पुस्तकाचे नाव : Eat, pray, love
पृष्ठसंख्या: ३५२
लेखिकेचे नाव : एलिजाबेथ गिलबर्ट
आपण जन्माला येतो, जगतो आणि मरतो; पण आपण कसे जगतो यामुळे एक आयुष्य, एक व्यक्ती ही दुसर्‍यांपेक्षा वेगळी होत जाते. काही किंवा किंबहुना सगळेच जण समाजाने ठरवून दिलेल्या 'टू-डू लिस्ट'वर टिक करत म्हणजेच शिक्षण, लग्न, संसार, मुले इत्यादी गोष्टी करत चाकोरीबद्ध; पण यशस्वी आयुष्य जगतात. आत्मशोध, 'आपल्याला नक्की काय हवेय ,' असे विचार त्यांच्या मनाला शिवत नाहीत किंवा ते तसल्या विचारांना फार महत्त्व देत नाहीत, परंतु काही जणांसाठी ह्या सगळ्याचा विचार न करता जगणे हे अवघड होत जाते, त्यांची घुसमट व्हायला लागते, आपल्याला नक्की काय हवंय हे कळले नाही, तरी जे चालू आहे ते नकोसे आहे याची जाणीव दिवसेंदिवस वाढत जाते आणि मग चाकोरी सोडून आत्मशोधाचा, आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करावासा वाटतो. Elizabeth Gilbert या लेखिकेने लिहिलेली Eat Pray Love ही कादंबरी तिच्या आत्मशोधाचे, त्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे आणि प्रवासाचे अत्यंत प्रामाणिक आणि काहीसे अघळपघळ वर्णन आहे.
एलिझाबेथ अमेरिकेत आपल्या नवर्‍याबरोबर राहणारी, प्रवासवर्णनं लिहिणारी एक लेखिका; पण तिला तिचा नवरा, संसार हे नकोसे झाले आहे आणि या सर्वांचा परिणाम म्हणुन झालेला घटस्फोट तिचे आयुष्य डळमळीत करतो. यातून बाहेर येण्यासाठी केलेल्या एक प्रेमप्रकरणात अयशस्वी झाल्यामुळे ती नैराश्याने ग्रासली जाते आणि अखेर ती या सगळ्या पासून दूर, वर्षभर प्रवासाचा, एकटे फिरण्याचा, नवीन काही शिकण्याचा निर्णय घेते आणि मानसिक स्थिती सुधारण्यासाठी आध्यात्मिक मार्गाचाही अवलंब करते. इटली, भारत आणि बाली ह्या तीन ठिकाणी राहण्याचा निर्णय घेते. जपमाळेत ज्याप्रमाणे १०८ रुद्राक्षमणी असतात, त्याप्रमाणे ही कादंबरी प्रत्येक देशात ३६, ह्याप्रमाणे १०८ छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विभागलेली आहे. ह्या छोट्याछोट्या गोष्टीतून, दुःख, अपराधीपणा मागे टाकून आनंदाच्या मार्गावर टाकलेल्या प्रत्येक पावलातून कादंबरी उलगडत जाते.
भाग १: इटली
इटालियन भाषा शिकण्याची फार जुनी इच्छा पूर्ण करण्यासाठी एलिझाबेथ आपल्या प्रवासाची सुरवात इटलीपासून करते. तिच्या चार महिन्यांच्या इटलीच्या वास्तव्यात अनेक नवे मित्र-मैत्रिणी जोडते, अत्यंत रूचकर अशा इटालियन पदार्थाचा आस्वाद घेत घेत, सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकते ती म्हणजे "bel far niente". ही एक फार गोड इटालियन टर्म आहे, जिचा अर्थ "pleasure of doing nothing." फार गमतीदार पण तितकीच अर्थपूर्ण टर्म आहे. काहीच न करता मिळणारा आनंद, काहीही न करण्यातला आनंद.. नुसत्या असण्याचा आनंद... असे काही असते का..? मुळात आनंदाची व्याख्या काय असते...?लौकिक समाजात आनंदाच्या बहुतांशी कल्पना ह्या काहीतरी साध्य करण्याशी निगडित आहेत.. मग ते परीक्षेतील मार्क्स, नोकरी, पैसे, प्रसिद्धी, नवरा, मूल.. अगदी काहीही.. पण काहीतरी काम, कष्ट करून एखादी गोष्ट न मिळवल्याशिवाय आपण आनंदी राहू शकतो का..gulite free pleasure, आनंदासाठी आनंद, चार महिने इटलीत नुसते फिरायचे..?. कसली ही थेरं..! जबाबदारीची काही जाणीव..? भविष्याचे काय....? असले काहीही मनात न आणता.. फक्त येणार्‍या दिवसात खास काहीही न करता आनंद शोधायचा... अमेरिकी संस्कृतीप्रमाणे 2 दिवसांच्या वीकेंडच्या मजेसाठी पाच दिवस मरमर करण्याऱ्या एलिझाबेथला हे इटालियन तत्त्वज्ञान आत्मसात करायला थोडा वेळ लागतो; पण एकदा ते जमल्यावर आपले सगळे नैराश्य मागे टाकून ती आनंद बघायला, शोधायला आणि जगायला शिकते. ज्याला अजून एक तशीच सुंदर इटालियन टर्म आहे.." l'arte d'arrangiarsi" ... Art of making something special out of nothing. इटली म्हणजे प्रेक्षणीय स्थळे, museums, रोम, आल्पस् पर्वत,etc.. पण ह्यातले काहीही न करता नुसती इटालियन भाषा शिकून ती आपले इटालियन वास्तव्य मजेत सार्थकी लावते.... अर्थात आनंदात जगण्यासाठी फार काही विशेष करावे लागत नाही.. हे आत्मसात करूनच..
