पर्यावरणातील घटकांची निवडणूक...

युवा विवेक    22-Mar-2021
Total Views |

evs_1  H x W: 0
 
 
आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सोशल मिडिया वर एकमेकांना खूप शुभेच्छा संदेश दिले असतील, पण आपण अनेकदा पर्यावरणाच्या विरुद्ध वागतो, मग त्याला काय अर्थ उरतो. पर्यावरण वाचले तरच आपण वाचणार आहोत याची जाणीव आपल्यात निर्माण होत आहे, पण ती विकसित होत गेली पाहिजे.
पर्यावरण म्हणजे काय ? आपल्या भोवती असलेला प्रत्येक घटक हा पर्यावरणाचा महत्वाचा भाग आहे. एक साधे उदाहरण सांगतो. चीनमध्ये माओने जेव्हा चिमण्या मारण्याचे आदेश १९५७ साली दिले त्यानंतर २ वर्षांनी चीनमध्ये धान्याचा दुष्काळ पडायला सुरुवात झाली. कारणे शोधली असता असे समजले की, चिमण्या मारल्यामुळे टोळांची संख्या वाढली आणि मग टोळधाडी चीनमधील शेती उध्वस्त करू लागल्या. म्हणजेच चिमणीसारखा छोटा पक्षीसुद्धा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजले.
पर्यावरण टिकवायचे असेल तर खूप मोठी गोष्ट करायची गरज नाही, तर छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत. घर बांधताना मग ते शहरात असो की खेड्यात विचार करून बांधले पाहिजे. पक्षी जे घराजवळ आढळतात त्यांना घरटी करण्यासाठी काही खोबण्या ठेवाव्यात, काही प्लास्टिकचे पाईप भिंतीत गाडून टाकावेत. अशा पाईपमध्ये चिमण्या घरटी करतील आणि त्यांची संख्याही वाढू लागेल. घराजवळ झाडे लावताना शेवगा, तुत्तू यासारखी झाडे लावावीत. शेवग्याच्या एका झाडावर तुम्हाला चष्मेवाला, दयाळ, तांबट, टोपीवाला, राखी वटवट्या, पोपट, यासारखे १७ ते २० पक्षी पाहायला मिळतील. शिवाय ६० रुपये किलोचा शेवगा आहारात मोफत. शेवग्यात तंतू खूप असल्यामुळे पोटाची समस्या नाही. कढीपत्ता, लिंबू यासारखी झाडे फुलपाखरांना आकर्षित करतात. अनेक फुलपाखरे या होस्ट प्लांटवर अंडी घालतात. ही झाडे लावल्याने आपला फायदा आहेच, त्यासोबत पर्यावरणाचा पण. म्हणजेच देशी वृक्षांची लागवड ही सुद्धा खूप महत्त्वाची बाब आहे. पर्यावरणाचे रक्षण हे केवळ जंगलात जाऊनच कार्याला हवे असे नाही तर या अशा प्रकारच्या छोट्या छोट्या कृतीतून सुधा अपम पर्यावरण रक्षणाचे खूप मोठे कार्य करू शकतो. अगदी मानवी वस्तीत राहूनसुद्धा आपण पर्यावरणाचा समतोल सांभाळायला हातभार लावू शकतो. असेच काही उपक्रम आम्ही आमच्या गावात करतो.
पिसावारे, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील डोंगराळ प्रदेशातील आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव. आम्ही पिसावरे गावात लोकांमध्ये अशा प्रकारची जागृती व्हावी म्हणून खूप वेगळे पण साधे उपक्रम राबवले. त्याचा फायदा आम्हाला या ५ वर्षात दिसून येतो आहे. या पैकी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे पर्यावरणातील घटकांची निवडणूक. या निवडणुकीत पिसवारे गावातील विद्यार्थी काही पक्षी उमेदवार म्हणून निवडतात मग त्यांचा गावात प्रचार केला जातो. सर्व गावकऱ्यांना त्या त्या पक्षांचे महत्व सांगितले जाते आणि निवडणुकीच्या दिवशी आपल्याला आवडलेल्या पक्षाला सर्व गावकरी मतदान करतात. आम्ही पक्षांविषयी जागृती व्हावी म्हणून गावपक्षी निवडणूक घेतली. जातेचश्मेवाला पक्षी विजयी झाला. पुढच्या वर्षी गाव फुलपाखरू निवडणूक घेतली यात पट्टेरी वाघ (Stripped Tiger ) हे फुलपाखरू विजयी झाले आणि या वर्षी गाववृक्ष या निवडणुकीत शेवगा विजयी झाला. हे लोकांपर्यंत पोहोचते आहे आणि परिणाम पण दिसून येत आहेत. अजून एक बोलके उदाहरण म्हणजे आमच्या गावातील एक गृहस्त जगन्नाथ बांदल यांच्या घराचे बांधकाम चालू होते या घरात घुबडाने ३ अंडी घातली, त्यांनी घुबडाची पिल्ले उडून जाईपर्यंत त्या भागातील काम न करता त्या तीन जीवांना वाचवले. घुबडाला किती अपशकुनी समजतात, पण आमच्या या छोट्या छोट्या पर्यावरण जागृती उपक्रमांमुळे आज गावात बदल घडून येताना दिसत आहेत. गावातील कुटुंब पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण संवर्धक झालेली पाहायला मिळत आहेत. पिसावरे गावाचे भविष्य असणारे शुभांगी जमीर, गौरी, विनायक, रविशा, विद्या, स्नेहल आणि असे असंख्य विद्यार्थी आपल्या खांद्यावर पर्यावरण रक्षणाची पताका घेऊन स्वतःची पणती या अंधारात लावून वाटचाल करत आहेत. हे चित्र फारच आशादायी आहे.
मनुष्य हा देखील पर्यावारणाचाच एक घटक आहे त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन हे मानवी समूहाच्याही हिताचेच आहे याची जाणीव ठेवून आपण केवळ एक दिवस नव्हे तर कायमच पर्यावरण रक्षणाचे कार्य केले पाहिजे. पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारली पाहिजे. हा संकल्प आजच्या दिवशी करणे म्हणजे खऱ्या अर्थाने पर्यावरण दिन साजरा करणे.
-संतोष दळवी
कृतीशील पर्यावरण प्रेमी, भोर.