दशरथा, घे हें पायसदान

21 Mar 2021 18:04:38

Dasharatha _1  
दशरथा, दशरथा,

घे हें पायसदान, पायसदान

तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलो, हा माझा सन्मान

दशरथा, दशरथा, दशरथा...घे हें पायसदान....
ऋष्यशृंगमुनींनी अश्वमेध यज्ञांची यथासांग तयारी केली. नृपश्रेष्ठ दशरथ आणि त्यांच्या भार्यांनी पंचमहाभूतांपैकी अग्निदेवताला साद घातली. त्या यज्ञांची फलश्रुती म्हणून त्या यज्ञांतून अग्निदेव यज्ञपुरुषाच्या रूपाने प्रकट झाले. महिपती दशरथ एक सार्वभौम राजा होता, धर्मपरायण अवनीश होता. सूर्याच्या तेजाप्रमाणे भूमंडलावर सदैव चकाकत आणि तळपत असणाऱ्या इक्ष्वाकू वंशातील एका महान राजाच्या अश्वमेध यज्ञेच्या सांगतेसाठी आपली निवड झाली ह्याचा आनंद अग्निदेवतांच्या वाणीतून आणि एकूण देहबोलीतून सूचित होत होता. अग्नीदेवता म्हणत होते, " हे महिपाल! ज्या प्रजेसाठी तुझ्यासारखा विजयभिलाषी, समाधानी, धर्माच्या कार्यासाठी सदैव तत्पर असणारा नृपधिपती लाभला. ज्ञान आणि वैभव एकत्र नांदावं अशी वास्तू म्हणजे ही तुझी अयोध्यानगरी, त्या अयोध्येच्या पुनीत भूमीवर तू मला येणासाठी यज्ञांमार्फत आव्हान केले ज्या भूमीला तुझ्या अज, रघु, भगीरथ, दिलीपसारख्या इक्ष्वाकू वंशांतील पूर्वजांनी कृतार्थ केले आहे त्याच भूमीवर मला येणाचे सद्भाग्य लाभले, त्याबद्दल प्रथमतः मी तुझा आभारी आहे". संगीताच्या बाजूंनी विचार केला तर भीमपलास ह्या हिंदुस्थानी रागात बद्ध केलेल्या ह्या ओळी म्हणजे गीत रामायणातील पहिले "अग्रेसिव्ह गाणे" आहे, पुढे ह्याच अग्रेसिव्हपणाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला जाणवतात.
तव यज्ञाची होय सांगता, तृप्त जाहल्या सर्व देवता
प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्रीविष्णू भगवान
दशरथा, दशरथा, दशरथा... घे हें पायसदान...
ऋषिवर्य ऋष्यशृंग, वशिष्ठ , काश्यप आणि इतर मुनींच्या मंत्रोप्चारांनी, विविध समिधा ह्या अग्निकुंडात समर्पून माझे आव्हान केले तुझ्याच प्रमाणे मी त्यांच्या ह्या प्रार्थनेने आणि उपासनेने अतिआनंदित झालो आहे. तुझ्या भार्यांनी ज्याप्रमाणे मनोभावे ह्या यज्ञकुंडाची आणि इतर मान्यवरांची सेवा केली त्याने मी फार समाधानी आहे. ह्या सगळ्यांच्या मदतीशिवाय हा यज्ञ पूर्ण होऊ शकत नव्हता. आज ह्या यज्ञांची सांगता होत आहे. ह्या यज्ञांमुळे इथली मृदा, इथले अवकाश, इथली वास्तू, अयोध्येच्या चराचरात समाहित असलेले पंचमहाभूत तृप्त झाले आहेत राजन!! त्याच सोबत मला हे तूला सांगताना हर्ष होत आहे की तुझ्या या यज्ञांमुळे आकाशातील यक्ष, देव, गंधर्व, किन्नर, अप्सरा ह्या सगळ्यांना आनंद झाला आहे त्यांनी माझ्यामार्फत तुझ्यासाठी शुभाशीर्वाद पाठवला आहे. हे नरेश! स्वतः शंख-चक्र आणि वनमाला धारण करणारे, क्षीरसागर शेषशायी भगवान विष्णू तुझ्या यज्ञांमुळे प्रसन्न झाले आहे. तुझ्या यज्ञांत ह्या क्षणी प्रकट होण्याचे आदेश मला लक्ष्मीपतींकडूनच मिळाले आहे. ह्या क्षणी तुझ्या यज्ञांची सांगता होत आहे दशरथा!! हे मी इथे घोषित करतो.
