जियो जी भर के

युवा विवेक    29-Nov-2021   
Total Views |
जियो जी भर के!
 

jiyo ji bharke_1 &nb
 
आपण जाऊन माझ्यासाठी ट्रॅक पॅन्ट आणि जीन्स घेऊ या का गं? शेजारच्या काकू विचारत होत्या. आयुष्यभर साडी नेसणाऱ्या आणि साठीनंतर केवळ सोय म्हणून पंजाबी ड्रेसकडे वळलेल्या काकूंचा प्रश्न पाहून मी चकितच झाले. प्रसिद्ध टूर कंपनीच्या महिला विशेष युरोप सहलीसाठी जाताहेत असं त्या म्हणाल्या. ते ऐकून तर, मी आश्चर्याने फक्त तोंडात बोटं घालायची शिल्लक ठेवली होती. या काकूंना मी कायम चार भिंतीच्या विश्वातच पाहत आले आहेत. काका गेल्यानंतर जगण्याचं कारणच संपल्याप्रमाणे, त्यांनी स्वतःला एका कोशात सामावून घेतलं. त्यामुळे त्या टूरवर जाणार हा माझ्यासाठी धक्का असला तरी तो सुखद होता. नुकताच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा एक हॅप्पी क्लब आणि महिला मंडळही जॉइन केलं होतं. स्वतःच्याच कोशाचा परीघ तोडून त्यांनी बाहेर पडायचं ठरवलं होतं.
 
तुमच्या माझ्या आसपास अशी अनेक वयोवृद्ध माणसं आहेत, ज्यांनी आपलं सबंध आयुष्य कधी मागच्या तर कधी पुढच्या पिढीसाठी वाहून घेतलं आहे. कालावकाशात मागची पिढी सुटत जाते आणि पुढची पिढी आपल्या पंखांच्या बळावर स्वतःचं विश्व शोधायला बाहेर पडते. आणि मग लक्षात येतं की आपलं जगायचच राहून गेलं. But….it’s better to be late than never. स्वतःचं उरलेलं आयुष्य संस्मरणीय करण्याचे, जीवनाचा मनमुराद आनंद घेण्याचे अनेक पर्याय निवृत्त झालेल्यांपुढे आहेत. मात्र यासाठी युवकांनीही त्यांना समजून घेणं आणि त्यांना जगण्याचं बळ देणं अत्यंत आवश्यक आहे. पुढे जाताना, क्षणभर थांबून मागे वळून पाहणं आणि ज्येष्ठांना विसाव्याचे क्षण मिळवून देणं गरजेचं आहे.
 
छंद जोपासा
आजवर अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील. कोणाची चित्रकला चांगली असेल, कोणी चांगलं गात असेल, वादनाचा छंद असेल तर मग आता योग्य वेळ आली आहे असं समजा. आपापले छंद जोपासा. आता जबाबदाऱ्याही पूर्ण झालेल्या असतात, अनेकदा गाठीशी पैसेही असतात. तंत्रज्ञानाचा आधार घ्या. उत्तमोत्तम ऍप्स तुम्हाला तुमचा छंद जोपासण्यासाठी नक्की मदत करतात. माझ्या आईने निवृत्तीनंतर तीस वर्षांनी रंगांचा ब्रश हाती घेतला. तो तिचा छंद होता, जो जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून गेला होता. त्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणण्याइतके पैसेही नसायचे; पण आपल्या सोयीनुसार छंद जोपासणं शक्य आहे म्हटल्यावर तिने पुन्हा रंगपेटी आणि कॅनव्हास आपल्या हाती घेतले. कोणाला फॅब्रिक पेंटींग तर कोणाला वीणकामाचा छंद असतो. मध्यंतरी एका नव्वदवर्षीय आजींनी जवळपास छोट्या बाळांचे शंभर स्वेटर विणून वनवासी क्षेत्रात पाठवले.
 
