विश्व बनवण्याची पाककृती

युवा विवेक    16-Jun-2021   
Total Views |

World_1  H x W: 
जगभरात घडणाऱ्या क्रियांचा कार्यकारण भाव समजून घेणे मानवाला फार पूर्वीपासून आवडत आले आहे. त्यापैकी एक म्हणजे मानवाला आकाशात नक्की काय काय आहे, हे जाणून घेण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यातील चंद्र, सूर्य, तारे यांचे चलनवलन समजून घेणे मानवाने सुरू ठेवले आहे. यापैकी काही प्रश्नांची उत्तरे मानवास प्राप्त झाली आणि काही प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. याच प्रश्नांचा मागोवा आजकालचे वैज्ञानिक आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या अभ्यासातूनच पुढे आलेली गंमत म्हणजे, आपल्याला विश्व तयार करायचे असेल तर, नक्की काय करावे लागेल या प्रश्नाचे उत्तर!
मंडळी आपल्याला आपल्यासारखेच विश्व अगदी शून्यापासून तयार करावयाचे आहे. यासाठी नक्कीच आपल्याला साहित्य लागणार, तर मग यादी करायला घ्या! विश्व तयार करण्यासाठी जे दोन मुख्य घटक लागतात ते म्हणजे सुमारे २५ टक्के डार्क मॅटर आणि ७० टक्के डार्क एनर्जी. डार्क मॅटर म्हणजे असा पदार्थ ज्याबद्दल आपल्याला अद्याप सविस्तर माहिती ठाऊक नाही. प्रकाशानेदेखील या पदार्थाचे गुणधर्म बदलत नाहीत. फक्त आपल्याला अभ्यासाने हे लक्षात आले आहे की, गुरुत्वबल आणि इतर बले यांचा या डार्क मॅटरवर परिणाम होतो. डार्क मॅटर कशापासून तयार झाले हेसुद्धा आज आपण सांगू शकत नाही. मात्र, आपण हे खात्रीने सांगू शकतो की, आपल्याला आज दिसते असेच विश्व तयार करायचे असेल तर, डार्क मॅटरचा २५ टक्के भाग आपल्याला निश्चित लागणार आहे.
दुसरा लागणारा घटक म्हणजे डार्क एनर्जी. डार्क एनर्जी तर डार्क मॅटरपेक्षाही गूढ आहे. आपले विश्व सतत प्रसारण पावते आहे. असे का होते, हे आपल्याला ठाऊक नाही. आजदेखील विज्ञानाला हे कोडे उलगडलेले नाही. त्यामुळे वैज्ञानिकांनी असं ठरवलं की, या प्रसारण पावण्याच्या क्रियेमागेसुद्धा नक्कीच कोणते तरी बल कार्यरत असणार. मात्र, ते बल गूढ असल्याने वैज्ञानिकांनी त्याला डार्क एनर्जी असे नाव दिले. समजा तुमच्याकडे एखादा रिकामा डबा आहे आणि त्या डबात हवा, पदार्थ अथवा कोणताही किरणोत्सर्ग नाही अथवा इतर काहीही नाही तर मात्र त्यात डार्क एनर्जी आहे असे आपण म्हणतो. तर. मंडळी आता ९५ टक्के घटक तर आपण जमवले. आता उरले ते शेवटचे ५ टक्के. आता हा शेवटचा भाग म्हणजे आपल्याला दिसणारे पदार्थ, म्हणजेच आपण ज्या मुलभूत तत्त्वांपासून तयार झालो आहोत, ते जसे की अणु, रेणू इत्यादी. या अणु-रेणूंपासून बनलेले सर्व पदार्थ पाच टक्क्यांमध्ये येतात. इथे आपल्या विश्व बनवण्याच्या पाककृतीसाठी लागणारे सर्व पदार्थांची यादी पूर्ण झाली. आपण पाहिलं की, विश्व प्रसारण पावत आहे. तर, वैज्ञानिकांनी काही वर्षे मागे जाऊन म्हणजे सुमारे १३ कोटी वर्षे मागे जाऊन हे सिद्ध केलं की हे विश्व आता आहे त्यापेक्षा तेव्हा फारच वेगळं होतं. हे विश्व एखाद्या सफरचंदाच्या आकाराचं होत. मात्र त्याचं तापमान कित्येक कोटी अंश सेल्सियस होतं. त्यानंतर मात्र ते प्रसारण पावत गेलं आणि त्याचं तापमानदेखील थंड होत गेलं आणि आता सध्या आपल्याला जे दिसते आहे त्या परिस्थितीत आपले विश्व आलेले आहे. अजून काही कोटी वर्षांनंतर आताच्या विश्वाचा पसारादेखील आणखी वाढणार आहे आणि त्याचं स्वरूप बदलणार आहे. त्यामुळेच असे विश्व बनवणे हे केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे !
तर मंडळी अशी सर्व परिस्थिती आज निर्माण करण हे अशक्यच आहे. त्यामुळे आपल्याला असं विश्व बनवणंसुद्धा अशक्यच. म्हणूनच मग आपण आपल्या असलेल्या विश्वाचे अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे !
- अक्षय भिडे
8087690365