दार वाजले घराचे
कोण उभे अंगणांत?
अर्ध्या रात्रीचा पाऊस
तुझ्या वाजतो मनात
बाहेर मंद वारा वाहत होता. घरातल्या कुंडीतील रातराणी आपल्या सुवासाने वातावरण मंत्रमुग्ध करीत होती. गूढ आणि रहस्यमयी अंधाराला चिरत कुठे तरी अंधारव्रताची समयी तेवत होती. त्याच तंद्रीत काही आठवणी इतिहासात डोकावू लागल्या आणि मन भूतकाळात रमू लागलं. पुस्तकांच्या दालनात गेलो हाती लागलं ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’. ह्या काव्यसंग्रहातील 'कवच कुंडले' ही कविता त्या एका रात्री माझ्या मनाला येऊन धडकली आणि मी खडबडून जागा झालो. कवितेचे शीर्षक वाचूनच हादरलो. मुळात कवच कुंडले हा शब्द आपण फक्त कर्णासाठी वापरतो; पण ते आंशिक सत्य आहे. ह्या कवितेतील शीर्षक ग्रेस यांनी चक्क ‘रोमँटिसिसम’च्या अंतर्गत दिले आहे. मनाच्या गाभाऱ्यात कोणी येतंय, ह्या आनंदाच्या जवळ मला कवितेच्या प्रारब्धाच्या ओळी घेऊन जातायेत. ग्रेस यांच्या काव्याविष्कारात पाऊस किती निरनिराळी रूपके घेऊन आपल्याला नखशिखांत भिजवायला येतो. रात्रीचा धूसर प्रकार चहूकडे पसरला आहे. मौनव्रत धारण केलेल्या अवकाशातून रातवा जमिनीकडे आकर्षून बरसतो आहे. चंद्र आपल्या प्रकाशाने संपूर्ण धरेला न्हाऊ घालत आहे. दिवसभराची ती दग्धता त्या मृदेला विसरायला लावण्याची अलौकिक शक्ती चंद्राच्या प्रकाशात आहे. माझ्या मनाच्या अंगणांत कोण आलंय? मनाच्या तावदानांवर नेमक्या कोणाच्या येण्याची चाहूल झाली? माझ्या मनातल्या पावसात माझ्यासोबत माझी स्रग्धरा भिजतीये. माझ्या मनातल्या अंगणातून मी रात्रीचा पाऊस बरसताना बघतोय; पण हे काय ? पानांवर, अंगणातल्या अनैसर्गिक तयार झालेले पाण्याचे तळ आणि माझ्या अर्धगोलाकार केलेल्या मुठीत त्या पावसाचे थेंब पडताना कसला ही नाद निनादत नाहीये आणि क्षणार्धात ह्या साऱ्या टपोऱ्या आणि स्वभावाने कलंदर असणाऱ्या थेंबांचे हुंकार तुझ्या मनात कसे काय निनादात आहे स्रग्धरे ?
त्याच्या श्रावणधारांनी
हले घरातला दिवा;
तुझ्या पदरात निजे
आज प्रकाशाचा थवा!
