चिमणीच्या दाण्यावरी घुबडाचा डोळा
कुणी केला नवरीचा देह चोळामोळा?
नवऱ्याला वरदान धुंडायाचा माळ
जोडगड्यांच्या पायातले शोधण्यास चाळ
कोण्या एका स्त्रीची गाथा काय असेल असं जर का कोणी मला विचारलं तर त्याच्या हवाली मी ग्रेस यांची ही कविता करेन. नवरीचे उखाणे ह्या ओवीबद्ध आत्मानुभूतीला “कविता”; असं लिहिताना देखील हात थरथरू लागतात. एका कोवळ्या अल्लडश्या मुलीचे आत्मकथन ह्या काव्यबंधात ग्रेस यांनी बांधून ठेवले आहे. ती मुलगी तुम्हा आम्हाला सर्वांना उखाण्यात अनेक कोडी घालत आहे आणि ह्या कोड्यांचे ती उत्तर मागत नाही फक्त शेवटी प्रश्न सोडून निर्जनवासात निघून जात आहे. एका घरात राहणाऱ्या चिमणीवर बाहेरच्या पुरुषी अहंकाराची सावली पडते आणि तो पुरुषी अहंकार म्हणजे समाजात दिसणारे किंवा अदृश्य रूपाने फिरणारे नजरेत - मेंदूत आणि विचारांमध्ये घुबडी संस्कृती बाळगणारे तुम्ही- आम्ही. त्या मुलीवर - चिमणीवर अशा कित्तेक लोकांच्या कलुषित नजरा आहेत. ह्या साऱ्या नजरांनी त्या चिमणीचा देह त्या शेजेवर नंतर चुरगाळला जातोय, त्याही आधी प्रथमतः तो त्या पुरुषाने आपल्या मेंदूत आणि डोळ्यात कुस्कारला आहे आणि अशा समाजात मुक्त फिरणाऱ्या पुरुषाला आपण वरदान समजतो आणि मुलीच्या पायात जोडव्यांची मर्यादा बांधून आपला
षंढपणा समाजापुढे प्रस्तुत करतो.
चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय,
वाघिणीच्या दुधावर आली कशी साय?
रातोरात नवरीला पान्हा आला बाई
चांदण्यांच्या मागेपुढे हुंदक्यांची जाई...
भय इथले संपत नाहीची पार्श्वभूमी म्हणजे - चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय..जिथे चंदन उगवले आहे तिथे कुठे तरी जाळण्याची आणि जळण्याच्या वृत्तीने देखील जन्म घेतला आहे. कुठल्यातरी कोपऱ्यात ती वृत्तीदेखील स्वतःचे संगोपन करत आहे. इतकी वर्षे जपलेल्या मुलीला एका परपुरुषाच्या हाती देणं म्हणजे जीवाची किती घालमेल असते त्यात एक अशा भयाणरात्री ज्या वेळी ती अल्लड मुलगी देहादिव्यातून पार होते आणि त्या कुठल्या अंधारलेल्या रात्री तिला पान्हा फुटतो... आई होण्याचे स्वप्न बघण्यासाठी तिला स्वतःच्या मुलगी असण्याच्या मूळ वृत्तीवर करकचून पाय ठेवावा लागतो... पुढच्या येणाऱ्या स्वप्नांसाठी कालच्या सुखाच्या चांदण्यांची हुंदक्यांची मालिका सजवावी लागते... केवढी मोठी शोकांतिका आहे.
अंगणात मायलेक, गोंजारती मैना
पिंजऱ्यात पाहवेना पोपटाची दैना
ओटीपोटामध्ये झाला नवरीला भास
वाऱ्यावर वाहुनिया कोण नेई श्वास?
ग्रेस यांची कुठल्याही मुलीबद्दल धारणा एका देवीची आहे. ग्रेस नेहमी सांगायचे की मुलगी किती ही लहान असो किंवा मोठी मी आधी त्या माउलीचे पाय धरणार, पण हे संस्कार पुरुषी समाजात खोलवर रुजायला अजून बराच काळ जावा लागणार आहे असं एकूण चित्र दिसून येतंय. एका जागी ग्रेस म्हणतात की -
मन सैरभैर होताना कंदील घरांतील घ्यावा
संध्येच्या पारावरती उजळून हळू ठेवावा
माहेरच्या पारावरती हा संध्येचा कंदील उजळून ठेवला तरी तो नंतरही तेवढाच तेजोमय असेलच ह्याची शाश्वती कुठेही ग्रेस देत नाहीयेत. तसं पाहिलं तर ग्रेस यांनी अंगणाला देखील मर्यादेत बांधलेलं आहे पण त्या मर्यादेत मायेचा ओलावा आहे. एका पिंजऱ्यात अडकलेली पक्षिणी जशी तळमळते नेमकी तीच तळमळ एका कोरड्या ठणठणीत असणाऱ्या मनांच्या पिंजऱ्यात मुलीची होताना सांगून ग्रेस नेमकं मुलींच्या जखमेवर बोट ठेवून जातात. जन्मापासून ते शेवटल्या श्वासापर्यंत स्त्रीच्या मूळ स्वभावात किती बदल होताना दिसतात. हा बदल ती मुलगी किती प्रचंड ऊर्जेने स्वीकारते हे खरोखर कौतुकास्पद आहे, पण त्याच्या कितीतरी पटीने कोड्यात टाकणारे आहे. कालची अल्लड तरुणी एका क्षणात मासिकधर्म स्वीकारून मुलगी झाली आणि त्याच्या पुढच्या क्षणी पोक्त बाई आणि देहादिव्यातून बाहेर पडल्यावर तिच्या पोटी निसर्गाने नवीनच कोडे घालून तिला अधिकच बुचकळल्यात पाडलं आहे. तिच्या पोटी नवीन श्वास जन्मास आला आहे की तिच्या मूळ स्वभावाचा मुख्य श्वास वाऱ्यावर उडून अजून कुठे गेला? सगळंच अचंबित करणारं!!
