सोन्याच्या पिंजऱ्यातील राजकुमारी

युवा विवेक    17-May-2021   
Total Views |

princess_1  H x 
माणसाला आनंदी, सुखी राहण्यासाठी कशाची गरज असते? खूप पैसा, श्रीमंती असेल तर आपण सुखी असतो का ? काही जण हो म्हणतील, काही जण नाही म्हणतील. मात्र, कोणी असं म्हटलं की, पैसा कमावण्यासाठी काहीही करायची गरज नाही, घरबसल्या काहीही न करता तुम्हाला अमाप संपत्ती मिळाली आहे आणि ती तशीच राहणार आहे, तुम्ही केवळ उपभोग घ्यायचा. सुखात राहायचं. मात्र, तुम्हाला कोणतेच स्वातंत्र्य नाही. तुम्ही सदैव बुरखा घालायचा. विविध बंधनात राहायचं. तर....? ते सुख तुम्ही उपभोगू शकाल? त्या आनंदाचा सोहळा करू शकाल? याचं उत्तर मात्र सर्व जण नाही असंच देतील...!
ही गोष्ट अशाच एका राजकुमारीची आहे. ही गोष्टीतली खोटी राजकन्या नाही, तर खरीखुरी राजकन्या आहे. ही व्यथा कोण्या एका राजकन्येची नाही, तर अनेक जणींची आहे. पुस्तकाच्या लेखिका आहेत Jean Sasson आणि ते पुस्तक आहे, Princess: A True Story of Life Behind the Veil in Saudi Arabia
आपल्याला माहीत आहेच की, सौदी अरेबिया हा तेलसंपन्नतेमुळे प्रचंड श्रीमंत असलेला एक वाळवंटी मुस्लिम देश आहे. तिथे अजूनही राजसत्ताक पद्धत अस्तित्वात आहे. मात्र, तेथील राजघराणे इंग्लंडच्या राजघराण्याप्रमाणे नाही. सौदी अरेबियाचा पहिला राजा अब्दुल अजीज इब्न सौद. त्याच्या पत्नी, मुले, भावंडे, त्यांची मुले, नातवंडे, इतर नातेवाईक असे सगळे मिळून आजमितीला ह्या राजघराण्याचे पंधरा हजार तरी वंशज आहेत. ह्याच घराण्यातील एका राजकुमारीची, सुलतानाची गोष्ट ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.
पुस्तकात सुलताना, तिचे लग्न, लग्नानंतरचे सहजीवन, तिच्या मुलांचा जन्म, तिचे नवर्‍याबरोबरचे भांडण ह्याचे वर्णन आहे. राजकन्या असली तरी आपले लग्न कोणाबरोबर व्हावे ह्याचा काडीमात्रही अधिकार तिला नाही. खरं म्हणजे, त्या देशात तो कुठल्याही स्त्रीला नाही. आपल्या नवऱ्याचे वय आपल्या दुप्पट आहे किंवा त्याची आधीच तीन लग्ने झालेली आहेत, असे कुठलेही कारण नकार द्यायला पुरेसे नाही. सुदैवाने सुलतानाचे लग्न समवयस्क आणि सुशिक्षित करीमशी होते. त्यांचे महालात राहणे, फक्त एकच महाल नाही, पण जगभरात अनेक ठिकाणी अनेक महाल असणे, सगळीकडे स्वतःच्या विशेष विमानाने फिरणे, असंख्य नोकर-चाकर, दागिने, मौल्यवान रत्ने, महागड्या गाड्या ह्यांची रेलचेल अशा कल्पनेपलीकडच्या श्रीमंतीचे उल्लेख पुस्तकात आढळतात.
हा सगळा अतिश्रीमंती थाट असला तरी, सुलतानाला आणि पर्यायाने सर्व स्त्रियांना असलेले शेवटचे सामाजिक स्थान, बायको म्हणजे नवर्‍याची गुलाम अशी खोलवर रुतलेली समजूत, बुरख्याची सक्ती, त्या सक्तीची अंमलबजावणी होण्यासाठी जागोजागी असलेले धार्मिक पोलिस, पूर्ण परावलंबित्व, ह्या गोष्टी त्या श्रीमंतीला छेद देऊन जातात वाचताना मन विषण्ण होत जाते. स्त्री शिक्षणाचा आणि मुख्यतः सामाजिक सुधारणांचा अभाव, सुलतानाच्या तरुण बहिणीचे ६० वर्षांच्या माणसाशी लावून दिलेले लग्न, सुलतानाची आई वारल्यानंतर, सुलतानाच्याच वयाच्या एका मुलीशी वडिलांनी केलेले लग्न, छोट्याशा चुकीसाठी फक्त स्त्रियांना देण्यात येणार्‍या अमानवी शिक्षा, जगण्याच्या प्रत्येक अंशावर असलेले पुरुषी वर्चस्व हे एका बाजूला आणि सुलताना व तिच्या नातेवाईकांकडे पाण्यासारखा वाहणारा पैसा, आपण कल्पनाही करू शकत नाही अशा कारणांसाठी केलेली पैशाची उधळपट्टी अशा दोन परस्परविरोधी टोकांवर ही कादंबरी झुलत राहते.
स्वतःच्या मूळ बंडखोर स्वभावामुळे नवर्‍याची गुलामगिरी पत्करू न शिकणारी, स्वतः शिवाय अजून कोणालाही पत्नीचा दर्जा देऊ नये यासाठी नवऱ्याकडून वचन घेणारी, बहिणीचा सासरी छळ झाल्यावर तिच्या मदतीला धावून जाणारी, भावाच्या हुकुमशाह वर्तणुकीला पदोपदी विरोध दर्शवणारी, आणि देशातील इतर स्त्रियांची सतत होणारी मुस्कटदाबी पाहून घुसमटणारी सुलताना इतर स्त्रियांहून खूप वेगळी वाटते. तिचा नवरा करीम दुसरे लग्न करणार अशी शंका वाटताच ती त्याच्या विरोधात उघड उघड बंड पुकारते. आपल्या मुलांना घेऊन युरोपला पळून जाते आणि दुसरे लग्न करणार नाही असे नवऱ्याकडून कायदेशीर वचन घेऊनच घरी परत येते. सौदी अरेबियामध्ये प्रवास करण्यासाठी बायकोला नवर्‍याची परवानगी लागते आणि नवरा बायकोच्या भांडणात जर बायकोचा बळी गेला तर, नवर्‍यावर काहीही कारवाई होत नाही. ह्या पार्श्वभूमीवर सुलतानाचे वागणे प्रचंड धाडसाचे ठरते.
जगातील सर्वाधिक श्रीमंत राजघराण्यातील लोकांच्या आयुष्यात या कादंबरीच्या निमित्ताने डोकावायला मिळते. तसेच, सौदीतील चालीरीती, परंपरा, ह्याचीही माहिती मिळते. राजघराण्यातील स्त्रियांची ही अवस्था असेल तर सर्व सामान्य स्त्रियांची काय परिस्थिती असेल असा विचार सतत मनात येऊन जातो...
मुस्लिम देशातील बुरख्याआडून जगणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्याची एक झलक हे पुस्तक वाचून नक्कीच पाहायला मिळते. या पुस्तकांची एक मालिकाच आहे. त्यात तीन पुस्तकांचा समावेश होतो. त्यापैकी आपण आता आढावा घेतला ते पहिले, Daughters of Arabia हे दुसरे आणि Princess: more tears to cry हे तिसरे पुस्तक आहे. इच्छुकांनी ही पुस्तकेदेखील वाचावीत.
- तन्मयी जोशी