ठरलं.... डोळस व्हायचंच..

युवा विवेक    25-Nov-2021
Total Views |

ठरलं.... डोळस व्हायचंच..


tharala dolas hoychay_1&n

इंटरनेट, सामाजिक माध्यम, प्रिंट/इलेक्ट्रॉनिक अशा विविध माध्यमांतून अनेक प्रकारची माहिती आपल्या समोर येत असते. त्यातले तथ्थ, दर्जा, विश्वासार्हता याबाबत शंका निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आपल्याला माहिती देणारी, प्रबोधन करणारी आणि ज्ञानातही भर घालणारी पुस्तके नक्कीच वाचायला हवीत यातून आपल्या विचारांना चालना मिळते. अशाच पद्धतीच्या वेगळ्या पुस्तकाची ओळख आपण करून घेणार आहोत.

 

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक सीमारेषा असते. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत सारासार विचारसरणीचा वापर क्रमप्राप्त असतो. नाही तर व्यक्तीची संपूर्ण विचारप्रणाली चुकीच्या, भोळ्या विश्वासाच्या पायावर उभी राहते. मग यासाठी आवश्यकता आहे, ‘डोळस विचारप्रणालीची’! हेच अधोरेखित करणारे डॉ. नरेंद्र दाभोकर यांचे पुस्तक म्हणजे, 'ठरलं.... डोळस व्हायचंच!' मुखपृष्ठ, शीर्षक यातून बोलके असलेले हे पुस्तक आहे.

 

'कावळा, घुबडला बघणे- शिवणे अशुभ असते. ग्रहण पाळले नाही तर, अपाय होतो. आकाशातला तारा पडणे ही भौगोलिक घटना पाहू नये, अंगात येणे हे देवाचे रूप आहे, योग्य यश न मिळणे म्हणजे कमनशीब समजणे.' असे एक ना अनेक समज बाळगून विविध स्तरांतले, वयाचे, स्त्री-पुरुष समाजात वावरत असतात. आपण आपल्या आजूबाजूला अशी मंडळी बघतोदेखील. अशी व्यक्तिमत्त्वे संपूर्ण आयुष्य मनात अढी, खंत बाळगतात. या विचारांमागे तर्कशुद्ध विचारांचा कसा अभाव आहे यावर स्पष्टीकरणासह मुद्दे मांडणारे हे पुस्तक आहे. मुळात, एखादा विचार कोणी मांडला तर, त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे आणि पापभिरू वृत्तीने आचरणात आणणे हा मानवी सहज भाव आहे. तरुण पिढीच्या मनात उद्भवणारे अनेकविध प्रश्न या तरुणाईने दाभोलकरांना पत्राने, भेटीत विचारले. या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांची लेखमाला म्हणजे हे पुस्तक होय.

 

भक्तिभावाने केलेला नमस्कार परमेश्वराला संतुष्ट करतो. त्यासाठी देहाला त्रास देणारे, न झेपणारे उपासतापास किंवा बुद्धी-श्रम-वेळ पैसा वाया घालवणारे विधी यांचा आग्रह कितपत योग्य आहे? तसेच, अमुक एका पूजेने वैभव प्राप्त होते ही भावनांची क्रूर दिशाभूल नव्हे काय? अशा वाचकांच्या मनात उदभवणाऱ्या प्रश्नांना लेखकच वाचा फोडतात.

 

प्रत्येक दिवस हा आपल्या विचार, कृतीने योग्य करा. अमावस्या, पौर्णिमा या भौगोलिक ताळेबंदावर नव्हे. कोणताही धर्म ज्येष्ठ-कनिष्ठ नाही. धर्माचा संदेश हा, यात्रा करणे/काढणे, वाहनांना भर रस्त्यात अडवून कर्णकर्कश फटाक्यांची आतषबाजी करणे, लाऊड स्पीकर वाजवणाऱ्या विचित्र गाण्यांनी पोहोचणार नाही, तर स्त्री-पुरुष समानता, माणसाने माणसाला माणुसकीने वागवणे यावर भर देण्याचा संदेश असतो.

 

चकाकणारा पिवळा धातूचा तुकडा असेल तर, आपण सोनाराकरवी त्याचा कस लावतो. मग चमत्काराला नमस्कार करण्यापूर्वी वैज्ञानिक तपासाचा कस जरूर लावायला हवा. आयुष्यात निराश न होता घडले ते अयोग्य असले तर नोंद करा. स्वतःच निर्णय घ्या स्वतंत्र भारतातले डोळस नागरिक या नात्याने हिंमत बाळगणारे युवा व्हा. जीवनात बुवाबाजीला स्थान देणार नाही असा संकल्प करा! माणसे जोडा!

उठता-बसता विज्ञानाने निर्माण केलेली साधने वापरणे म्हणजे काही वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे नव्हे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे त्याने माणसाचे मन मुक्त निर्भय होण्यास, शोधकथा वृद्धिंगत होण्यास आणि कृतीशीलतेकडे वळण्यात मदत होते. अंधश्रद्धेविरुद्ध लढण्यासाठी मन पेटले असेल, बाहू सळसळत असतील तर, विवेकबुद्धीने वागा असे सांगत प्रत्येक नेमक्या आटोपशीर लेखाखाली तुमचा विवेक साथी, अशी लेखक स्वतःची ओळख सांगतात. तसेच, मार्गदर्शनासाठी, अंधश्रद्धा निर्मूलन समितिअसल्याचे सांगत तरुणाईला आणि वाचकांना दिलासा देतात. या पुस्तकातला प्रत्येक लेख विचारप्रवर्तक आहे. लेखक कोणतेही मत वाचकांवर लादत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा वाचताना जाणवतो. वस्तुस्थिती सांगत शंका समाधान करणारी ही लेखणी आहे. मग हे वाचल्यावर वाचक आपले विचार, कृतीची दिशा स्वतःच्या विवेकाने घ्यावी या टप्प्यावर हे पुस्तक आणून सोडते.

 

एका लेखाच्या शेवटी ते म्हणतात,

खुदी को कर बुलंद इतना की, हर तकरीर से पहले,

खुदा बंदे को पुछे, बता तेरी रजा क्या है

काय मंडळी पटतंय का? विचार, कृतीत गोंधळ होऊ नये, निर्भय मनोवृत्ती विकसित करणारे हे पुस्तक नक्की वाचा.

 

- पल्लवी मुजुमदार