द काइट रनर

युवा विवेक    10-Jul-2021   
Total Views |

kite_1  H x W:  
अफगाणिस्तान... मध्य पूर्व आशियातील एक महत्त्वाचा देश! भारतीयांसाठी या देशाचे नाव एकदम प्रकाशझोतात आले ते 'इंडियन एअरलाइन्स'च्या विमानाचे अपहरण झाले तेव्हा. ते विमान तेव्हा कंदहार येथे उतरवण्यात आले. त्या विमानतळावर बंदुका घेऊन वावरणारे तालिबानी अनेक जणांनी पहिल्यांदा टीव्हीवर पाहिले आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानंतर अमेरिकेत 'ट्विन टॉवर'वर झालेला हल्ला आणि त्यानंतर झालेल्या युद्धामुळे काही वर्ष हा देश जगाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होता.
सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानात केलेली घुसखोरी, तिकडचे दुबळे सरकार, अमेरिकेची मदत घेऊन रशियाला केलेला प्रतिकार आणि नंतर झालेला तालिबानी सत्तेचा उदय, हा या देशाचा गेल्या ५० वर्षांचा इतिहास. तेथील अस्थिरतेमुळे लाखो कुटुंबे देशोधडीला लागली, निर्वासित झाली तर, काही नशीबवान लोक अमेरिका किंवा युरोपमध्ये स्थायिक होऊ शकले. अफगाण-अमेरिकन लेखक खालिद हुसेनी हे अशाच नशीबवानांपैकी एक. त्यांच्या कुटुंबाला १९८० मध्ये अमेरिकेत राजकीय आश्रित म्हणून स्थान मिळाले. शिक्षणाने डॉक्टर असलेल्या खालिद यांनी अफगाणिस्तानाला केंद्रस्थानी लिहून काही कादंबर्‍या लिहिल्या... त्यांची पहिली कादंबरी म्हणजेच 'द काइट रनर'!
ही गोष्ट आहे आमीर आणि हसनची. आमिरचे वडील काबूलमधील एक श्रीमंत व्यक्ती. उंचपुरे, शूर, बेधडक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. हसनचे वडील आणि हसन हे आमिरच्या घरी काम करणारे. आमिर सुनी पंथाचा असल्याने उच्चवर्गात गणला जाणारा तर, हसन शियापंथीय, हजारा ह्या खालच्या जातीचा. आमिर आणि हसन लहानपणापासून छान मित्र असतात. एकत्र खेळणे, एकत्र पतंग उडविणे, आमिरने हसनला गोष्टी वाचून दाखवणे, असे त्यांचे बालपण मजेत जात असते. आमिर मितभाषी, थोडासा लाजाळू, पुस्कांमध्ये रमणारा तर, हसन धीट, मस्तीखोर पण आमिरला तितकाच जीव लावणारा.
आपल्या वडिलांना आपल्यापेक्षा हसन जास्त आवडतो हे शल्य सतत आमिरला त्रास देत असते. आपण आपल्या वडिलांच्या अधिक जवळ जाण्यासाठी, त्यांचे प्रेम मिळविण्यासाठी आमिर विविध गोष्टी करत असतो आणि त्यातलीच एक असते हसनला कमी लेखणे, जमेल तसा त्रास देणे. यातच एक दिवस काबूलमध्ये पतंग उडवण्याची प्रसिद्ध स्पर्धा घोषित केली जाते आणि काहीही करून आपण या स्पर्धेत जिंकून वडिलांच्या नजरेत मानाचे स्थान मिळवायचे असे तो ठरवतो आणि जिंकूनही येतो. स्पर्धेतली एक प्रथा म्हणजे, सर्वात शेवटी कापला जाणारा पतंग शेवटपर्यंत पतंग उडवणाऱ्याने मिळवायचा आणि तो आपल्या दिवाणखान्यात मानाने लावायचा. हसन हा शहरातील सर्वांत वेगवान काइट रनर! तो कापलेला पतंग धावत जाऊन मिळवणारा म्हणून प्रसिद्ध असतो. आमिरने शेवटचा पतंग कापताच हसन तो पतंग मिळवण्यासाठी जिवाच्या आकांताने धावायला लागतो. तो पतंग मिळवतो आणि एक भयंकर प्रसंग घडतो. हसनवर डूख धरून असणारी तीन मोठी, उच्चवर्णीय मुले त्याला पकडतात आणि त्याचा पतंग घेऊ पाहतात. हसन पूर्ण प्रयत्नाने तो पतंग वाचवतो, पण त्यात त्याच्यावर बलात्कार केला जातो. हसनला शोधत फिरणारा आमिर हा प्रसंग पाहतो आणि एकदम घाबरतो. त्याला वाचवायला जावे तर, आपणही अडकणार, पतंग जाणार, वडिलांच्या जवळ जाण्याची संधीही जाणार, पण हसन तर आपला मित्र आहे, त्याला वाचवायला तर हवंच! अशा विचारांनी भांबावलेला आमिर तिथेच उभा राहतो. भित्रेपणा की वडिलांसमोर हुशार ठरण्याची उर्मी.. या ती उर्मी जिंकते; पण त्याच्या मनावर कायमचा एक ओरखडा घेऊनच.
