फिटनेसच्या वाटेवर...

युवा विवेक    08-Nov-2021
Total Views |

fitneschya vatevar_1 
चला, श्रावण झाला, त्यानंतर गणपती झाले, दसरा झाला, आता दिवाळीही झाली. मोदक खाऊन झाले, श्रीखंडावर आडवा हात मारला. दिवाळीचा चकली, चिवडा, लाडू-करंजी असा फराळ करून झाला, भाऊबीजेनिमित्त हॉटेलमधील चमचमीत खाऊन झालं. तेही योग्यच आहे म्हणा. सणावाराला गोडाधोडाचं, चमचमीत असं जिव्हा तृप्त करणारं नाही खायचं तर, कधी खायचं! दिवाळी होऊन दोन दिवस झाले तरी आईच्या हातच्या फराळाची चव तर, आजही जिभेवर रेंगाळते आहे.
आजपासून आपली नेहमीची दिनचर्या सुरू. ऑनलाईन-ऑफलाईन स्वरुपात ऑफिस, शाळा, महाविद्यालयं सुरू होतील. लवकरच नवीन वर्षंही सुरू होईल. मग फिटनेसचे वेगवेगळे प्लान सुरू होतील आणि विरून जातील. मग यंदा थोडे वेगळे का करू नये? म्हणजे जानेवारीच्या दोन महिने आधीच स्वतःला फिटनेस चॅलेंज देऊया. गेल्या अनेक महिन्यात फिटनेसचा ढासळलेला मनोरा सावरायला या दोन महिन्यांकडे सुवर्णसंधी म्हणून पाहू या.
फिटनेस राखण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते पर्याय आहेत?
फिटनेस अर्थात तब्येत पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. पहिला आहे जिमचा. लॉकडाऊन आता बरेचसे उघडले असून आता अनेक ठिकाणी जिम पुन्हा सुरू झाली आहेत. त्यामुळे जिमला जाऊन व्यायाम करण्याचा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे. फक्त जिथे प्रोफेशनल ट्रेनर्स असतील व उपकरणे अद्ययावत, चांगल्या दर्जाची असतील अशाच ठिकाणी जाण्याचा विचार करा. अनेकदा गल्लीबोळांतही जिम सुरू केलेली असतात. परंतु ती व्यायामविषयक नियमांना धरून आहेत का, सध्याच्या दृष्टीकोनातून कोरोनाचे नियम तिथे पाळले जात आहेत का हे पाहणेही आवश्यक आहे. शक्य असल्यास वैयक्तिक ट्रेनर निवडा. कमरेच्या वरचा भाग, खालचा भाग, विशिष्ट ठिकाणी चरबी गोळा झाली असेल तर, तो भाग अशी वेगवेगळी टार्गेट डोळ्यासमोर ठेवून व्यायाम करता येईल. शक्यतो सर्वांगाच्या फिटनेसचे ध्येयच डोळ्यासमोर ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे थांबायचं तो ओळखा.
उत्तम तब्येतीसाठी चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही, असं म्हटलं जातं. जर तुम्हाला कोणताही दुसरा व्यायाम करणं शक्य नसेल तर शूज पहनो और निकल पडो. आपलं स्वतःचं दैनंदिन टार्गेट ठरवा. किती चालायचं हे तुमच्या सहनशक्तीवर आहे. कपाळाला आणि काखेत घाम येईल इतकं चालणं तंदुरुस्तीसाठी आवश्यक आणि पुरेसं असतं. वजन आणि फिटनेसचं टार्गेट डोळ्यासमोर असेल तर चालणं वाढवायला हरकत नाही. हल्ली मोबाईलमध्ये तुम्हाला पावलं किंवा किलोमीटरचं टार्गेट सेट करता येतं. तुमच्या आवश्यकतेनुसार टार्गेट सेट करा आणि चालायला सुरूवात करा. हळूहळू वेग आणि अंतर वाढवत न्या. क्षमतेपेक्षा अधिक चालून दमू नका, अन्यथा त्याचा परिणाम संपूर्ण दैनंदिन व्यवहारांवर होऊ शकतो.
