लव्ह स्टोरी - एरिक सॅगल

युवा विवेक    24-Jul-2021   
Total Views |
 
love_1  H x W:
प्रेम... जगातली एक जादुई आणि सामर्थ्यवान गोष्ट, माणसाच्या जीवनातली एक महत्त्वाची प्रेरणा. साहित्याचा उगम झाल्यापासून ते जगाच्या अंतापर्यंत 'प्रेम' हा विषय, ही भावना सर्व पुस्तके, कादंबर्‍या, नाटके, कविता, चित्रपटांना पुरून उरणार आहे. प्रेमाशिवाय कोणतीही साहित्यकृती अपूर्ण वाटावी इतका अपरिहार्य तो विषय आहे. केवळ प्रेम या एकाच विषयाला वाहून घेतलेल्या अनेक साहित्यकृती आहेत. त्यातलीच एक म्हणजे एरिक सॅगल यांनी लिहिलेली आणि १९७०च्या 'व्हॅलेन्टाइन डे'ला प्रकाशित झालेली 'लव्ह स्टोरी' ही छोटीशी कादंबरी.
तसं बघायला गेल.. तर, असं जगावेगळं काहीच नाहीय या गोष्टीत. कॉलेजमध्ये शिकणारा एक मुलगा आणि एक मुलगी ह्यांची एक प्रेमकथा. अमेरिकेतील नामवंत हॉवर्ड विद्यापीठात शिकणारा बॅरेट आणि तुलनेने सामान्य अशा दुसर्‍या विद्यापीठात शिकणारी जेनिफर. ऑलिव्हर श्रीमंत, उच्चभ्रू वर्गात मोडणारा तर, जेनिफरचे वडील बेकरी चालवणारा एक सामान्य माणूस. हे दोघे प्रेमात पडतात आणि ऑलिव्हरच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करतात. त्यामुळे ऑलिव्हरला घरून मिळणारे आर्थिक पाठबळ अर्थात बंद होते. त्याला कायद्याचे उच्चशिक्षण घ्यायला मिळावे म्हणून जेनिफर आपल्या पॅरिसमधल्या शिष्यवृत्तीवर पाणी सोडते आणि नोकरीला लागते. तुटपुंज्या पैशांवर दोघे मिळून त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत कसेबसे राहतात. त्याचे शिक्षण पूर्ण होऊन त्याला चांगली नोकरी मिळाल्यावर, 'आता आपण आपले आयुष्य पुरेपूर जगू, सगळ्या राहिलेल्या हौसमौज पूर्ण करू.' अशी स्वप्ने पाहत असताना त्यांच्यावर एक मोठा आघात होतो. जेनिफरला कधीच बरा न होणारा रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान होते आणि वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ती मरण पावते. या कथानकात खूप नाविन्यपूर्ण, वेगळे असे काहीच नाही, पण तरीही ही लघुकादंबरी मनाला भावते, ह्याचे कारण तिची मांडणी. ही पूर्ण गोष्ट ऑलिव्हरच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते. ऑलिव्हर आणि जेनिफर ह्या दोन्ही व्यक्तिरेखा अतिशय जिवंत वाटतात. त्या दोघांमधले संवाद, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण अधोरेखित करतानाच, एकमेकांसाठी असलेले प्रेम तेवढ्याच प्रभावीपणे मांडतात. त्यांच्यातले संवाद, विशिष्ट प्रसंग, त्यांची मनस्थिती, सूक्ष्मपणे आणि तितक्याच हळुवारपणे उलगडतात. आपल्या इतर मित्रांशी जेवढ्यास तेवढे, पण खेळीमेळीचे संबंध ठेवणारा, इतर मुलींच्या बाबतीत वर वर वागणारा, फक्त डेटिंग पुरते नाते ठेवणारा oliver त्याच्याही नकळत जेनिफरच्या गाढ प्रेमात पडतो. काहीशी अबोल, पण अटीतटीने शाब्दिक वाद घालणारी, स्वतः च्या सामाजिक परिस्थितीची जाणीव असलेल्या जेनिफरचे प्रेम केवळ तिच्या काही संवादातून आणि कृतीतून अधोरेखित होत जाते.
प्रेमासाठी आपल्या कुटुंबाशी संबंध तोडणारा, जेनिफर दुसर्‍या कोणाशीतरी फोनवर बोलत आहे ह्या केवळ कल्पनेने कासावीस होणारा, स्वतः कडे पुरेसे पैसे नसतानाही तिच्याशी लग्न करणारा, भांडण झाल्यावर कासावीस होऊन गावभर जेनिफरला शोधत फिरणारा ऑलिव्हर या कथेचं बलस्थान आहे. जेनिफर आपल्याला आरपार वाचू शकते ह्याची जाणीव असणारा ऑलिव्हर, आपल्या विचारांशी ठाम असलेला ऑलिव्हर, तिच्या आजाराबद्दल कळल्यावर हताश झालेला ऑलिव्हर, आणि तिच्या मरणाची वेळ जवळ आल्यावर फक्त तिच्यासाठी 'नॉर्मल' वागण्याचा प्रयत्न करणारा ऑलिव्हर... अशी त्याची विविध रूपे लेखकाने मोजक्या, पण विलक्षण शब्दांत रंगवली आहेत. ते दोघे एकमेकांचे मित्र असतात, प्रियकर प्रेयसी असतात, नवरा-बायको असतात, ते भांडतात, वाद घालतात, त्यांच्यातले संवाद ह्या पूर्ण कथेला सुगंधित करतात आणि आपल्यालाही त्यांच्या प्रेमात पाडतात.
What the hell makes you so smart?" I asked. "I wouldn't go for coffee with you, " she answered. "
Listen -- I wouldn't ask you." "That, "she replied "is what makes you stupid.
"Love means never having to say you're sorry."
"I was afraid of being rejected, yes. I was also afraid of being accepted for the wrong reasons.",
यांसारखे अनेक quotes, संवाद या कथेला अधिक सुंदर करतात. त्यांच्या संवादातल्या रिकाम्या जागाही उमजायला लागतात.
जेनिफरच्या मृत्यूनंतर ऑलिव्हरला व्यापून उरलेले रितेपण आपल्याला वाचतानाही जाणवते आणि नकळत आपल्याही डोळ्यांत अश्रू उभे राहतात. आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडलेल्यांनी, कोणाच्यातरी प्रेमात असणार्‍यांनी किंवा प्रेमाच्या शोधात असणार्‍या अशा कुणीही ही कथा नक्की वाचावी आणि परत परत प्रेमात पडावे असे हे पुस्तक आहे. पुस्तकाची भाषा कळायला सोपी आहे. छोटे छोटे प्रसंग आणि संवाद, मोजकी पाने असल्याने दोन ते तीन दिवसांत वाचून संपणारी, पण आयुष्यभर लक्षात राहावी अशी ही गोष्ट आहे.
या कथेवर आधारित "love story' नावाचा चित्रपट १९७० मध्ये आला. चित्रपटाला सहा ऑस्कर पुरस्कार मिळाले. हे कथानक डोळ्यासमोर ठेवून किंवा त्याच्या आधारे विविध भाषांमधून अनेक चित्रपटही आले, पण तरी या पुस्तकाची जादू अजून ओसरलेली नाही. पुस्तकाच्या आजवर विकल्या गेलेल्या दोन कोटींहून अधिक प्रतींवरून ते सिद्ध होत आहे.
© तन्मयी जोशी