श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी, आलो मी हा प्रसाद घेउनि,
या दानासी या दानाहुन, अन्य नसे उपमान,
दशरथा, दशरथा, दशरथा...घे हें पायसदान...
पद्मनाभ भगवान श्रीविष्णूची आज्ञा मला मिळताच क्षणभराचाही विलंब न करता मी तुझ्या समक्ष त्यांचा प्रसाद घेऊन प्रस्तुत झालो आहे. त्यांनी तुझ्यासाठी हे पायस दिले आहे. लक्षात घे राजन, तुझ्या यज्ञांची याहून योग्य अशी सांगता होऊच शकत नाही. उपनिषिदांत किंवा वेदांमध्ये उपासनेनंतरच्या फलश्रुतीचे महत्त्व कथन केले आहे. प्रार्थनेची परिपूर्णता त्यातील फलश्रुतीत असते. तुझ्याही यज्ञांची फलश्रुती भगवान श्रीविष्णूंच्या ह्या पायसरूपी प्रसादात आहे. साक्षात भगवंतानी दिलेल्या ह्या दानाची तुलना इतर कोणत्याही दानांशी होऊ शकत नाही असे ते एकमेवाद्वितीय सर्वोत्तम दान आहे. कित्येक वर्षांपासून अनेक ऋषीमुनीं हा प्रसाद मिळावा म्हणून उग्र तप अनुष्ठान करीत आहे, कित्येकांचे जन्म ह्यात संपले, कित्येकांनी आपल्या अनुष्ठानाचा वारसा पुढील पिढीकडे हस्तांदोलीत केला तरी ही त्यांना भगवंतांच्या ह्या प्रसादाचा लाभ झाला नाही; परंतु हे नरेश, तुम्हाला हा प्रसाद सहज हस्ते मिळाला आहे. ह्या प्रसादाविषयी मनामध्ये कुठे ही यत्किंचितही शंका ठेवू नको. मनामध्ये श्रद्धा भाव ठेवून हा स्वीकार कर. ह्या दानाविषयी तुला थोडे कथन करतो. ते मनःपूर्वक श्रवण कर.
करांत घे ही सुवर्णस्थाली, दे राण्यांना क्षीर आतली
कामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज हिचे बलवान
दशरथा, दशरथा, दशरथा...घे हें पायसदान...
गदिमावरच्या ओळींमध्ये खास आपली छाप सोडून जातात. इतका मोठा अश्वमेध यज्ञ, त्यातून अग्निदेवता भगवान श्रीविष्णूंच्या आज्ञेप्रमाणे प्रसाद घेऊ आले आहेत. तो प्रसाद किती तेजस्वी ओजस्वी असेल तो कुठल्याही साध्या पात्रांमध्ये देणं म्हणजे त्या प्रसादाच महत्व कमी करणे आहे त्याच साठी गदिमांनी नेमका "सुवर्णस्थाली" हा शब्द निवडला. खरोखर मला गदिमांच्या शब्दकोशाची फार मोठी गंमत वाटते. दान देणारा अग्निदेव, दिलेलं दान हे अतुलनीय सर्वोत्तम दान, घेणारा सार्वभौम राजा अर्थात हे सगळे धागे जुळवून आणायचे म्हणून कदाचित गदिमांनी सुवर्णस्थाली हा शब्द वापरलेला असावा. यज्ञपुरुष पुढे सांगतोय की राजन - तुझ्या हातात ही सोन्याची थाळी घे त्यात पायसाचे दान आहे. ती एका प्रकारची विशिष्ट खीर (क्षीर) आहे जी तांदूळ, दूध, साखर ह्या साहित्याने बनवलेली आहे - (रामायणाच्या निरनिराळ्या प्रतींमध्ये ह्याबद्दल मतमतांतर आहे, कुठे कुठे ही खीर नसून फळ आहे). तुला दिलेली क्षीर ही साधीसुधी क्षीर नसून अत्यंत ओजस्वी क्षीर आहे. ह्या पायसच्या गुणांची तुलना करायची झालीच तर कामधेनूचा दुग्ध देखील ह्या पायसच्या क्षमतेसमोर निर्बल आहे. नृपश्रेष्ठा तुझ्या मनात कुठल्याही प्रकाराने ह्या पायसच्या ग्रहण करण्यासाठी कोणत्याही प्रश्नांसाठी तिळमात्र देखील जागा ठेवू नकोस...