भाग २ : भारत
एलिजाबेथच्या एक भारतीय आध्यात्मिक गुरूमाता आहेत आणि इटलीनंतरचे 4 महिने ती भारतात, त्या गुरूंच्या आश्रमात घालवते. योग, वेदांत, विपश्यना आदी विविध आत्मशोधाच्या मार्गांचा उहापोह ह्या भागात केला आहे. तिची आश्रमातील दिनचर्या ही आधीच्या चार महिन्यांतल्या मजेपेक्षा फार वेगळी आणि शिस्तबद्ध आहे. अर्थातच तिला ध्यानधारणा, मन एकाग्र करणे या गोष्टी जमायला फार त्रास व्हायला लागतो. मन स्थिर करणे ही किती अवघड गोष्ट आहे ह्याची जाणीव तिला होऊ लागते आणि मग सुरू होतो तिचा अजून एक प्रयत्न, आत्मज्ञानासाठी!
ध्यानधारणा आणि प्रार्थना ही योगाभ्यासाची दोन अंगे, दोन्ही प्रकारांत संवाद अपेक्षित असला तरी, प्रार्थना म्हणजे देवाला मनातील गोष्ट सांगणे, आणि ध्यान म्हणजे ऐकणे, दुसरे अर्थातच कठीण. सुख, दुःख, भूत, भविष्य, कल्पना, विचार, भावना, वेदना, भीती, उत्सुकता, नाती अशा असंख्य फांद्यांवर उड्या मारणाऱ्या मनाला एका ठिकाणी सतत बसवणे हे महा कर्मकठीण. आपण घटस्फोट नवर्‍यावर लादला आहे ह्या समजुतीने एक अपराधीपणाची भावना सतत तिच्या मनाला पोखरत असते. असे म्हणतात की मानवी नातेसंबंधांमध्ये बेबनाव होण्याची फक्त दोन कारणे असतात. फक्त दोन प्रश्न.. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? आणि आपल्या दोघांमध्ये वरचढ कोण? वर्चस्व कोणाचे...? हे दोनच मुद्दे जगातल्या बर्‍याच प्रश्नांचे, दुःखाचे, त्रासाचे मूळ आहेत. यावर एकच उपाय.. निरपेक्ष प्रेम, समर्पण आणि स्वीकृती. स्वतः च्या भावना, चुका, अपराध, दुसर्‍याच्या चुका, सगळेसगळे न झगडता स्वीकारायचे आणि प्रेमाने जिंकायचे.. आपल्याच मनाला!
अथक प्रयत्न करून ध्यानमग्न होण्यात एलिझाबेथ देवाकडे, स्वतःकडे जायचा एक मार्ग घडवते, मनातल्या अपराधीपणाला, दुःखाला दूर लोटते. आपण आपल्या विचारांसारखे असतो ह्या उक्तीनुसार स्वतः मध्ये बदल घडवून आणल्यावर खरी एलिझाबेथ कोणती..असे वाटायला लागते.. लग्न, संसार, मौज-मजा करणारी की असे ध्यान लावून बसणारी.. आता परत आपण त्या प्रेम, लग्नाच्या रूळलेल्या वाटेने जायचे की हे सगळे सोडून ध्यान, चिंतन, मनन करत रहायचे.. ह्या दोन्ही टोकांमध्ये सुवर्णमध्य कसा गाठायचा.. ह्याचे उत्तर तिला मिळते तिच्या तिसर्‍या आणि शेवटाच्या स्थानामध्ये म्हणजेच बाली येथे..!
भाग ३ : बाली
बाली, भारताच्या पूर्व किनाऱ्यापासून दूर, इंडोनेशिया या देशामधील एक छोटे बेट. हिंदू संस्कृती आणि चालीरीतींचा पगडा असणारे.. बालीला येऊन राहण्यामागे एक खास असे कारण असते. काही वर्षांपूर्वी कामा निमित्त बालीला गेलेली असताना एलिझाबेथला एक ज्योतिषी आणि वैद्य (त्याचे नाव ketut) भेटलेला असतो, ज्याने तिच्या तेव्हाच्या आयुष्यातले प्रश्न, उदा. तिचे कौटुंबिक, आर्थिक प्रश्न अचूक वर्तवलेले असतात आणि तिला असेही सांगितले असते की ती पुन्हा बालीला येणार. तोच धागा मनात ठेवून, परत त्याचा माग काढण्यासाठी ती येथे परत येऊन पोचते. इटली मध्ये शिकलेले "bel far niente".आणि भारतात शिकलेली ध्यानधारणा या दोन्हींचा ऊपयोग करून बाली मध्ये 4 महिने मजेत, आरामात व्यतीत करणे.. असा तिचा एकमेव प्लॅन असतो.