स्रग्धरे! तुझ्या स्मरणात आहे का त्या श्रावणाचा तो संधीकाळ. तुझ्या येण्याचे निमित्त झाले आणि श्रावण अजूनच फलद्रुप झाला. हिरवे हिरवे गार गालिचे ह्या बालकवींच्या कवितेला तुझ्या स्वप्नाळू पापण्यांवर तोलून धरतेस; पण लक्षात ठेव त्या मदमस्त पावसाचा एक थेंबदेखील ह्या स्वप्नातून तुला बाहेर आणण्यासाठी सामर्थ्यवान आहे. तू फक्त तुझ्याच स्वप्नात न रमता माझ्याही स्वप्नदर्शी डोळ्यांच्या डोहात उतरावं. स्रग्धरे! माझ्या प्रार्थनेच्या तळाशी त्या ईश्वराचा अंश आहे. माझ्या प्रार्थनेने आणि त्यांच्या तळाशी असणाऱ्या ईश्वराने माझ्यासाठी श्रावणधारांना माझ्या घराच्या उंबरठ्यावर येण्यासाठी निमंत्रण दिले होते. अंगणातील पालापाचोळा भिजवत त्या श्रावणधारांनी स्वतःच्या येण्याची वर्दी दिली होती. घरातल्या अंगणात एक चांदण्यांच्या फुलांचा वृक्ष आहे. ह्या वृक्षाला मी कल्पवृक्ष म्हणतो, कारण माझ्या जागृत होण्याआधी गल्लीतल्या सगळ्या लहान मुली त्या वृक्षाच्या फांद्यांना गदागदा हलवून सगळी फुले आपल्या परडीत घेऊन त्या चांदण्यांच्या वृक्षाला आणि मला त्या दिवसासाठी अनाथ करून जातात. त्याच वृक्षाला लटकलेला एक दिवा मिणमिणतोय. त्याचा एकटेपणा त्या उदासीन संध्याकाळी चिरत जावा म्हणून श्रावणातील पाऊस अंगणांत त्या दिव्यापाशी वास्तव्याला आला आहे. त्या मिणमिणत्या दिव्याखाली तू तृषार्त बसलीये... अनेक बगळे तिथे येऊन तुझी सोबत करीत आहे. त्या मृदेने तुझ्या नकळत तुझा पदर एक मखमाली पांघरूण म्हणून पांघरला आहे. त्या मखमाली स्पर्शात बगळ्यांच्या थव्यांना अंगाई गीतांची अनुभूती येत आहे आणि मला त्या बगळ्यांच्या कोमल मऊ पिसांवर पावसाचे थेंब ओघळताना दिसताहेत. ते तुझ्या डोळ्यांतील अश्रू नाहीत ना? मी पाडगावकरांच्या ओळी तुझ्या हवाली करतो -
रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा...
अशी संचिताने चिंब
तुझ्या ललाटीची वेल;
एका अंगाईच्या पोटी
किती जन्मांची चाहूल
स्रग्धरे! तुझ्या सोबत घटित होणाऱ्या घटना, तुझ्या सोबत जगलेले सारे क्षण मला ह्या श्रावणाच्या धारेत चिंब भिजताना स्मरतायेत. एकमेकांच्या आठवणींमध्ये आपण अनेक काळापासून रममाण होतो आणि भेटीचा सुवर्णयोग आज आला. ह्याचा अर्थ आठवणी व्यर्थ होत नाहीत. त्या आठवणी आपल्या संदर्भांची साक्ष पटवून देतात. संदर्भ किंवा अनुभव अनेक वर्षांचा असू शकतो. साक्षात्काराला एक क्षण पुरेसा असतो. हे सगळे अनुभवाचे क्षण तुझ्या-माझ्या झोळीत जमा झालेले संचित आहे. त्यातल्या सगळ्या घटना ह्या आपण सजवलेल्या जाईच्या हुंदक्यांची मालिका आहे. हे एव्हाना तुझ्याही लक्षात आलं असेल. तुझ्या-माझ्या देहवृक्षाला ह्या हुंदक्यांची मालिका जाईच्या वेलीच्या स्वरूपात लगडलेली आहे -
चांदणे तसे झिलमिळले
झाडांच्या वृद्ध ललाटी..
त्या चांदण्याच्या वृक्षाखाली तू बसलेली असताना, बगळ्यांचे थवे तुझ्या पदरावर निजलेले आहे. तुझ्या एक लक्षात आले का स्रग्धरे! तू गायलेली समस्त अंगाई गीते ही आजची किंवा ह्या जन्माची नाहीत. अनेक जन्मांची पार्श्वभूमी त्या अंगाई गीतांना लाभली आहे. ही भुई..ही त्रयी..वर छत्रसमान असलेले निळंशार नभ..त्यातून जन्मणारे आणि नभाचे खंडित रूप ‘मेघ' हे सगळे तुझ्या अंगाई गीतांसाठी अनेक जन्मापासून आसुसलेले आहे. तू त्या अंगणांत अंगाई गीते गाण्याचे थांबविले आणि इथे निसर्गचक्र क्षणार्धात थांबला आहे. ह्या निसर्गचक्राचा मार्गक्रमण योग्य व्हावे म्हणून तू अंगाई गीते गा स्रग्धरे... तू हे का विसरते स्रग्धरे... तू आणि मी प्राचीन काळापासून इथल्या कणाकणांत सामावून आहोत. इथली मृदा इथला अवकाश ह्यांचा जन्म आताचा आहे. आपण अनादीकाळापासून इथले संदर्भ आणि साक्षात्कारांचे सांधे जोडत आहोत..
