डेंजरस माइंड्स

युवा विवेक    02-Oct-2021   
Total Views |

पुस्तकाचे नाव : डेंजरस माइंड्स 

लेखक : हुसैन जैदी आणि ब्रिजेश सिंग
 

dangerous minds_1 &n 

दहशतवाद किंवा दहशतवादी म्हटला की, झाकलेले चेहेरे, हातात AK47, क्रूरता.. हे चित्र सामान्यतः ८०-९० च्या दशकापर्यंत आपल्या डोळ्यासमोर उभे राहायचे. सुरुवातीला भारत-पाकिस्तान सीमा, काश्मीरचे खोरे येथे मर्यादित असलेल्या दहशतवादाची तीव्रता नंतर मुंबईला आणि मुंबईकरांना अनुभवायला मिळाली ती १९९२ च्या बॉम्बस्फोटांमुळे.

मुंबईतील बॉम्बस्फोट घडवून आणताना संपूर्ण नवीन शैलीचा वापर झाला. ते म्हणजे मुंबईतील स्थानिक गुंड, मुंबईच्या भाषेत 'भाई' यांचा वापर करून, भारत-पाकिस्तान सीमा रेषेपासून कैक दूर असलेली सामान्य जनता वेठीस धरली गेली. त्यानंतरच्या साधारण 20 वर्षांच्या काळात, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद इत्यादी शहरांमध्ये विविध ठिकाणी, विविध वेळी असेच बॉम्बस्फोट होत राहिले, ज्यात कित्येक माणसे मारली गेली. या देशांतर्गत दहशतवादात , स्थानिक, आणि अगदी सामान्य लोकाना हाताशी धरून, त्यांचे मतपरिवर्तनकरून, त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकरवी हे हल्ले करण्यात आले. अशाच 8 जणांवर लिहिले गेलेले, आणि हल्लीच वाचनात आलेले एक पुस्तक म्हणजे हुसैन जैदी लिखित 'डेंजरस माइंड्स'! मुंबईतील गुन्हेगारी जगताचा मागोवा घेणारी अनेक पुस्तके जैदी लिहिली आहेत. हे पुस्तक, विविध न्यायालयीन खटले , पोलिसांनी दाखल गेलेले पुरावे आणि आरोपपत्रे, इत्याद कागदपत्रांवरून संशोधन करून लिहिण्यात आले आहे. लिखाणाची शैलीही वास्तववादी आहे.

पुस्तक वाचताना सतत जाणवत राहणारी एक गोष्ट म्हणजे, तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसांचे अगदी थोड्या कालावधीत होणारे प्रचंड मतपरिवर्तन आणि ते होण्यासाठी दिला गेलेला दांभिक धार्मिकतेचा आधार. सामान्य नोकरी, धंदा, शिक्षण इत्यादी करणारा माणूस आमूलाग्र बदलून, किरकोळ प्रशिक्षण घेऊन एकदम बॉम्बस्फोटांचे, हल्ल्यांचे कट रचताना पाहून अशा लोकांची नक्की काय मानसिकता असेल याचा आपण नकळत विचार करायला लागतो आणि त्याच बरोबर आपल्या आजुबाजुला राहणाऱ्या लोकांमध्येच असे तर कोणी नाही ना असे वाटून काही क्षण थरकापही उडतो. या पुस्तकात चर्चिलेली काही उदाहरणे येथे देत आहे.

डॉ. जलीस अन्सारी, मुंबईच्या जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन, मुंबईतच कूपर हॉस्पिटलमध्ये नोकरी करणारा एक हुशार डॉक्टर, ज्याने भारतभर रेल्वे स्थानकात आणि ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचतो, आणि त्यासाठी तो आपली सर्व आर्थिक शक्ति, आयुष्य आपल्या कुटुंबाची पर्वा न करता पणाला लावतो. फमिदा सैयद, जोगेश्वरी येथे राहणारी एक सामान्य गृहिणी, दोन मुलींची आई, जी भाजी आणायला गेल्यासारखी सहज, बसमध्ये बॉम्ब ठेवून काहीच न घडल्यासारखं परत घरी येते आणि आपल्या कृत्यामुळे किती लोक मरण पावले, हे सहजपणे बातम्यांमधे पाहते.

