मंगळवासी आणि शुक्रवासी

युवा विवेक    21-Mar-2021
Total Views |

Mars and Venus_1 &nb
 
 

"तुला आता माझ्यात इंटरेस्टच उरला नाहीये." किती ओळखीचं वाक्य आहे ना. डेटिंग असो, रिलेशनशिप असो, लग्न झालेले असो, लग्न होऊन वीस वर्षे झालेली असो, सगळ्या मुली हे बोलतात. अशा वेळी मुलांना वाटतं, "इतकी मेहनत घेऊन इंप्रेस केलं, होकार दिलास, आता अजून काय करू??" आणि मुलींना वाटतं, "काय म्हणजे? आधी मी दुर्लक्ष करायचे तरी, कसं चांगलं बोलायचास आता का नाही?" मग इथून पुढे वाद वगैरे. मग बाहेर मिळणारा स्कोप, रिस्क घ्यायची तयारी यांवर नात्यांचे वय अवलंबून असते. डेटिंग असेल तर ब्रेकअप होऊ शकते, लग्नाला बरीच वर्षे झाली असतील तर मुकाट्याने माणसे टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये आणि बायका कामात मन रमवतात.
"Men Are from Mars, Women Are from Venus" ही थोडी अतिशयोक्ती झाली, पण नीट विचार केला तर या सगळ्यामागचे उत्तर सापडेल. माणसाच्या जन्मासाठी लागणाऱ्या दोन पेशी, स्पर्म आणि एग. या दोन्ही पेशींसाठीचे बायोलॉजीत वापरले जाणारे चिन्ह माणसे आणि बायकांच्या स्वभावाबद्दल खूप सांगतात, माणसांसाठी chasing आणि बायकांसाठी stability हा मूळ स्वभाव असतो. ध्येयाचा पाठलाग आणि असलेल्या गोष्टीमध्ये स्थिरता शोधणे हे अनुक्रमे पुरुष आणि स्त्रियांचे मूळ गुण म्हणता येतील. एखादे ध्येय, मग ते करियर असो, गर्लफ्रेंड/बायको असो, नोकरी असो, प्राप्त होईपर्यंत त्या ध्येयाचा पाठलाग करणे पुरुषांना आवडते, त्यात ते भान विसरतात आणि हवे ते मिळाले की परत दुसऱ्या ध्येयाचा पाठलाग. याच्या उलट, असलेल्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त स्थिरता शोधणे स्त्रियांना आवडते. कोणतेही तयार झालेले नाते अजून खुलावे, घर अजून सुंदर दिसावे, करियरमध्ये आपली जागा निश्चित असावी, यासाठी स्त्रिया झटत असतात.
या स्वभावातील फरकामुळे नाती अस्तित्वात येतात, टिकतात आणि तुटतातही. थोडा विचार केला तर खूप उदाहरणे दिसतील. अर्थात या सगळ्याला अपवादही असतात. मुलीही सतत chasing करणाऱ्या आणि मुलंही stability शोधणारे असतात. असे दोन विरुद्ध गुण असणारे जर एकत्र आले तर कायम वादावादी, भांडणे. आता दरवेळी, 'मुलांचा जन्मजात स्वभावच असा, मग ते तरी काय करणार' असं मुलांनी आणि 'मुलींना सगळं परफेक्टच लागतं ना' असं मुलींनी कारण देणं चुकीचं आहे. सतत या पळवाटा शोधत गेलात, 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' हेच खरे मानत गेलात तर कोणतेही नाते असो किंवा तुमचे करियर असो, बहरणार नाही. मग "आयुष्य एकसुरी झालाय, कंटाळा आलाय.' असं म्हणायला आपण मोकळे!! हो ना??
आता तुम्ही म्हणाल, मग इतका जर फरक आहे, तर बॅलन्स कसा साधायचा?? आता आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जन्मतः जे गुण असतात त्यात भर घालावी लागते, स्वतःला पारखून त्यानुसार स्वतःमध्ये बदल करावे लागतात. हेच तत्त्व इथेही वापरायचे. एखादे नाते सुरू झाले की मुलांनी chasing थांबवून स्थिर व्हावे आणि मुलींनी सतत स्थिरता हवी, नाते अजून परफेक्ट व्हावे हा विचार जरा कमी करावा. करियरच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मुलांनी सतत यशाच्या मागे धावताना एक क्षण श्वास घेऊन, आतापर्यंत जे मिळवलंय त्याकडेही नजर टाकावी, यशाचा आनंद घ्यायला तरी जरा थांबावे, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठीही. मुलींनी करियरमध्ये जे साध्य केलेय, तिथेच थांबून न राहता, अजून मोठ्या ध्येयांकडे हळूहळू वाटचाल करायला सुरुवात करावी. हे जमले की मुलांच्या आयुष्याची शर्यत आणि मुलींचे आयुष्य डबके होत नाही.
मी हे जे तत्त्वज्ञान सांगतेय ते 'बोलायला सोपे आहे, करणे कठीण' असं प्रत्युत्तर सगळे देऊच शकतात. पण मला तर ठामपणे वाटतं, आयुष्य इंटरेस्टिंग, थ्रिल्लिंग करण्याचे सोपे उपाय आहे हे. या साध्या बदलांना पैसेही लागत नाहीत. बाकी तुमची मर्जी!!
- सावनी