यज्ञ - भाग ४

युवा विवेक    29-Jul-2021   
Total Views |
आज सकाळपासून महेशचं कामात लक्ष नव्हतं. दर मिनिटाला त्याच्या मनातले विचार बदलत होते. एकीकडे वाटले, नाते टिकवावे आणि दुसरीकडे तो सगळा ड्रामा त्याला असह्य झाला होता. 'मीरा आपल्या घरीही आवडते, इतर प्रेम विवाहांना येतील तशा काही अडचणीही येणार नाहीत. सहज लग्न होईल.' हा विचार करून तो निश्चित होत नाही तोच त्याला वाटले, 'लग्न तर सहज होईल पण पुढे संसार?' तो लेक्चरला पोहोचला. पहिले दहा मिनिटे वाया गेले पण नंतर तो मुलांमध्ये रमून गेला. पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य वेगवेगळं ठेवणे त्याला हळूहळू जमत होते. दिवसही बिझी गेला, घरी परत येतांना तो व्हाट्सॲपच्या स्टोरीज पाहत होता. एका जुन्या मित्राने पोस्ट केलेल्या स्टोरी वाचतांना तो थबकला. "When they love you, you'll know it. If they don't you will wonder all the time if they do." एरवी त्याने दुर्लक्ष केले असते पण आज त्याला ते क्षणार्धात पटले. दुसर्यांनी लिहिलेले quotes पटायला तशी वेळ आयुष्यात यावी लागते.
रात्रीचे नऊ वाजले होते त्याने मीराला फोन केला. एक मिनिट वायफळ बोलणे झाल्यावर त्याने मुद्याला हात घातला.
" तु काय म्हणत होतीस? परत एकत्र येण्याबद्दल."
"हो. मला असं वाटतंय."
"पण मला वाटत नाहीय." दोघांचाही स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता.
"काय??" तिने खात्री करून घ्यायला विचारले.
"हो. मला वाटत नाही आपलं पटेल एकमेकांशी. आता ॲड्जस्ट केलं तरी पुढे तर नाहीच."
"तू इतका निगेटिव्ह का बोलतोय? चिडला आहेस?"
"नाही गं. चिडलो नाहीये आणि निगेटिव्ह नाही. हे खरंय, खूपदा प्रूव्ह झालंय. आता आपण स्विकारायला हवं."
"तुला मी आवडत नाही आता?"
"तसं नाही. आपण दोघेही बोललोय या विषयावर. मला इतकंच बोलायचं. दोघांना थोडे दिवस वाईट वाटेलच पण सतत भांडणांपेक्षा ते बरे!"
"तू हे फायनल सांगतोय?"
"हो."
"ठीक आहे. थँक्स. बाय."
तिने फोन ठेवला. चक्क पाच मिनिटात बोलणे संपवले त्याने. त्याचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता. आधीही बऱ्याचदा ब्रेकअप झालं होतं, पण आज त्याला मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं. हे फायनल बोलणं होतं. पहिल्या प्रेमाची नशा असते तसा पहिल्या ब्रेकअपचाही असतो. त्याला आज सगळं वेगळं भासत होतं. जेवण झाल्यावर तो चक्क आईसक्रीम खायला गेला. रात्री मस्त मुव्ही पाहिला. एक नातं संपलंय, तुटलंय याची खंत त्याला जाणवत नव्हती. याआधी खूप वेळेस रडल्यामुळे असावे.
पुढचा महिना एकदम छान गेला. मुलांना कसं शिकवायचं, गुंतवून ठेवायचं हे त्याला समजत होतं. विषय तसा रूक्ष नसल्याने मुलेही छान रमायची. मेकॅनिकल, सिव्हिलसारख्या ब्रॅंचेसला शिकवताना सुरवातीला नाकी नऊ यायचे पण राहुलच्या टिप्समुळे त्याचे काम सोपे झाले होते. या दरम्यान तो आणि प्रिया यांची छान मैत्री झाली होती. अनुजा अधूनमधून येऊन बागडून जायची, बडबड करायची. आजही जवळपास एक तास तो आणि प्रिया गप्पा मारत होते. ती त्याला कॉलेजच्या आठवणी सांगत होती.
"आणि मग काय? मी सांगितलं हे रॅगिंग वगैरे आम्ही सहन करणार नाही. दोन सिनियर्स आणि सहा ज्युनिअर्स. फटके लगावले दोघांनाही मग शांत बसले. नंतर मात्र माझ्या घरच्यांना बरेच दिवस टेन्शन यायचे कोणी बदला नको घ्यायला, पण तुला खोटं वाटेल, मीच स्वतःहून त्या दोघांशी मैत्री केली. दुष्मनी वाईटच! आजही चांगले मित्र आहेत माझे."
"वाह्ह. तू ग्रेट आहेस. मी तर खूप साधा होतो. नशीब आमच्याकडे रॅगिंग प्रकार नव्हता."
" होतास? तू अजूनही साधा आहेस." ती मोहक हसली. एक क्षण तो स्वतःला विसरला आणि परत भानावर आला. पाच मिनिटांनी ती लेक्चर घ्यायला निघून गेली आणि स्टाफ रूमच्या कोपऱ्यात आतापर्यंत पुस्तक वाचत बसलेले कदम सर त्याच्याजवळ आले.
"काय महेश सर? कसं सुरू आहे कम्युनिकेशन?"
"चांगलं सुरू आहे सर. जमतंय थोडं थोडं. तुम्ही कसे आहात? दोन दिवस सुट्टीवर होता ना."
"हो. लक्ष आहे म्हणजे तुझं. मी ठीक आहे. नाही, तुम्ही सगळे तरुण लोक आणि मी आपला वेगळा पडतो त्यात."
"असं काही नाही सर. तुमच्या टिप्स कामी येतात माझ्या. गाईडन्स हवाच तुमचा."
"मी सांगतो आपलं सुचेल ते. आता ही प्रिया, नवीन होती तेव्हा सांगितल्या दोन गोष्टी, पण तिला काही पटलं नाही. तुमची पिढी ऐकत नाही. ठीक आहे तुमची मर्जी."
"हो." त्याला यावर उत्तर सुचेना.
"लग्न झालंय तिचं. नवरा चांगला आहे दिसायला आणि रग्गड पैसे कमावतो. माहीत आहे ना तुला?"
"हो. मी गेलो होतो ना त्यांच्या घरी. घर पण छान आहे."
"घरापर्यंत मैत्री गेलीये का? चांगलं आहे बाबा. मजा करा. चल, मी येतो." सरांच्या बोलण्यातला स्वर महेशला वेगळा वाटला, आवडला नाही. 'कुत्सितपणे ते असं का बोलले असावे? माझी आणि प्रियाची मैत्री आहे फक्त. हे जुने लोक ना, सगळं एकाच नजरेने पाहतात.' त्यांच्या विचारांची कीव करत तो घरी पोहोचला. सरांनी त्याच्या डोक्यात सोडलेला किडा त्या वेळी तरी शांत होता. हे असे किडे कधीकधी नंतर हळूहळू मेंदू पोखरतात. महेशच्या बाबतीत काहीसं तसंच होत होतं.
क्रमशः
 
- सावनी