गरज समाजभानाची!

युवा विवेक    04-Oct-2021
Total Views |

गरज समाजभानाची!


rape_1  H x W:  

सप्टेंबर महिना हा महाराष्ट्रात वेगवेगळ्या फसवणुकीतून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या, सामूहिक बलात्काराच्या एका मागोमाग एक घडणाऱ्या घटनांनी हादरला. तब्बल नऊ प्रकरणांमध्ये सामूहिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे नोंदवण्यात आले. पुढे काय होतंय ते कालाच्या पटावर सिद्ध होईलच. पण या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आपल्या अंतर्मनात आणि आजूबाजूच्या परिसरातील वातावरणाकडे डोकावून बघण्याची गरज निर्माण झाली आहे.

१ सप्टेंबर रोजी पुण्यात चौदा वर्षे वयाच्या बालिकेवर सामूहिक अत्याचार झाला. १३ सप्टेंबर रोजी मुंबईत साकिनाका येथे एका महिलेवर निर्भयाप्रमाणेच अमानूषपणे अत्याचार करण्यात आले. २२ सप्टेंबर रोजी डोंबिवलीतील १५ वर्षांच्या मुलीवर मागील नऊ महिने ब्लॅकमेलिंग करीत लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले. थोडं मागे जाऊन पाहिलं तर २०२०मध्ये ५५७० प्रकरणं ही अल्पवयीन मुलींबाबत घडलेली होती. २७८५ मुलींवर बलात्कार झाला तर, २६९९ मुलींचं शोषण झालं. २४ प्रकरणं ही पोर्नोग्राफीची होती. तर उर्वरीत सर्व लैंगिक शोषणाची. एकूण बलात्काराच्या तक्रारींमध्ये अल्पवयीन मुलींच्या तक्रारी अधिक होत्या. महाराष्ट्रात दर दोन तासांनी लैंगिक शोषणाची घटना घडत असल्याचं नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे, आरोपी आणि पीडित एकमेकांना अनोळखी असल्याचं प्रमाण हे एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.

मुलींनो बोलत्या व्हा !

बलात्कार वा विनयभंग किंवा लैंगिक शोषण या बाबतीत उपरोक्त परिच्छेदातील शेवटचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. तिच्यावर अत्याचार करणारी व्यक्ती ही परिचयातील, नात्यातील, नित्य भेट होणारी असल्याच्याही अनेक घटना आपल्या वाचनात येतात. पण सध्या नव्याने शिरकाव झालेला प्रकार आहे तो ऑनलाइन भेटीचा. विविध समाजमाध्यमांचा आधार घेत वैयक्तिक नंबर मिळवून, गप्पांत गुंतवून, निरनिराळी आमिषं दाखवून, लग्नाचं वचन देऊन, मुलींकडून तसल्याअवस्थेतील फोटो मिळवून; त्या आधारे धमकी देत लैंगिक शोषण करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. डोंबिवली बलात्कार प्रकरणात ओळखीचा फायदा घेत संबंधित पीडीतेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढण्यात आले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ३३ आरोपींनी तिच्यावर तब्बल नऊ महिने लैंगिक अत्याचार केले. विशेष म्हणजे यात दोन आरोपीही अल्पवयीन आहेत.

प्रश्न विचारावासा वाटतो की, मुली, तू हे नऊ महिने का सहन केलंस? घरातल्या कोणाला तरी विश्वासात घेऊन पहिल्याच वेळेस का सांगितलं नाहीस? आणि तिच्यातील बदल घरातल्यांच्याही लक्षात येऊ नये, आपला मुलगा मोबाइलवर काय करतो, कोणाशी बोलतो हे माहीत असू नये, इतका संवाद हरवत चालला आहे का? समाजमाध्यमांचा आधार घेत आपण मोकळं होण्यासाठी आधार का शोधतोय? सेक्स्टिंग (सेक्स टेक्स्टिंग) करणं आणि आपले न्यूड फोटो वा व्हिडिओ मेसेजिंग ॲपवर पार्टनरबरोबर शेअर करणं हे आज अनेक प्रेमप्रकरणांत सहज दिसून येतं; पण मॅसेजिंग ॲपद्वारे चॅटिंग करताना आपण किती पुढे जायचं, तिथे किती पुढे जायचं. सेक्सटिंग, न्यूड फोटो शेअरिंग याचा गैरफायदा घेऊन अनेकदा मुलींचं लैंगिक शोषण वा मुलांना धमकावण्याचे प्रकार घडताना दिसून येतात. हे वेळीच घरात वा समुपदेशकांना सांगितलं तर त्यातून वेळेत बाहेर पडता येईल. मुळात, जे योग्य वयात आल्यानंतर आपण आपल्या हक्काच्या माणसासोबत शेअर करणार आहोत, ते आधीच प्राप्त करण्याची घाई का निर्माण होते आहे? संस्कार कमी पडत आहेत की विवेक की शहाणपण?

संस्कारांची गरज मुलांनाही

अशा घटना घडल्या की, मुलींना मिळणाऱ्या मोकळीकीवर, त्यांच्या कपड्यांवर, त्यांच्या मित्रमैत्रिणींवर टिका करायला सुरुवात होते. अर्थात, मुलगी असो वा मुलगा, आपण काय कपडे घालायचे, आपल्याला काय शोभतं, कुठे जाताना आपण कोणते कपडे घालतोय, आपण मित्र वा मैत्रीण म्हणून योग्य संगत निवडली आहे का? याचं भान असायलाच हवं; पण केवळ मुलीच नव्हे तर, घरातून मुलगा-मुलगी दोघांनाही संस्कार आणि विवेकाचं शिक्षण मिळणं हे अत्यावश्यक झालं आहे.

इंटरनेटचा, समाजमाध्यमांचा स्फोट झाला आहे. गुन्हे आधीही घडत होते, पण समाज माध्यमांनी त्यात तेल ओतण्याचं काम केलं आहे. बाण सुटलाय, तो मागे घेणं शक्य नाही; पण त्या वेगाला आवर घालणं व तो बाण योग्य दिशेला जाईल याची काळजी आपणच घ्यायला हवी. केवळ कुटुंबीय म्हणून नाही तर, समाज म्हणूनही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बदलांचा अंदाज घेत, नव्या पिढीला रूचतील, समजतील आणि जाणवतील असे संस्कार मॉडिफाइड रूपात मांडता येणं आवश्यक आहे. मला काय त्याचे? म्हणून आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. आज उंबरठ्याबाहेर असलेला शत्रू नकळतपणे कधी उंबरठ्याच्या आत येईल हे कळणारही नाही. त्यासाठी योग्य समाजभानाची गरज आहे.

- मृदुला राजवाडे