ज्येष्ठ नागरिक सहली
आज अनेक पर्यटन कंपन्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सहलींचे आयोजन करतात. यातील काही सहली आंतरराष्ट्रीय तर, काही देशांतर्गतही असतात. यात तुमचे पथ्थ्याचे खाणे, भारतीय पद्धतीचे जेवण, डॉक्टरांची सोय, केअर टेकर अशी सर्व काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे तब्येतीच्या फार तक्रारी नसतील आणि ॲडव्हेंचर्सची आवड असेल तर, तुम्ही सर्वसाधारण माणसांसाठीच्या टूर्सचाही विचार करू शकता. महिलांसाठी महिला विशेष सहलींचाही पर्याय आहे. एक दोन वर्षांनी गावाला, नातेवाईकांकडे, मित्रमैत्रिणींकडे जाण्याचाही पर्याय असतो. सकाळी उठून फिरायला जाणं, महिन्यातून एकदा एखाद्या नातेवाइकाकडे आवर्जून जाणं असे अनेक पर्याय आहेत.
 
समयदान करा
निवृत्तीनंतरचं सगळ्यात कठीण काम म्हणजे मोकळा वेळ घालवणं. या वेळाचं काय करावं, असा प्रश्न अनेक ज्येष्ठांना पडतो. त्यातही महिलांचा वेळ अनेकदा घरातल्या इतर कामांमध्ये गुंतून निघतो. अर्थात एका विशिष्ट वयानंतर फार मेहनतही करवत नाही तेव्हा वेळेचा प्रश्न उद्भवतो. अनेक ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थांसाठी वेळ देणं पसंत करतात, त्यात रमतात. जे सामाजिक कार्य आपण व्यस्ततेमुळे करू शकलो नाही, ते करण्याचा आनंद उतारवयात अनुभवतात. चार-पाच निवृत्त; पण सामाजिक जाणिवा असणाऱ्या व्यक्तींनी मुंबईत वात्सल्य ट्रस्ट नामक अर्भकालयाची रुजवण केली आणि पुढे कार्यकर्त्यांची दुसरी फळी उभी राहेपर्यंत स्वतः कार्यरत राहिले. आज त्या संस्थेचा महावृक्ष झालेला आपण पाहातो आहोत.
 
शिक्षण किंवा आरोग्य अशा सेवाक्षेत्रांत असणाऱ्या मंडळींनी तशा प्रकारची सेवा समाजासाठी उपलब्ध करून देऊ शकतील. बालकांना योग्य दिशा मिळावी म्हणून संस्कार वर्ग चालवणं, वनवासी क्षेत्रांत जाऊन मोफत शिकवणं, सेवावस्त्यांमध्ये जाऊन तेथील मुलांसाठी शाळा चालवणं असे अनेक उपक्रम निवृत्त व्यक्ती करू शकतात.
 
समयदान फक्त ज्येष्ठांनी नव्हे तर युवकांनीही करणं आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला ज्येष्ठ नागरिक एकटे राहात असतील तर, त्यांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्या आजारपणात धावपळ करणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासाठी वेळ देणं आपलं सामाजिक कर्तव्य आहे.
 
वृद्धाश्रमांचा पर्याय
जोडीदार निवर्तल्यानंतर आणि मुलं सोबत नसताना एकटं राहाणं अधिक त्रासदायक असतं. आजारपण, वयोपरत्वे होणारे अपघात हे कधीही होऊ शकतं. अगदी हे नाही झालं तरी एकटेपणात मनस्वास्थ्य सांभाळणं हे ही एक आव्हान ठरतं. अशावेळी डोळसपणे वृद्धाश्रमांचा पर्याय निवडणं योग्य ठरतं. तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार उत्तमात उत्तम आश्रमाची निवड तुम्हाला करता येते. तिथे तुमच्या सेवेसाठी माणसं तर असतातच. त्याचवेळी वेळ घालवण्याची वेगवेगळी साधनंही उपलब्ध असतात. हास्यक्लब, वॉकर्स झोन, योगासन कक्ष, महिला मंडळ, सांस्कृतिक विभाग, क्लब हाऊस, खेळण्यासाठी साधनं असं बरंच काही मिळतं. चर्चासत्र, स्नेहमेळावे, ज्येष्ठ नागरिकांच्या मेजवानी असं वेगवेगळं उपक्रम असतात. फक्त डोळसपणे त्याचा विचार करणं आवश्यक आहे.
 
वाढतं वय आव्हान नाही तर,आरोग्यपूर्ण आणि आनंदी जगण्याची संधी आहे. जे जे राहून गेलं ते सारं परत मिळवण्यासाठी मिळालेली ही एक देणगी आहे. हा काळ कुढत, तक्रार करत व्यतीत करायचा की, हसतहसत, गाणं म्हणत ते आपल्याच हातात आहे.
 
- मृदुला राजवाडे