कादंबरीच्या ह्या भागात बालीबद्दल काही मनोरंजक माहितीही मिळते, जसे की ह्या बेटावर राहणाऱ्यांची फक्त चारच नावे आहेत, उदा, पहिले मूल Wayan, दुसरे made, तिसरे nyoman आणि चौथे ketut, बस्स.. पाचवे झाले तर.. परत Wayan.. , so गोंधळ कमी करण्यासाठी प्रत्येक जण आपल्याला एक टोपण नाव घेतो.. पण कागदोपत्री फक्त तीच चार नावे..
आपल्या प्लॅननुसार ती एक घर भाड्याने घेऊन ketut ला शोधून काढते आणि त्याच्याकडून बाली पद्धतीची ध्यान धारणा, बाली संस्कृती ह्याबद्दल बरीच माहिती मिळवते. Ketut तिला बाली तत्त्वज्ञानाची बरीच माहिती देतो. त्यातली मला interesting वाटलेली माहिती इथे देत आहे. तिथे असे मानतात की जन्मापासून आपली चार अदृष्य भावंडे असतात.. ती म्हणजे चार तत्त्वे, एक हुशारी, दोन मैत्री, तीन शक्ति किंवा ताकद आणि चौथे (जे मला फार आवडले) कविता.. ही चार भावंडे आयुष्यभर आपल्या बरोबर असतात, आपण अडीअडचणीच्या वेळी ज्याला हवे त्याला आपल्या मदतीला बोलावू शकतो, फक्त रोज ध्यान करून आपण त्यांचे स्मरण केले पाहिजे.
रोज सायकलवरून थोडीफार भटकंती, ketut शी गप्पा, ध्यान, जेवण, आराम असे खास काहीही न करता एलिझाबेथ आपला सगळा वेळ मजेत घालवत असते, त्यामुळे कादंबरीच्या ह्या भागात गोष्ट पुढे सरकण्याच्या दृष्टीने पुढे काही घडत आहे की नाही असे वाटत असताना तिचा एक छोटासा अपघात होतो. त्या उपचारादरम्यान तिला एक नवी, वैद्य मैत्रीण मिळते, जिचे नाव Wayan.. जिच्याकडे नवे घर आणि दवाखाना विकत घ्यायला पुरेसे पैसे नसतात, मग एलिझाबेथ तिच्यासाठी आपल्या अमेरिकेतील मित्र मैत्रिणींना सांगून पैसे गोळा करते..
पण आता पुढे काय, शारीरिक गरजांचे काय.. ह्या प्रश्नांच्या नादी न लागता, जगत असताना तिच्या आयुष्यात तिच्या नव्या मैत्रिणीच्या, Wayan च्या ओळखीतून Felipe येतो..तिच्याहून वयाने बराच मोठा पण तिच्या सारखाच घटस्फोटित.. ते दोघे भेटू लागतात, बोलू लागतात, फिरू लागतात, त्यांच्यात मैत्री होते... आणि तो तिच्या प्रेमात पडतो.. इथे परत तिच्या मनात गोंधळाला सुरुवात होते.
प्रेम म्हणजे नक्की काय तर, आपल्या आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबणे, परत त्याच नाती, प्रेम, भावनेच्या खेळत अडकायचे का... , एकमेकांना खुश ठेवणे, सुंदर दिसण्यासाठी कष्ट घेणे, परत त्रास झाला तर....?, तेच दुःख, तीच ओढाताण, नकोशी भावनिक गुंतवणूक.. वर्ष भरात कमावलेला आनंद, मानसिक स्थैर्य, शांतता .. परत निसटून गेले तर... ह्या भीतीने ती सुरुवातीला त्याच्या प्रेमाला स्विकारत नाही, त्याला मोकळेपणाने प्रतिसाद देत नाही.. पण जसजशी त्यांची ओळख वाढत जाते तसा तिचा त्याच्या वरचा, स्वतः वरचा आणि प्रेमावरचा विश्वास दृढ होत जातो..आणि त्याच्या साथीने ती परत नवीन आयुष्याला सामोरे जायला सज्ज होते..
- तन्मयी रानडे
ता. क. : ही कादंबरी २००६ मध्ये प्रकाशित झाली आणि न्यू यॉर्क टाइम्सच्या 'बेस्ट सेलर लिस्ट'मध्ये १८७ आठवडे होती. २०१० मध्ये या कादंबरीवर आधारित, प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री Julia Roberts हिची प्रमुख भूमिका असलेला चित्रपटही आला.