चला, सौंदर्याच्या व्याख्येची बेडी तोडू या!

युवा विवेक    22-Nov-2021   
Total Views |

चला, सौंदर्याच्या व्याख्येची बेडी तोडू या! 


definition of beauty_1&nb 
 
कल्पना करा, तुम्ही सहजच आपला मोबाईल स्क्रोल करत आहात. ऑनलाईन शॉपिंग साईटवर जाऊन कपडे खरेदीसाठी शोधाशोध करीत आहात. श्वेतकुष्ठ अर्थात ज्याला सामान्य भाषेत कोड म्हटले जाते असा त्वचाविकार झालेली एक कोड झालेली मॉडेल फिट वेअर म्हणजेच व्यायामासाठी असणाऱ्या कपड्यांच्या जाहिरातीत तुमच्या डोळ्यासमोर येते व स्क्रोल करणारा तुमचा हात क्षणार्धात थबकतो. आपल्याला गोऱ्या, देखण्या, सडपातळ तब्येतीच्या, गोंडस चेहऱ्याच्या मॉडेल बघण्याची इतकी सवय झाली आहे की, जाहिरातीतला हा बदल आपल्याला धक्का देऊन जातो. शॉपिंग साईटवर दिसून आलेला तो फोटो मी पुन्हा पुन्हा पाहिला. जाहिरातदाराच्या धाडसाची तर कमाल वाटलीच, तितकंच त्याचं कौतुकही वाटलं.
 

वास्तविक कोडं असणं सर्वसामान्य नसलं तरी त्यात जगावेगळं असं काही नाही. सुधा मूर्ती, सुमती क्षेत्रमाडे यांच्या महाश्वेता या एकाच नावाच्या कादंबऱ्यांनी या विषयाला पूर्वीच हात घातला आहे. खरं तर मराठीत किंवा एकंदरच समग्र साहित्यविश्वात विविध प्रकारचं व्यंग्य असणाऱ्या व्यक्तींवर वेगवेगळ्या साहित्यकृती निर्माण झाल्या आहेत. मुद्दा उरतो तो असा की, याने साध्य काय झालं. ते साहित्य वाचणाऱ्या पाच-दहा टक्के व्यक्तींच्या मनात त्याबद्दल जाणीवजागृती होईलही पण बाकीच्यांचं काय?

 

एखादं व्यंग्य असणं, वर्ण अर्थात रंग सावळा-गोरा-गव्हाळ असणं, उंच-बुटकं असणं, जाड-बारीक असणं, पुरुषाने थोडंसं बायकी असणं वा बाईने पुरुषी असणं अगदीच सामान्य आहे. किंबहुना ते त्या त्या व्यक्तीच्या अनुवंशिकतेवरही अवलंबून असतं. परंतु, मनोरंजन माध्यमं, जाहिरात क्षेत्र यांना यांचे फारच वावडे होते. त्यांचा उपयोग फार तर विनोदी वा व्यंगात्मक भाग साकारण्यापुरता असे. आजही बहुतांशी असतो. सर्वसामान्यपणे पाहिलं तर, आजही अनेक मालिकांमध्ये, कार्यक्रमांमध्ये व्यंग्यात्मक टिप्पणी करणं हे अगदीच नेहमीचं झालं आहे. प्रसिद्ध विनोदी शोमध्ये अभिनेत्रींची ओठांच्या आकारावरून, शरीराच्या आकारावरून खिल्ली उडवल्याचं आपण पाहिलं आहे.

 