ऊन वेचता मनात स्पर्श लाघवी जळे
नि सांज - रंग पांघरून गगन जन्मले निळे...
बाळगंगेच्या ओळींनी
तुझे घर पाणी झाले;
अशा धारेत वाहू दे
माझी कवच कुंडले...
ह्या जगासाठी मी त्या गंगेला जान्हवी म्हटले आहे. कारण त्यांच्यासाठी ती जीवनदायनी आहे. एका ठिकाणी मी म्हणतोय की,
गंगे गंगे जान्हवी गे!! माझे पाय ओढून घे..
तुझ्या खोल डोहामधली एक भूल मला दे...
हे अनादी स्त्री! हे जान्हवीचे रूप तुझ्यासाठी नाहीये. तू त्या गंगेच्या तळाशी असणारं स्त्रीत्वाचं मुख्य बीज आहे. तुझ्यातून त्या गंगेचा जन्म झालेला आहे. तुझ्यासाठी ती गंगा तुझ्या बाळाचे प्रतीक आहे. गंगेच्या स्वभावातच मुळात तरलता आहे. तो आयुष्याचा प्रवाह आहे. आयुष्यातील प्रखरतेला - दग्धतेला शीतल करण्याचे पातक गंगा आपल्या शिरी घेते आणि तुझी महती अशी की, हे पातक तू गंगेला न लागू देता स्वतःवर घेते. शूलपाणींच्या जटेत तू आपले बाळ दान केलेस, त्या वेळी तुझ्या मातृत्वाच्या भावना मेल्या होत्या का स्रग्धरे...
पार्वतीच्या पायाखाली भडकली आग
जटेतली गंगा गेली तिच्या मागो माग..
चंद्रकोर सुनी सुनी गंगेसाठी झुरे
कोणासाठी कोण मरे, कोणासाठी कोण उरे ?
तुझ्या बाळगंगेच्या अलवार तरल आणि प्रवाही स्वभावाने तुझे स्वतःचे गेह तिच्या पाण्याने भरून ओसंडत आहे. स्रग्धरे मी माझ्या अंगणातील, चांदण्यांच्या वृक्षाला श्रावणधारांनी बंदिस्त केले आहे. हे माझे कवच आहे. तुझ्या आठवणींचे संदर्भ माझी कुंडले आहेत. गंगेला जान्हवी मानणारे हेच समजतात की, फक्त कर्णाला कवच कुंडले होती; पण ती कवच कुंडले मुळापासून मी धारण करून वावरतोय. स्रग्धरे, हे आता तरी तू ह्या साऱ्यांना सांग. माझी कवच कुंडले तू तुझ्या बाळगंगेच्या पाण्यात प्रवाहित करून टाक. त्या कवच कुंडलांची प्रखरता थोडी कमी होऊ दे. त्यांचा देह दुराव्याच्या भयाण अग्नीने जळतोय. त्या अग्नीला शांत कर...
स्रग्धरे! तुझ्या भेटीची उब मला पुरेशी आहे. तुझ्या आठवणींमध्ये रमताना मला स्वतःला कुठे तरी जिवंत ठेवायचे होते; म्हणून माझी ही सारी कवच कुंडले मी धारण केली होती. ते सगळे माझे कुंपण सगळे कवच तुझ्या बाळगंगेत मी प्रवाहित करीत आहे..त्यांनी मला मोलाची साथ दिली तू ज्या वेळी माझ्या जवळ नव्हती; त्या वेळी.. त्यांचा मोठ्या मनाने स्वीकार कर. त्या कवच कुंडलांच्या दाहकतेने माझं अंगांग पेटत आहे. मीदेखील स्वतःला तुझ्यात सामावून देत आहे...
माझ्या स्वीकार कर स्रग्धरे! माझा स्वीकार कर!!
पेटून कशी उजळेना त्या शुभ्र फुलांची ज्वाला
ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला!!
- मृणाल जोशी