पृथ्वीवरून नव्या पाहुण्याचे दर्शन

युवा विवेक    01-Dec-2021
Total Views |

पृथ्वीवरून नव्या पाहुण्याचे दर्शन


A1 Leonard_1  H 

२०२१ मधील शोधण्यात आलेला सर्वात पहिला धुमकेतू म्हणजे २०२१ A१ लिओनार्ड हा येत्या १२ डिसेंबर रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्यामुळे पृथ्वीवरून या धुमकेतूचे विहंगम दृष्य कदाचित आपल्याला पाहण्यास मिळू शकेल. या धुमकेतूची दृष्यप्रत ही साधारण +७.२ इतकी होण्याचा संभाव असून सध्या दुर्बिणीच्या सहाय्याने किंवा थोड्या मोठ्या टेलिस्कोपच्या साह्याने हा सहज दिसू शकेल. सध्या धुमकेतूचा प्रवास पृथ्वीवरून पाहताना दक्षिणेकडून उत्तरेकडे असा होत आहे. हा धुमकेतू सध्या भल्या पाहते सूर्योदयापूर्वी दिसू शकेल.

 

धुमकेतू साधारण २ जानेवारी २०२१ रोजी शोधण्यात आला. येत्या ३ जानेवारी २०२२ ला सूर्याजवळ असेल त्यानंतर कदाचित तो सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पुन्हा उर्ट च्या मेघांच्या दिशेने फेकला जाईल अथवा तो सूर्यावर आपटेल आणि कदाचित सूर्यामध्ये सामावून जाईल. हा धुमकेतू अतिशय सक्रिय असल्याचे काही महिन्यांपासून लक्षात आलेले आहे. या धुमकेतूचा गाभा हिरव्या रंगाचा असून, त्याची शेपटी काही लक्ष किमी इतकी मोठी आहे. धुमकेतू पाहण्यासाठी साधारण ७ डिसेंबरच्या आसपास आकाशात नरतुरंग, उत्तर मुकुट यांच्या जवळ पाहावे लागेल. त्यानंतर हा धुमकेतू हा पुढील काही तारकासमूहांच्या जवळून जाताना दिसू शकेल. ३ डिसेंबरच्या पहाटे खगोल अभ्यासक आणि खगोल छायाचित्रकार यांच्यासाठी पर्वणी असेल याचे कारण म्हणजे साधारण ३ डिसेंबर च्या पहाटे हा मेसिये ३ या मेसियर ऑब्जेकट जवळ दिसू शकेल त्यामुळे हा धुमकेतू ओळखणे सहज शक्य होऊ शकेल. १० डिसेंबरला हा धुमकेतू पाहण्याची शेवटची संधी असणार आहे याचे कारण त्यानंतर साधारण १२ डिसेंबरला हा धुमकेतू सूर्याच्या जवळ जाईल त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात हा धुमकेतू दिसणे अतिशय कठीण होणार आहे.

 

धुमकेतू उर्टच्या मेघामधून म्हणजेच साधारण प्लुटो च्या पलीकडून येत असतात. सूर्याच्या प्रचंड अशा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे धुमकेतू खेचले जातात आणि त्यानंतर ते सूर्याच्या दिशेने प्रवास करू लागतात. धुमकेतू हे धुलीकण आणि बाष्प यांच्यापासून बनलेले असल्याने जेव्हा ते सूर्याजवळ येऊ लागतात तेव्हा या धूमकेतुमधील पाण्याचे बाष्पीभवन होते आणि त्यामुळेच या धूमकेतूला धूलिकणांची आणि बाष्पाची अशा दोन वेगवेगळ्या शेपटी तयार होतात. या काही लक्ष किमी अंतरावर पसरलेल्या असतात. ही आणि अशी अनेक रहस्ये धुमकेतू आपल्या पोटात दडवून असतात. तुम्हीसुद्धा हा धुमकेतू पाहण्याचा प्रयत्न नक्की करा!!!

 - अक्षय भिडे