वास्तविक, पाश्चात्य जगाच्या माध्यमातून सौंदर्याच्या फार चुकीच्या संकल्पना आज भारतात पेरल्या गेल्या आहेत. स्त्रीने गोरं, शेलाटं असणं, पुरुषाने टॉल डार्क हँडसम असणं. या अगदीच बेसिक मागण्यांमध्ये कमी पडणाऱ्या अनेक गुणवान व्यक्तींवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या तथाकथित कमतरतेमुळे अन्याय होतो. खरं तर, उष्णकटिबंधात राहणाऱ्या आपल्यासारख्या माणसांत वर्णाचे निकष वेगळे आहेत. आपल्या पुरातन साहित्यामध्येही मध्यम उंचीच्या बांध्याचंच वर्णन आढळतं. आणि मुळातच भारतात वातावरणीय बदलांचे प्रचंड वैविध्य असल्याने पूर्ण देशात एकाच प्रकारचे निकष लावून कसं चालेल. ज्या तत्त्वज्ञानाने ज्ञानाच्या आणि मनाच्या सौंदर्यालाच विशेष महत्त्व दिलं, तिथे ही चुकीच्या विचारांची पेरणी ही फारच खेदकारक आहे. केवळ या क्षेत्रातील मॉडेलच यामुळे बळी पडतायत असं नव्हे तर जी उत्पादनं येथे विकली जात आहेत त्यातही फारच मर्यादित मापं आणि तीही उपरोल्लेखित मापदंडाचीच. उदाहरणार्थ परीसारखा गोरेपणा देणाऱ्या क्रीम्स-साबण-पावडर, ठराविकच मापाच्या/आकाराच्या विशेषतः स्त्रियांच्या चपला, ठराविक दिवसांसाठी ठराविक रंगांची उत्पादने, विशिष्ट प्रकारची(भारतीय बांध्याला न रुचणारी) वस्त्र-अंतर्वस्त्र, अशी कैक उत्पादनं आज भारतीय मनावर कब्जा करून बसली आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून भारतीय मनात सौंदऱ्याच्या चुकीच्या व्याख्या आणि त्यामुळे क्वचितप्रसंगी येणारे नैराश्य व न्यूनगंडही दिसून येत आहे.

 

गेल्या काही वर्षांत मात्र हळूहळू बदलांचे वारे वाहात आहेत. काळेगोरे फरक कमी व्हायला सुरुवात झाली आहे. भारतातल्या एका सुप्रसिद्ध क्रीमच्या कंपनीला आपल्या जाहिरातीचं नाव बदलावं लागलंय. काही माध्यमांमध्ये रंगाला फार महत्त्व न देता, व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या क्षमतेचा-निपुणतेचा विचार करून माणूस निवडला जात आहे. मोठ्या आकाराच्या कपड्यांचं, त्वचेसाठी सेन्सिटिव्ह वस्तूंचं, कपड्यांचं उत्पादनही खास केलं जात आहे. पण त्यात त्या व्यक्तींचं जाड असणं किंवा इतर काही गोष्टी सर्वसामान्यांत गणल्या जाण्याऐवजी अधिकच अधोरेखित होतं आणि त्याचं एकूणच प्रमाण बघता ते परिघाच्या आतल्या आत फिरणं होत आहे. त्या दृष्टीने थेट समाजमाध्यमांवर लिंकमध्ये दिसून येणारी पहिल्या परिच्छेदात उल्लेखित कोड असणाऱ्या मॉडेलची जाहिरात ही बेड्या तोडून नवीन सुरुवात करणारी वाटते. कारण त्यामुळे तिचं तथाकथित वैगुण्य समाजासमोर अधिक प्रखरपणे येतंय; पण त्याचा सकारात्मक स्वीकार तिने तर केला आहेच, उत्पादनं विकत घेणाऱ्या ग्राहकांच्या मनावरही ते बिंबवलं जाणार आहे.

 

वास्तविक, कायमच कॅमेऱ्यावर दिसणाऱ्या व्यक्तीची निवड सौंदऱ्याचे पारंपरिक निकष मोडून केली जाईल, जेव्हा गाण्याच्या कार्यक्रमात गळ्यातील सौंदर्याचा विचार केला जाईल, बातम्या देणाऱ्याचे वाचिक कौशल्य व वक्तृत्व अधिक प्रभावी ठरेल, एखादे व्यंग्य असणारी व्यक्तीही सकारात्मक दृष्टीने जाहिरातीसाठी निवडली जाईल, नोकरीच्या मुलाखतीत केवळ सुंदर दिसण्यापेक्षा टापटीप राहणं, प्रभावी बोलणं आणि त्याहून अधिक कामातलं कौशल्य याला महत्त्व दिलं जाईल, तेव्हाच हे बदल मुळापासून व्हायला सुरुवात होईल. सौंदर्याची भारतीय व्याख्या पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होईल.

- मृदुला राजवाडे