सुमन

युवा विवेक    20-Nov-2021
Total Views |
सुमन

suman_1  H x W:
 
"चल चल,पाय उचल पटपट. आज काहीच नाय मिळालं बघ. केवाधरनं फिरतोय आपन! मला वाटलं या कंपनी जवळ मिळेल काहीतरी लोखंडी नाहीतर प्लास्टिक !" स्वतःशीच बडबड करत सुमन चालली होती.
"आज दिवस रिकामाच जाणार म्हणायचा. आता काही नाही मिळालं तर विकू काय आणि चार पैसे मिळणार कसे?"
फिरायला जाताना मला नेहमी सुमन दिसायची. कपाळावर ठसठशीत कुंकू, साडी वर खोचलेली, पाठीवर एक मोठं पोतं, हातात कचरा विस्कटायला घेतलेली वाकलेली लोखंडी सळई आणि शोधक नजर, काही वस्तू मिळाली की होणारा आनंद. एक दिवस ठरवलं की, हिला विचारायचं हिचं नाव, गाव, आयुष्य सगळ्यांबद्दल. गाठलं एक दिवशी तिला आणि विचारलंच. ती सांगत सुटली बसकण मारून!
"ताई, अहो काय सांगू माझी चित्तरकथा, चांगली चौथीपर्यंत शाळेत गेले मी. आवड होती लय शिकण्याची, पण आई, बाप सगळे हाच उद्योग करायचे.बाबाची भंगारची गाडी.आई कचरा वेचायची. वस्तीतले सगळे अशीच कायबाय कामं करून पैसे मिळवायचे. मग मी पण आली या कामात. पैसे मिळाले की, लय मजा वाटायची. शाळा सोडली. माझ्याबरोबरच माझ्या मैत्रिणी पण यायच्या. शाळा, अभ्यास काय झंझट नाय, त्याची तेव्हा मजा वाटायची; पण असं इतकी वर्ष करावं लागेल हे काय माहित नव्हतं. लग्न झाल्यावर दिवस पालटतील असं वाटलं, पण हाय रे कर्मा, दारूड्या नवऱ्याचा संसार चालवायला असे उद्योग करायला लागले. चार घरची धुणीभांडी करून हे पण करायचं. सकाळी लवकर कचरा वेचायला बाहेर पडायचं, घाणीत शोधत फिरायच, काय मिळेल ते पोत्यात टाकायचं आणि दुपारी नेऊन भंगार मालाच्या दुकानात विकायचं. मिळतील त्या पैशांची संसाराला जोड"
"काय म्हणालीस, घाण वाटत नाही का? अगं, आम्ही पण माणूसच आहोत ना, पण काय करतेस घाण वाटून? हे बघ काच, पत्रा, तार, खिळे, लोखंड लागून काय हातापायांच्या चिंध्या झाल्यात त्या! अगं लोक तर काय, फुटक्या काचा नीट गुंडाळून टाकत नाहीत, ब्लेड, पत्रे असेच फेकतात, मग आहेच आम्हाला त्रास!पुन्हा कचरा वेचायला आल्यावर कधी अंगावर कुत्री भुंकतात, तर कधी माणसं ओरडतात. मन निगरगट्ट करायचं बघ!किती वेळा हे लोखंड, तारा लागल्यामुळे इंजेक्शन घ्यायला लागतं. ते सरकारी दवाखान्यात घेतो आम्ही; पण आता या कामाची सवय झाली आणि आमच्यासारख्या कचरा वेचक कामगारांमुळे एरिया पण स्वच्छ होतो. तुला सांगते ताई ,एकदा एका बंगल्याजवळ एक मोठा बॉक्स टाकलेला होता. त्यात उचकटलं तर एक पैशाचं पाकीट दिसलं. सहज म्हणून बघितलं तर त्यात शे पाचशेच्या नोटा आणि कार्ड, फोटो, पत्त्ता. वाचला आणि बंगल्याची बेल वाजवली. आतली बाई बाहेर आली. तिला दाखवला पत्ता, बॉक्स आणि पाकीट, तर ते त्यांचच होतं. त्या बाईने परत परत 'थँक यू' म्हणत मला चांगली बक्षिसी दिली. आणि आता काही भंगार वस्तूअसतील तर त्या मला फोन करतात. नेहमीची घरं आहेत ती मलाच कचरा आणि भंगार देतात. कधी दिवाळीचा फराळ, कधी नवरात्रात साडी, आवर्जून बोलावून देतात. बास झालं, हीच आपली कमाई. आता माझ्या मुलाला शाळा शिकवते आहे. तो मोठा होईल,शिकेल आणि कुठेतरी चांगली नोकरी धंदा करेल आणि माझा हा वनवास संपेल अशी आस आहे बघ ! आता फिरायला होत नाही."
"ताई,आज लय गप्पा झाल्या. अजून घरी जाऊन परत धुण्या-भांड्याला जायचंय.
काय म्हणालीस ताई,चहा पोळी खाऊ? कशाला? बरं चल, खाऊन जाऊ दे मला पटकन.आणि काय भंगार,प्लास्टिक देण्यासारखं असेल तर ठेव गं ताई. मी आता फोन घेतलाय साधा. माझा नंबर घेऊन ठेव ताई."
चहा पोळी खाऊन, मी दिलेले पैसे घेऊन सुमन झपझप निघून गेली, कुठल्याही हलक्या कामाची लाज वाटू न देता ते प्रामाणिकपणे कसं करावं याचा धडा मला शिकवून!
- सौ. चारुता प्रभुदेसाई.