एक पत्र बाबुजींना....

युवा विवेक    05-Oct-2021   
Total Views |

एक पत्र बाबुजींना....


babuji_1  H x W 

आदरणीय बाबूजी,

तुम्हाला लिहिलेलं हे पहिलंच पत्र. तेही तुम्ही या जगात नसताना.... आज ना तुमची जयंती, ना पुण्यतिथी. एरवी तुमची आठवण म्हणून तुमचं एखादं गाणंही पुरेसं असतं हो, पण आजची गोष्ट जरा वेगळी आहे. म्हटलं तर सहजच लिहितोय, पण खरं सांगायचं तर, हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, हे ठाऊक असूनही फक्त तुमच्यापाशी मन मोकळं करावंसं वाटलं, म्हणून हा प्रपंच. खरं तर, मनावरचं निराशेचं मळभ या इतक्याशा टीचभर पत्रानं कसं उतरावं, हा प्रश्न आहेच, पण तो तुमच्याशी बोलण्याच्या निकडीइतका महत्त्वाचा नक्कीच नाही.

आताच तुमचं जगाच्या पाठीवर" वाचून संपवलं. खरं तर उशीरच झाला वाचायला, पण नियतीची ही अशी उशिराची वळणं तुम्हाला वेगळ्यानं कशी सांगायची? हे म्हणजे सीतेला पतीविरहाचं दु:ख सांगण्यापैकी असेल, पण प्रश्न पडलाय हो एक मोठ्ठा. दोनच वर्षांपूर्वी आम्ही मोठ्या जल्लोषात तुमची जन्मशताब्दी साजरी केली आणि तुमच्या अपूर्ण आत्मचरित्राचा शेवटही तुम्ही कोल्हापूरला तुमच्यासमोर नव्यानंच उघडलेल्या गायन आणि संगीत दिग्दर्शन यांच्या संधीच्या दालनानं केलाय.

पण मग त्याआधीच्या मरणप्राय यातनांच्या काळाचं काय? त्या साडेपाच-सहा वर्षांमधल्या प्रत्येक दिवसात तुम्ही रोज नव्यानं मरत होतात आणि मरणाच्या दारातून पुन्हा-पुन्हा जन्म घेत होतात, मग आम्ही साजरी केली ती तुमची जन्मशताब्दी मानायची तरी कुठल्या प्रमाणावर? आपल्याच आयुष्याची राख स्वतःच्याच देहावर फासून घेत पुन्हा त्याच राखेतून जन्म घेणाऱ्या पक्षाच्या जन्मशताब्दीची नेमकी तारीख-तिथी ठरवायची तरी कशी हो...

सुधीर फडके, संगीतकार, गायक, क्रांतिकारक, देशभक्त, सावरकरभक्त, संघकार्यकर्ता, हिंदुत्ववादी वगैरे वगैरे, जंत्री संपतच नाही हो, पण मग नाशिकच्या रस्त्यांवरून एकेका कार्यक्रमासाठी अक्षरश: संघर्ष फिरणारे सुधीर फडके कोण? मुंबईच्या दुकानांच्या फळ्यांवर रात्र-रात्र उपाशी काढणारे, पोटासाठी पार दिल्ली - अंबाल्यापर्यंत जाऊन दुर्दैवाचे दशावतार नाही, सहस्रावतार भोगणारे सुधीर फडके कोण? खोलीचं भाडं भरण्यासाठी आपली वाद्यं विकणारे तेच जन्मशताब्दीवाले सुधीर फडके का?

या सगळ्याची संगती लागते ती तुमच्या गाण्यांमधून. एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचेमधून, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा मधून किंवा विठ्ठला, तू वेडा कुंभार मधून..... शब्द ओले होतात, स्वर भिजतो, डोळे भरून येतात, पण आयुष्य आणि त्यातले अपमानाचे, सलांचे, दुर्दशेचे आणि भुकेचे व्रण मात्र काळही कोरडे ठेवत नाही..... भिजलेल्या गळ्यासारखा हा दु:खांचा भिजलेला मळाही कायमच ओलेता ठेवतो हा काळ....

गीतरामायणानंतर तुम्हाला लाभलेली सुगीची लोकप्रियताही तुमचीच आणि ऐन विशीबावीशीतले ते धगीचे दिवसही तुमचेच, पण सगळ्याची गोळाबेरीज नेमकी काय? नुसतीच भणभणणारी आवर्त की, काळाचंच फिरणारं जातं? जातं नुसतं म्हणायला हो, जातं जात नाही कुठे, फिरतच रहातं. पाहा ना, दोनदा आत्महत्येपर्यंत पोहोचलेल्या तुमची जन्मशताब्दी होऊनसुद्धा दोन वर्षं उलटून गेली.

माझ्यासाठी तरी आत्ता एकच प्रश्न मागे उरलाय..... मरणोन्मुख अवस्थेला पोचलेले तुम्ही, इतक्या विलक्षण हालअपेष्टांमध्ये जगलात तरी कसे आणि कशाच्या ओढीवर? गळ्याचा भिजता मळा इतकी वर्षं तसाच उमलत ठेवायची ही जगावेगळी रीत साधलीत तरी, कुठे अन कशी?

बाबूजी, तुम्ही संगीतकार म्हणून नेहमीच असामान्य होतात, आहात आणि राहालच, पण आज माणूस म्हणूनही माझ्यासाठी जगातल्या आठव्या नव्हे, पहिल्या आश्चर्याच्या स्थानी येऊन बसला आहेत..... आणखी काय बोलू??? शब्द उरलेच नाहीत.

- अक्षय संत