स्तब्ध बोडके पिंपळपान : अक्षय संत

युवा विवेक    08-Jun-2021
Total Views |

Bodke_1  H x W: 
नुकतीच जयवंत दळवींची 'अंधाराच्या पारंब्या' ही कादंबरी वाचली. याच कादंबरीवर आधारित 'बॅरिस्टर' हे गाजलेलं नाटक अनेकांना ठाऊक असेलच....
सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या भारतीय समाजातील स्त्रीचं स्थान, तिची कुचंबणा, त्या वेळी प्रचलित असलेल्या रूढी-परंपरा असे अनेक सामाजिक कंगोरे हाताळतानाही तो विषय तेवढ्यापुरताच मर्यादित न ठेवता त्यातूनही दळवी माणसांचा, मानवी स्वभावाच्या वैशिष्ट्यांचा संवेदनशीलपणे शोध घेत राहतात. त्यामुळेच 'अंधाराच्या पारंब्या' ही केवळ एका कुटुंबाची कथा न राहता ती एक वैश्विक शोकात्म अनुभव होऊन उलगडत जाते. त्याच कादंबरीच्या निमित्तानं केलेलं हे मुक्तचिंतन....
दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर.....
वाकलेल्या स्तब्ध झाडाच्या लांब लोंबत्या पारंब्या... एका वृद्ध वाड्याच्या काठावर उभा असलेला वृद्ध पिंपळ... सगळ्या वाड्यालाच विळखा घालून बसलेला काळाकुट्ट अजगरच जणू... एकेका क्षणाची एकेक पाकळी राधाक्काच्या केसांत माळलेल्या फुलासारखी सुकत चाललीय हळूहळू... पहाटेच्या खिन्न काळोखात मावशीबाई बोडक्या डोक्यावर घागरघागर पाण्याचं अर्घ्य ओततायत.... आपल्याच बोडक्या जगण्याच्या नावाचं..... मुंग्यांची सरकत जाणारी रांग थांबतच नाही... आरामखुर्चीचा डुलणारा काटा बालगंधर्वांच्या स्वरांवर हेलकावत राहातो पंख्यासारखा... त्या अंधारात नाचणारी एक नग्न ज्योत... विझतच नाही कितीतरी दिवस, पण फडफडत राहाते आज ना उद्या विझण्याच्या निराशेवर... काडीच्या आवाजानंही दचकणारा, भेदरणारा तो वाडा पाईपच्या धुराने वावटळीतल्या पिंपळपानांसारखा चौखूर उधळतो, गंधित होतो..... एका बाजूला खिडकीतल्या अंधारात लुकलुकणारे राधाक्काचे दोन आतुर डोळे..... दुसरीकडे माजघरातल्या कंदीलप्रकाशात कितीतरी वर्षांची शरीरभूक शमवणारे मावशीबाईंचे कोरडे ओठ..... त्या तिकडे, फरशीच्या थंड दगडावर रोवलेली नानाची शुष्क नजर..... आणि वरच्या खोलीत फ्लोरियाच्या पत्रांनी घळघळत कोसळणारी बॅरिस्टरची संततधार.... काय संगती आहे या साऱ्या विसंगत जगण्यात?? एक भुकेली जीवनलालसा? की काठोकाठ ओथंबलेलं अतृप्त रिकामपण? बॅरिस्टर रोज ग्रामोफोनला किल्ली देऊन बालगंधर्वांची तीचतीच पदं ऐकत राहतो.... मावशीबाई रोज त्याच पिंपळाभोवती गोलगोल फिरत शंभर प्रदक्षिणा घालत राहातात..... राधाक्का पुन्हापुन्हा बागेतली फुलं माळत राहाते..... भाऊराव आपल्या बापाच्या क्रूर, रंगेल आठवणींनी पुन्हा पुन्हा ठिणगत, ठणकत राहातो..... आरामखुर्ची एकाच जागी डुलत राहाते वर्षानुवर्षं आणि मुंग्याची रांग पुढेपुढे धावत राहाते..... अजूनही तो वाडा गंधाळतो कधी कधी बॅरिस्टरच्या फ्रेंच कलोनच्या धुंदावत्या वासानं..... अजूनही भाऊरावांचा पुटपुटता मंत्रजागर तिथे ऐकू येतो, अजूनही लाल आलवणातल्या मावशीबाईंचा चेहरा खिडकीतून डोकावताना दिसतो अंधुकसा, अजूनही राधाक्का बॅरिस्टरच्या एका नजरेसाठी गोठून बसलीय तिथं आपलं बोडकं डोकं मिरवत आणि अजूनही तो पिंपळ थरथरतो बग्गीच्या टापांच्या आवाजानं... अंधाराच्या पारंब्यांचा विळखा अजून गडद होत जातो संध्याकाळच्या शांत प्रहरी आणि अचानक माडीवरच्या खोलीतून बालगंधर्वांचा करुण स्वर ती शांतता चिरत जातो..... 'खरा तो प्रेमा, ना धरी लोभ मनी...."
'बॅरिस्टर' पाहू शकलो नाही ते एका अर्थी बरंच झालं.... पारंब्यांचा विळखा आणखी दाट झाला असता..... मोक्ष अटळ ठरला असता.....
- अक्षय संत