अंतराळामधील पहिले प्रवासी सूक्ष्मजीव
जगातील प्रथम आंतरग्रहीय मोहीम कदाचित अत्यंत लहान असे सूक्ष्मजीव प्रवासी म्हणून नेऊ शकते. वैज्ञानिक अंतर्ग्रह प्रवास करू शकेल असे यान बनवण्याच्या तयारीत आहेत जे यान आपल्या सूर्यमालेच्यादेखील पलीकडे जाऊ शकेल आणि तेथील विविध खगोलीय वस्तूंचा अभ्यास करू शकेल. या प्रवासाला सोबत म्हणून हे यान अतिशय सूक्ष्म असे जीव प्रवासी म्हणून घेऊन जाईल. याद्वारे या अंतर्ग्रह प्रवासाच्या दरम्यान या सजीवांवर नक्की काय परिणाम होतो ते लक्षात येऊ शकेल.
वैज्ञानिकांनी या लहानशा यानावर पाठवण्यात येणाऱ्या सूक्ष्मजीवांसाठी अशी लहानशी कॅप्सूलसुद्धा विकसित केलेली आहे. याच कॅप्सूलमध्ये या लहान जीवांना ठेवण्यात येईल आणि अवकाशात पाठवण्यात येईल. या कॅप्सूलमध्ये अनेकविध सेन्सर असतील ज्यायोगे या सूक्ष्मजीवांवर होणारे वेग, काल आणि अंतराळ याचे परिणाम वैज्ञानिकांना अभ्यासता येतील. वैज्ञानिकांनी नक्की कोणत्या सूक्ष्मजीवांना अशा सफारीला पाठवण्यात येईल हेदेखील निश्चित करायला सुरुवात केलेली आहे. पृथ्वीवरील काही जीवांमध्ये असे अनोखे गुणधर्म आढळतात जसे की हे जीव प्रचंड तापमान, गती सहन करू शकतात. अशाच जीवांवर वैज्ञानिक प्रयोग करीत आहेत. कदाचित येत्या काळात अशा जीवांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर सुद्धा पाठवण्यात येऊ शकते.
अशा प्रकारच्या अंतराळ प्रवासाचा एक महत्त्वाचा मुद्दा असा की या अशा प्रवासात (प्रकाशाच्या वेगाच्या जवळ जाणाऱ्या वेगाने केलेला प्रवास) भौतिकशास्त्राचे नियम बदलतात. त्यामुळे या जीवांवर त्यांचा काय परिणाम होतो हे पाहणे आणि अभ्यासाने देखील फार महत्त्वाचे आहे याचे कारण असे की हेच सर्व बदललेले नियम भविष्यकाळात मानवालासुद्धा अंतराळ प्रवासात लागू होणार आहेत. त्यामुळे वैज्ञानिकांचा या बाजूनेसुद्धा विचार चालू आहे. आता वैज्ञानिकांना फक्त हे यान कधी आकाशात झेपावते आणि या यानाकडून येणाऱ्या माहितीमुळे भौतिकशास्त्राची आणि दूरवरील प्रकाशाच्या वेगाने केलेल्या अंतराळ प्रवासाची नक्की कोणती गुपिते उघडतात याचीच वाट येत्या काही काळासाठी पाहावी लागेल.