मन्सूर पीरभॉय एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनीअर म्हणुन काम करणारा हुशार मुलगा, पण तो अलगद इंडियन मुजाहिदीनच्या जाळ्यात सापडतो आणि त्यांच्या इशाऱ्यावर काम करायला लागतो. अरीब नावाचा कल्याणमध्ये राहणारा, वाशीच्या फादर ॲग्नेल कॉलेजात इंजिनीअरिंग शिकणारा एक सामान्य मुलगा, तो एक दिवस आयसिसचे व्हिडिओ बघतो काय..आणि त्याने प्रभावित होऊन आई वडिलांना फसवून चक्क सिरियाला धर्मयुद्ध करायला पोहोचतो. इंदौरला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेला मुंबईचा अबु फैसल, सहज म्हणुन सिमी ह्या संघटनेत दाखल होतो आणि बघताबघता त्या संघटनेचा सर्वेसर्वा होतो. एवढेच नाही तर, अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतो आणि मध्य आणि उत्तर प्रदेश पोलिसांना त्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडावे लागते. या आणि अशा आठ दहशतवाद्यांच्या सत्य घटना या पुस्तकात वाचायला मिळतात.

आयसिस या जगातील सर्वांत श्रीमंत दहशतवादी संघटनेचा जन्म, इंटरनेटला चाणाक्षपणे हाताशी धरून केलेला तिचा प्रसार आणि जगभरातील युवकांवर अतिशय थोड्या काळात निर्माण केलेला प्रभाव ह्याचीही माहिती पुस्तकात मिळते. याशिवाय कुप्रसिद्ध तेलगी घोटाळ्यावरही एक प्रकरण आहे. या पुस्तकात वर्णन केलेले बहुतेक जण सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय किंवा निम्नमध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. टोकाची गरिबी, अज्ञान अथवा एकांगी धार्मिक शिक्षण, ही दहशतवादाकडे वळण्याची काही मुख्य कारणे, परंतु, यापैकी एकही घटक सदर पुस्तकातील लोकांच्या आयुष्यात ठळकपणे आढळत नाही. धर्म ही खरंच अफूची गोळी आहे का... असे वाटायला लागते. एखाद्या धर्माचे, पंथाचे अथवा कुठल्याही संघटनेचे अनुसरण करताना त्यांचे नियम, परंपरा इत्यादीचे पालन करणे योग्यच पण त्याचबरोबर आपली तर्कनिष्ठता, सद्सद्विवेकबुद्धी, नीरक्षीरविवेक बाजूला ठेवून चालत नाही.

आपण करू इच्छिणार्‍या कृत्याने हजारो निरपराध लोकांचा जीव जाणार आहे, त्यामुळे हे करणे चूक आहे ही साधी माणुसकीची जाणीव अत्यंत थोड्या काळाच्या तथाकथित धार्मिक समुपदेशनानंतर नाहीशी का होत असावी, यामागचे काय कारण असावे... विचारांच्या पगडयाखाली भारावून जाऊन मानवी मनाची वहावत जाण्याची वृत्ती, कमकुवतपणा की विकृती....? असे विचार सतत पुस्तक वाचताना मनात येत राहतात. कारण ह्यातले काही जण आपल्या अपराधाची जाणीव होऊन, स्वतःहून कायद्याला शरण गेले आहेत...तर काही जणांना फार प्रयत्नांती अटक झाली आहे दहशतवादाची सामाजिक, धार्मिक, राजकीय कारणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे, त्यामागचे अर्थकारण इत्यादी गोष्टींचा उहापोह ह्या पुस्तकात नसला तरी भारतीय दहशतवादाच्या नव्या, तंत्रज्ञानाशी वेगाने घेतलेल्या आणि तितक्याच भीतीदायक चेहर्‍यामागची गोष्ट या पुस्तकात वाचायला मिळते.

©तन्मयी जोशी