तंदुरुस्तीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय संस्कृतीने जगाला दिलेला योग! आज आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिन साजरा केला जातोय. देशापरदेशात अनेक जण संकल्पपूर्वक योगाला आपल्या दिनचर्येचा भाग करत आहेत. फिटनेससाठी योग हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे. आणि कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडण्यास भीती वाटत असेल तर ऑनलाईन योग वर्गांची संधी आपल्याकडे आहे. स्वतंत्र शिकवणी लावायची नसेल तर युट्यूबवर, मोबाईल ऍप्लिकेशनच्या आधारेही घरातल्या घराय योगासनं करता येतील. फक्त ती अचूक केली तरच अपेक्षित परिणाम साधला जाईल हे लक्षात असू दे. त्यामुळे स्वतंत्रपणे योगासनं करताना ती अचूक व्हावीत यासाठी प्रयत्न करा. शक्यतो सुरूवातीच्या टप्प्यावर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम मानला जातो. अनेक आसनांचा समुच्चय असणारा हा व्यायाम आपला आपण करता येतो. एक, दोन, तीन असं करत करत आकडा वाढवत नेत आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करत सूर्यनमस्कार घालणं शक्य आहे. फक्त आपल्या वयोगटाला व तब्येतीला तो उपयोगी आहे का, त्याने काही त्रास होणार नाही ना यासाठी वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या.
तोंड बंद करा
गेल्या काही महिन्यांत खूप अरबट-चरबट खाल्लं याचं गिल्ट तुम्हाला सतावतंय का? मग ही योग्य वेळ आहे आरोग्यदायी आहाराकडे वळण्याची. बाहेरचे तेलकट, मसालेदार, पाकिटबंद पदार्थ, शीतपेये, चीज-बटर आदी पचायला जड असे पदार्थ यावर कटाक्षाने फुली मारा. घरी शिजवलेला, प्रथिनं-जीवनसत्त्व यांनी परिपूर्ण असा भारतीय आहार कायमच प्राधान्यक्रमावर असावा. तेल-तूप योग्य प्रमाणात, मसाले यांचा अंतर्भाव असलेला महाराष्ट्रीय आहार सात्त्विक मानला जातो. नाश्त्याचे पारंपरिक पदार्थच खा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. परदेशी प्रकारचे सिरियल्स, ओट्स, बिनतेलाची सॅलड्स असा आहार आपल्या पचनशक्तीला मानवणारे नाहीत. त्यापेक्षा घरी शिजवलेलं अन्न केव्हाही चांगलं. त्याला जास्तीतजास्त प्राधान्य द्या. आवश्यकतेप्रमाणे पाणी प्या. उगीचच अमुक लीटर, तमुक लीटर पाणी या प्रलोभनांना बळी पडू नका. कारण पाणीदेखील पचावं लागतं आणि अतिरेक हा पाण्याचा असला तरी तो वाईटच.
हवा मनाचाही फिटनेस
मागील दीड वर्षं आपण सर्वच एका विचित्र मनस्थितीला तोंड देत होतो. पण आता या सगळ्यातून बाहेर पडून एक वेगळं आयुष्य सुरू करू. मनस्वास्थ्य जिथे सोडून आलो होतो, तिथूनच नवी सुरुवात करू. त्यासाठी शरिराच्या व्यायामासोबतच मनाचाही व्यायाम आवश्यक आहे. प्राणायाम, श्वाशोच्छवासाचे प्रकार यासह ध्यानधारणा, मेडिटेशन याचाही आधार मनाचे आरोग्य जपण्यासाठी करता येईल, आवडीची गाणी ऐकणं-म्हणणं, बरेच दिवसात चित्रं काढलं नसेल तर ते करणं, नृत्यकौशल्य आत्मसात करणं, मित्र-मैत्रिणींशी सुसंवाद साधणं, नाटक सिनेमा पाहणं, ओटीटीवर मनाला क्लेषकारक नसतील असे निखळ विनोदी, तसंच कौटुंबिक कार्यक्रम-सिनेमे पाहणं, छोटीशी सहल करणं अशा अनेक गोष्टी मनाच्या आरोग्यासाठी करता येतील. मन निरोगी असेल तर त्याचा उपयोग शरीर निरोगी ठेवण्यासही होतो.
तर मग चला, पुन्हा नव्याने हातात हात घालून आरोग्याच्या वाटेवर चालायला सुरुवात करू. शरीर स्वस्थ, मन स्वस्थ तर आयुष्य आनंददायी हा मंत्र लक्षात ठेवू या.
'जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे....'
यातच तर खरी मज्जा आहे.
- मृदुला राजवाडे.