चीनची घुसखोरी समजून घेताना!

युवा विवेक    22-Mar-2021
Total Views |

China_1  H x W:
 
 
सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागेल की आंतरराष्ट्रीय संबंध हे कायम वास्तववादी दृष्टीकोनातून पाहावे लागतात, आजच्या जागतिक व्यवस्थेत विचारधारेवर आधरित आदर्शवादाला कोणतेही स्थान नाही, मग तो चीन असो किंवा इतर कोणताही देश. सध्या भारत-चीन संबंधात आलेला तणाव आपल्याला विविध परिप्रेक्ष्यातून समजून घ्यावा लागेल.
भारत चीन दरम्यानच्या सध्याच्या घटना पाहू या
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लडाखमधील पांगोंग त्सो (त्सो म्हणजे सरोवर) आणि सिक्किममधील नथूला (ला म्हणजे खिंड) या दोन भागात भारतीय आणि चीनी लष्करात धक्काबुक्की आणि दगडफेक झाली. या संदर्भात ऑस्ट्रेलियातील सुरक्षा विश्लेषकांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेली उपग्रहीय छायाचित्रे महत्त्वाची आहेत, कारण या छायाचित्रांत प्रत्यक्ष ताबा रेषेच्या दोन्ही बाजूंना भारत आणि चीनने केलेली लष्करी उभारणी स्पष्ट दिसते.
अशा घटना भूतकाळातही घडल्या आहेत. मागे ऑक्टोबर २०१९ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात आलेले असताना चीनच्या सैन्याने भारतात घुसखोरी केली होती. सध्या भारत आणि चीन, सीमेवर किमान पाच ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
हे भारताच्याच बाबतीत चीन करत आहे असे नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चीनच्या तटरक्षक दलाच्या जहाजाने व्हिएतनामची मासेमारी नौका बुडवली. ज्यामुळे दक्षिण चीनी समुद्रात तणाव निर्माण झाला. एप्रिलच्या मध्यात दक्षिण चीनी समुद्रामध्ये चीनने नवीन दोन प्रशासकीय क्षेत्रे तयार केली आहेत. त्यात शीशा क्षेत्र (ज्यात पॅरासेल बेटे आणि मॅक्लेसफील्ड बॅंक प्रवाळबेटे यांचा समावेश आहे) आणि नान्शा क्षेत्र (ज्यात स्प्रॅटली बेटांचा समावेश आहे) ही दोन्ही क्षेत्रे चीन आणि इतर देशांमधील वादग्रस्त भाग आहेत. एकीकडे चीन हाँगकाँगच्या सार्वभौमत्वात कपात करत आहे. हाँगकाँगला दिलेल्या खास अधिकारात कपात करून त्याला उत्तरोत्तर चीनमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न चीन करत आहे.
भारत आणि चीनमधील झटापट ही तशी नित्याचीच बाब आहे तर या वेळचे वेगळेपण काय?
या वेळी चीनने एका वेळी अनेक भागात घुसखोरी केली आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेच्या आत सुमारे ३ किलोमीटरपर्यंत चीनी लष्कराने शिरकाव केला आहे. त्यामुळे भारताचा एकाच वेळी अनेक भागात चीनी लष्कराशी सामना झाला आहे. आत्ताच्या परिस्थितीत भारताची कोंडी अशी आहे की चीनी सैन्य अचानक भारतीय सीमेत घुसून आले. ते प्रत्येक ठिकाणी ८०० ते १००० च्या संख्येत होते. भारतीय सीमेच्या आत त्यांनी भक्कम तटबंदी असलेले तळ उभारले आहेत. त्यांना बाहेर घालवण्यासाठी लष्करी कारवाई करावी लागेल आणि त्याचे पर्यवसान सर्वंकष युद्धात होऊ शकेल. त्यामुळे भारतातील राजकीय नेतृत्त्व, करोना आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे या आघाड्यांवर गुंतलेले असताना, चीनने ही संधी साधली आहे.
या सर्व घटनांमागची कारणे अशी
करोना साथ ही चीनला आपले प्रभाव क्षेत्र वाढवण्याची संधी वाटते. शी जिनपिंगच्या नेतृत्त्वाखालील चीनची राष्ट्रवादाची मांडणी आणि स्वतःला सर्वशक्तीशाली दाखवण्याचा प्रयत्न या पार्श्वभूमीवर, शी जिनपिंगयांच्या धोरणाचे एका विस्तृत संदर्भातून अवलोकन करावे लागेल. चीन त्याचे विस्तारवादी धोरण पुढे करण्यासाठी करोना काळाचा उपयोग करत आहे. जेव्हा संपूर्ण जग करोनाशी लढत आहे तेव्हा चीनला रोखण्यास कोणीही धजावणार नाही. अशा चालून आलेल्या संधीचा पुरेपूर वापर करण्याचा त्याचा इरादा आहे.