या प्रसंगानंतर काही दिवसांत हसन आणि त्याचे वडील आमिरचे घर सोडून निघून जातात आणि त्यानंतर काही महिन्यात अफगाणिस्तानच्या राजकारणातही प्रचंड उलथापालथ होते. रशियाची घुसखोरी होते आणि त्या प्रदेशाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थैर्य बिघडून जाते. आमिरचे विश्व आणि आयुष्यही पूर्णतः बदलून जाते. आपला जीव वाचविण्यासाठी अनेक जण पाकिस्तानला जाऊ लागतात, त्याचप्रमाणे आमीर आणि त्याचे वडील आपले घर दार, व्यवसाय सर्व सोडून आधी पाकिस्तान आणि मग अमेरिकेत पळून येतात. अमेरिकेत एका पेट्रोल पंपवर काम करून त्यांना त्यांचा उदरनिर्वाह चालवावा लागतो पण यथावकाश बरेच कष्ट करून ते तिथे रुळतात. आमिर पदवीधर होतो. एका अफगाण मुलीशी लग्न करतो, लेखक होतो. त्याचे वडील काही वर्षानी कॅन्सरने मरतात. इथे आमिरचे आयुष्य सुरळीत होत असताना अफगाणिस्तानात परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असते आणि तो देश तालिबानी दहशतवाद्यांच्या हातात जातो.
एक दिवस आमिरला त्याच्या वडिलांचे मित्र रहीम खान यांचे पाकिस्तानातून बोलावणे येते. मृत्यूशय्येवर असलेले रहीम खान आमिरला एक धक्कादायक माहिती देतात ती म्हणजे हसन, हा त्याचा सावत्र भाऊ असल्याची. ते ऐकून आमिर पुरता हादरतो. आपले वडील इतकी वर्षे हसनपासून दूर कसे राहिले, हसनचे वडील हे सत्य माहीत असूनही आपल्या घरात कसे राहिले, यात हसनची चूक काय, तर तो शिया होता, गरीब होता हीच? काबूलमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व, समाजसेवक, श्रीमंत उद्योगपती, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे आपले वडील असे कसे वागू शकले... अशा अनेक प्रश्नांनी त्याचे मन विषण्ण होते. हसनच्या बाबतीत झालेल्या अन्यायाला केवळ आपला भ्याडपणा कारणीभूत नसून आपले वडीलही तितकेच जबाबदार आहेत याची जाणीव झाल्यावर एकीकडे हायसे वाटणे तर, एकीकडे अजून पराभूत वाटणारा आमिर लेखकाने उत्तम रंगवला आहे.
रहीम खानने सांगितल्याप्रमाणे हसनचा मुलगा सोहराबला अफगाणिस्तानातून आणण्यासाठी आमिर निघतो, तेव्हा त्याच्या नजरेस पडतो तो पूर्णपणे उध्वस्त झालेला त्याचा देश, जागोजागी छोट्या छोट्या कारणावरून लोकाना शरीया कायदा लावून शिक्षा करणारे तालिबानी, सततच्या युद्धामुळे अपंगत्व आलेली माणसे, भीक मागणारी अनाथ मुले, पूर्णतः परावलंबी झालेल्या बुरखाधारी स्त्रिया. ह्यानंतर आमिर त्याला कसा शोधतो, परत आणू शकतो का हे सगळे मूळ कादंबरीत जरूर वाचावे.
आमीर आणि हसनची ही काल्पनिक गोष्ट, अफगाणिस्तानात खऱ्या घडणार्‍या बदलांच्या पार्श्वभूमीवर सुंदर लिहिली आहे. ओघवती पण सोपी भाषा आणि चित्रदर्शी वर्णन ह्यामुळे अनेक प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. त्या देशातील लोकांची झालेली वाताहात, दुसर्‍या देशात येऊनही आपल्या मूळ 'वतन' बद्दल वाटणारी आत्मीयता, आमिर लहान असताना असलेले काबूल आणि आता परत गेल्यावर तालिबानी अमलाखाली असलेले काबूल ह्यातील आमूलाग्र बदल, ह्या वास्तव गोष्टी काल्पनिक कथानकात सुरेख गुंफल्या आहेत. भ्याड, भित्रा असला तरी पूर्ण कादंबरीत आमीर प्रचंड प्रामाणिक वाटतो, चुका करणारा, दुर्बळ मनाचा एक सामान्य माणूस वाटतो, आणि त्यामुळे वाचक म्हणून आपण त्याच्याशी स्वत:ला जोडून घेतो.
बदलत्या परिस्थितीत अफगाणिस्तानची झालेली वाताहात, तेथील निर्वासितांचे दुःख, दोन मित्रांच्या काल्पनिक कथेत मांडणारी ही कादंबरी नक्कीच वाचनीय आहे. खालिद हुसेनी यांच्या, A Thousand splendid suns आणि And the mountains echoed या कादंबऱ्यांनाही जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
- तन्मयी जोशी