राण्या करतिल पायसभक्षण, उदरीं होईल वंशारोपण
त्यांच्या पोटीं जन्मा येतिल, योद्धे चार महान
दशरथा, दशरथा, दशरथा... घे हें पायसदान...
हे पायसदान तू स्वीकार कर आणि तुझ्या तिन्ही राण्यांना ते भक्षण करण्यास सांग. ज्या मनोकामनेसाठी तू हा यज्ञ आरंभिला होता, ती मनोकामना म्हणजे पुत्रप्राप्ती. त्यासाठी ही ओजस्वी खीर त्या तुझ्या तिन्ही पत्नींना ग्रहण करायला सांग. एका जुन्या दंतकथेप्रमाणे श्रीरामाच्या अवतार घेण्याच्या काही कालावधी आधी शेषनाग, शंख आणि सुदर्शनचक्र यांना अतीव दुःख झाले ते ह्या साठी कि भगवन श्रीविष्णू पृथ्वीवर अवतार घेणार म्हणजे ह्या तिघांचा त्यांच्या स्वामींच्या चरणांशी राहण्याच्या काळात दुरावा निर्माण होणार, त्या साठी त्यांनी विनंती केली की आम्ही तुमच्याच मुख्य अंशात रूपे आहोत आम्हाला तुमचा वियोग सहन होणार नाही म्हणून तुम्ही आम्हाला आपल्या सोबत घेऊन जावे ; त्या वेळी श्रीविष्णुंनी त्यांना वचन दिले की ह्या जन्माच्या वेळी माझ्या बत तुम्ही तिघेही माझे कनिष्ठ भाऊ म्हणून अवतार घ्याल. अर्थातच ह्या कथेला सबळ असा काही आधार नाही आहे; परंतु आपल्या पुराणात अनेक दंतकथा प्रचलित आहे त्याची ही एक. यज्ञपुरुष पुढे सांगत आहे की राजन - ह्या पायसच्या सेवनाने तुझ्या राण्यांच्या गर्भामध्ये भगवान त्यांच्या असीम अपरिमित शक्तींसोबत प्रवेश करणार आहे. क्षत्रिय वीरांचे गुण असलेले चार दिग्विजय - कीर्तिवंत योद्धे त्यांच्या गर्भी जन्म घेण्याची शुभवार्ता यज्ञपुरुषाने म्हणजेच अग्निदेवाने राजा दशरथास सांगितली.
प्रसवतील त्या तीन्ही देवी, श्रीविष्णूंचे अंश मानवी
धन्य दशरथा तुला लाभला, देवपित्याचा मान
दशरथा, दशरथा, दशरथा... घे हें पायसदान...
हे अयोध्यापती! हे सूचित असू दे की, ह्या पायसच्या सेवनाने त्यांना उत्तम आरोग्यदायी असा गर्भ लाभेल. नवममासं नवम दिवसं ह्या उक्तीप्रमाणे त्या प्रसवतील. श्रीविष्णू, शेषनाग, शंख आणि सुदर्शनचक्रसह त्यांच्या अजोड आणि अनुपमेय अश्या शक्तींनी परिपूर्ण होऊन मृत्युलोकीं जन्म घेणार हे विधीलिखित विधान आहे. तुझ्या साठी शुभवार्ता ही आहे की तुला आणि तुझ्या पत्नींना माता पिता म्हणून ह्यासाठी त्या जगत्नियंत्याने निवडले आहे. मोठ्या मोठ्या उपासकांनाही हा मान मिळत नाही तो मान तुला सहजरित्या प्राप्त झाला आहे. श्री विष्णू त्यांच्या काही बांधील असलेल्या कर्तव्यासाठी त्यांच्या इतर आयुधांसह त्यांच्या शस्त्र - अस्त्रांसह ह्या मृत्युलोकीं जन्म घेण्याची शुभवार्ता मी तुला देत आहे. ह्या वार्तेसोबत मला त्यांच्या दुराव्याचे दुःख होत आहे; पण त्याच सोबत संपूर्ण मानवसृष्टीला एक मोठ्या परंपरेचे मूल्य मिळणार आहे, मर्यादेचे नवे परिमाण स्थापित होणार आहे. धर्म पुन्हा नांदणार आहे. पृथ्वी पुन्हा राक्षसविरहित होणार ह्या वार्तेने मला आनंद देखील होत आहे. तुझ्या पत्नींच्या गर्भात श्रीविष्णू त्यांच्या विभिन्न अंशासह प्रवेश घेणार आहे, आणि ती शुभ घटिका अगदी समीप आली आहे. हाच तो योग्य क्षण आहे, पायसाचे सेवन करण्यास तुझ्या पत्नींना उद्युक्त कर आणि हे परमपुरुषा सिद्ध हो..थोरामोठ्यांच्या भाग्यात येत नाही तो देवपित्याचा मान तुला मिळतोय..मी ह्या साठी तुझं समस्त देवतांच्या वतीने अभिनंदन करतो....