भारत आणि चीन दोन्ही देशांनी जागतिक व्यापार संघटनेसारख्या ठिकाणी आपापसात सहयोगाचे धोरण ठेवले आहे, तरी आपल्याला हे मान्य करावे लागेल की भारत आणि चीन हे एकमेकांचे सामरिक स्पर्धक आहेत. चीनच्या दृष्टीकोनातून भारत हा त्यांच्या आशियावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या आकांक्षेच्या परिपूर्तीकडे जाणाऱ्या मार्गातील अडथळा आहे. भारताची जपान, अमेरिका यासारख्या देशांशी जवळीकीबद्दल चीनला काळजी वाटते, कारण चीन आणि भारत यांत अर्थव्यवस्था, लष्करी शक्ती, मुत्सद्देगिरी अशा अनेक भौतिक क्षेत्रामध्ये असमतोल आहे, त्यामुळे व्हिएतनाम, जपान, आॅस्ट्रेलिया, अमेरिका अशा देशांशी भारताने सामरिक संबंध निर्माण केल्यास भारत शक्तिशाली स्पर्धक बनेल, जे चीनला नको आहे.चीन-अमेरिका यांच्यातील खूप महिने चाललेल्या तणावाच्या आणि भारताच्या अमेरिकेबरोबरील वाढत्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर चीन भारताला दाखवू इच्छितो की भारत अमेरिकेबरोबर जर जवळीक साधत असेल तर चीन भारताच्या सीमांवर देखील अडचण निर्माण करू शकतो. हाँगकाँगच्या बाबतीतही चीनला हेच दाखवून द्यायचे आहे, कारण हाँगकाँगला अमेरिकेने पूर्वीच विशेष दर्जा दिला आहे आणि हाँगकाँग-अमेरिकेमध्ये विविध पातळ्यांवर घनिष्ठ संबंध आहेत.
या घटनांमागे दुसरे कारण असे की चीनवर त्यांनी कोविड-१९ संबंधातील माहिती लपवली असण्याविषयी जगातून टीका होत असताना, चीन अतीशय आक्रमक 'वृकायु योद्धा राजनय' (Wolf Warrior Diplomacy) वापरत आहे. चीनवर विविध मुद्द्यांवर जगातून दबाव येत असताना चीन मात्र कुरापती काढून जगाचे लक्ष कोविड सोडून इतर विषयांकडे वळवत आहे.
भारताच्या नेतृत्त्वापुढील आव्हाने
भारतात कोणतेही सरकार असले तरी त्याने चीनशी संबंध सुधारण्याला प्राथमिकता दिली आहे. २०१४ मध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधानांनी चीनला प्राथमिकता देऊन शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी जपान दौरा पुढे ढकलला. जून २०१७ मध्ये भारताचे पंतप्रधान आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये कझाकस्तानातील अस्ताना (आताचे नूर-सुलतान) येथे बैठक झाली. या वेळी भारत-चीन दरम्यानच्या पहिल्या अनौपचरिक परिषदेचे नियोजन केले गेले. ही परिषद एप्रिल २०१८ मध्ये झाली जी 'वुहान शिखर परिषद' म्हणून ओळखली जाते. यातून निर्माण झालेल्या भावनेला 'वुहान प्रेरणा' (Wuhan Spirit) म्हटले गेले. याच शिखर परिषदेचा दुसरा भाग म्हणून ऑक्टोबर २०१९ मध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आमंत्रित केले गेले, ही अनौपचारिक परिषद दक्षिण भारतातील मामल्लपुरम (महाबलीपुरम) येथे झाली.
सीमावाद मिटवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. जरी प्रत्यक्ष ताबा रेषा निश्चित असली तरी, कोणत्याही प्रकारे आपसहमतीने सीमावाद मिटवण्यात चीनकडून अडचणी उत्पन्न केल्या जातात. चीन मीटर मीटर जमीन ताब्यात घेऊन प्रत्यक्ष ताबारेषेची पुन्हा आखणी करण्याचा प्रयत्न करतो. भारताला स्वतःच्या भूभागाविषयी खात्री असली तरी चीन स्वतःच्या भूभागावरील दाव्यांना कधीच जाहीर करत नाही, त्याबाबत अस्पष्टता तशीच राहावी अशी चीनची इच्छा दिसते.
सध्याचा सीमेवरील तणाव लवकरात लवकर कमी झाला नाही तर तो नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. या घडीला भारत आणि चीन दोन्ही देशांतील राष्ट्रवादी जनमतांचा रेटा वाढल्यास दोन्ही देशांच्या नेतृत्त्वावर एकमेकांविरुद्ध कठोर पावले उचलण्यासाठी दबाव वाढेल ज्यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकेल.
जागतिक परिस्थितीचा विचार करता ती आर्थिक व सामरिक दृष्ट्या चीनसाठी अनुकुल आहे. चीनला त्याच्या शेजारील राष्ट्रांवर कुरघोडी करण्याविरूद्ध कोणतीच भूराजनौतिक किंमत चुकवावी लागली नाही. दक्षिण चीनी समुद्रातील यथास्थिती एकही गोळी न चालवता चीनने बदलली, असे असूनही त्यांच्या दक्षिण चीनी समुद्रातील कृत्यांबद्दल त्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय परिणामांना तोंड द्यावे लागले नाही. २०१८ मध्ये चीनने लक्षावधी मुस्लीमांना शिंच्याग प्रांतात अटक केली. त्याबद्दल त्यांच्यावर कोणतेही आंतरराष्ट्रीय निर्बंध घालण्यात आले नाहीत. सध्या चीन हाँगकाँगच्या सार्वभौमत्त्वावर घाला घालत आहे, जर त्यांना कोणतेही आंतरराष्ट्रीय परिणाम भोगायला न लागता हाँगकाँगचे सार्वभौमत्त्व संपवण्यात यश आले, तर त्यांच्या अनिर्बंधतेला खतपाणी मिळेल आणि भारत-चीन सीमा कायमस्वरूपी अशांततेत ढकलली जाईल.
अंतिम संधी
या विविध आघाड्यांवर तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या राजकीय नेतृत्त्वाला पुढाकार घ्यावा लागेल. भारताला पुढाकार घेऊन चीनला चर्चेला भाग पाडावे लागेल. त्यासाठी जगातील चीनविरोधाला संघटित करण्याची संधी भारताकडे आहे. चीनसंबंधात राजनय (Diplomacy) वापरताना सीमांतवर्तितेचा (Brinkmanship) वापर करावा लागेल. चीनच्या अनिर्बंधतेला लगाम घालण्याची ही शेवटची संधी आहे.
- पुष्कर एकबोटे