जोडव्याचा काचामध्ये सुजलेले बोट
वळिवाचे पाणी लागे गाभाऱ्याला थेट
नवरीचे माय आता रडतेस काय
सारणाचे लाकूडही सडुनिया जाय
एका शब्दामागे, भावनेमागे मैलोन्मैल विचार करण्यासाठी ग्रेस प्रसिद्ध आहे. मर्यादेत बांधलेल्या एका स्त्रीची अजब कहाणी ह्या काव्यबंधनातून प्रकट करतात. स्त्रीचे दागिने हा स्त्री साठी सुंदर पण तितकाच त्रासदायक विषय आहे, त्या दागिन्यांनी एका स्त्रीला कसं बांधून ठेवलं आहे किंवा असं म्हणू या कि ह्या दागिन्यांनी तिच्यावर नको ती बंधने लादली आहे. स्त्रीचे सुंदर पाय सर्वात चंचल असतात तिच्या मनाहून ही अधिक चंचल. तिच्या पायातील चंचलता समाजाने जोडव्याने बांधण्याचा प्रयत्न केला. ह्या साऱ्या घटनाक्रमांत आपण त्या स्त्रीला मर्यादेपेक्षा एक काटेरी कुंपण घालत गेलो ह्या विचाराने देखील आपण अस्पृश्य राहिलो . मर्यादा आणि कुंपण ह्यात एक अदृश्यसा फरक आहे. हा फरक नेमका जोडवे न घालणारी अल्लड मुलगी आणि जोडवे धारण करणारी एक स्त्रीत आहे तेवढाच. नवरी उखाणे घेताना तिच्या जन्मदात्रीलाच सुचवू पाहते आहे.
की गे माय तुझ्या स्वतःच्या सरणाचे लाकूड एका विशिष्ट काळापलीकडे सडणारच आहे तिथे तू माझ्या मनाच्या घालमेल
साठी एवढी का रडते आहे?
नवरीचा चंद्र बाई उशीखाली ठेवा
जीव कापताती त्याचा साऱ्यांनाच हेवा
साऱ्यांनाच ठेवा त्याची मला नाही खंत
खडावात महारोगी माझ्यासाठी संत
ग्रेस यांच्या नजरेतील नवरी आपल्या उखाण्याचा शेवट मोठ्या वेगळ्या वळणांवर करते. नवरी स्वतःबद्दल सांगते की माझा चंद्र म्हणजे माझी शीतलता, सृजनशीलता, त्याच सोबत सहनशीलता तुम्ही तुमच्या पदरा खाली ठेवा. नवरी पौरुषी समाजाकडून डिवचून आणि तितकीच घायाळ होऊन सांगू पाहते - आयुष्यात जे जे पुरुष तिच्या समोर आले त्यांनी समाजात त्यांचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी माझ्या चंद्राशी राजरोसपणे खेळ सुरूच ठेवला आणि ह्या मालिकेची सुरुवात माझ्या जन्मदात्या पितापासून ज्यांनी माझ्या जन्मासाठी देखील एका स्त्रीला शेजेवर देहादिव्यासाठी बाध्य केलं ते सरणापर्यंत येणाऱ्या जोडीदारापर्यंत झाली ज्याने निरनिराळ्या प्रकारे माझ्यावर काटेरी कुंपण घालून नेहमीच मला बांधून ठेवलं, हे सारेच माझ्या दुःखांना शृंगारू बघत होते. सजवू पाहत होते. मला ह्या साऱ्याची ही खंत नाही कारण तुमच्या पारावर लावलेला तो लामणदिवा, तुमची संध्याकाळ उजळावी म्हणून तुम्ही माझे आयुष्य जाळून पेटवलेले कंदील कधी तरी कुणाच्या तरी अंगणात विझणार आहेच. इतकं असूनही मनाने महारोगी असणाऱ्या तुमच्या समाजाला आणि पुरुषी अहंकाराला मी माझ्यापुरता संत मानायचं....??
शेवटी ग्रेस यांची नवरी आयुष्यातील अनेक उखाणे घालून आपल्याला कोड्यात घालते आणि आपली शोकांतिका म्हणजे आपल्याकडे तिच्या प्रश्नांचे उत्तर नाहीत...म्हणूनच कदाचित आपण महारोगी!!
- मृणाल जोशी