कृतार्थ दिसती तुझी लोचनें, कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें
दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञीं अंतर्धान
दशरथा, दशरथा, दशरथा...घे हें पायसदान...
हे राजा दशरथ!! मी कोण ? कुठून आलो, तुझ्या यज्ञांची सांगता कशी व्हावी, पायसदान म्हणजे काय आहे. मला कोणी आज्ञा दिली हे सारे कथन मी तुला कथित केले आहे. माझ्यासमोर तुझ्या पत्नींनी ते पायस ग्रहण केले आणि मी स्वतःला फार भाग्यवान समजतो आहे कारण ह्या घटनेसाठी परमेश्वराने मला निवडले आणि तुझ्या पावन अयोध्येत येण्याचे भाग्य प्राप्त झाले त्याच सोबत तुझ्या राजगृही असलेल्या असंख्य ऋषिमुनींचे दर्शन मिळाले आणि सर्वात महत्वाचे प्रभू जन्म घेणार ही शुभ वार्ता माझ्या मुखांतूनतुला मी सांगितली आणि त्यांच्या येण्याच्या आमंत्रणाची बीज ग्रहण करताना मी साक्षीदार म्हणून बघितले. तुला पुत्र प्राप्ती होणार आहे ह्या बद्दल तू आता निश्चिंत हो, तसेही तुझी एकूण देहबोली मला फार आशादायी वाटते आहे. तुझ्या डोळ्यांमध्ये मला तृप्ततेचा भास होत आहे, तुझ्या डोळ्यांमध्ये किंवा मनांमध्ये कुठेही अविश्वास किंवा असमाधानाचा कुठेही लवलेश नाही ह्याचा मला आनंद आहे. तुझ्या दर्शनाने मी देखील तृप्त झालो आहे. श्रीविष्णुंनी मला पायस तुझ्यापर्यंत आणायची आज्ञा केली होती ती मी माझ्या परीने पूर्ण केली आहे. मला ह्या साऱ्या घटनेसाठी निवडले ह्यासाठी श्रीविष्णूंसोबत मी तुझादेखील ऋणी आहे कारण तुझ्या अश्वमेध यज्ञांची सांगता झाली नसती तर हा घटनाक्रम घटितच झाला नसता. हे राजन माझं ह्या क्षणी येण्याचे औचित्य संपले आहे..मी आता अंतर्धान पावतो मला तू आज्ञा दे... हे नृपश्रेष्ठा दशरथ तुला एवं तुझ्या तिघी पत्नींना व समस्त अयोध्यावासींचें मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो..तुम्ही सिद्ध व्हा.. मला प्रभूंच्या येण्याची चाहूल लागली आहे... भगवान श्रीविष्णुंनी त्यांची चिरकाल असलेली निद्रा संपवलेली आहे. शेषशायी आपल्या मूळ मुद्रेतून तुझ्या पत्नींच्या गर्भाकडे निघाले आहे.. सगळीकडे चैतन्य आनंद ह्याला पारावर नाही...राजन मला तात्पुरती आज्ञा द्यावी...
शुभम भवतु! शुभम भवतु!! शुभम भवतु!!!
- मृणाल जोशी
Powered By Sangraha 9.0