इंडियन रेन

युवा विवेक    03-Jul-2021   
Total Views |

rail_1  H x W:
प्रत्येकाच्या मनातला, कल्पनेतला पाऊस वेगळा असतो, त्याचं रूप वेगळं असतं आणि त्या रूपाबरोबर मनात वाजणारं गाणंही वेगळं असतं. एरवी उन्हासारखे कोरडे ठक्क असलेले आपण पावसाची चाहूल लागली रे लागली की, मनात आपोआप एक झाकोळ येऊन आजूबाजूला बघत बसतो. आकाशात ढग गोळा होऊ लागतात तसं आपण अंतर्मुख होत जातो. एखाद्या निवांत दुपारी आरामखुर्चीत बसावं, हातात पुस्तक असावं, पण त्यावर नुसतीच नजर फिरावी. खरं तर तंद्री दुसरीकडेच लागलेली असते. वारा पाचोळा उडवत नेत असताना आपलंच काही तरी हिरावून घेतोय का काय याने चलबिचल व्हावी. ऊन जाऊन एकदम गडद सावल्या याव्या आणि गरम कॉफीचा घोट घशाखाली रिचवत कुणीतरी आठवत जावं. निसटलेली हाक काळ्या मेघाला कळावी तसं, त्याने गडगडल्यावर आपण दचकावं आणि सावरून बसेपर्यंत पावसाच्या थेंबांनी छपरावर ताल धरावा. पागोळ्यांच्या अनेक थेंबानी ओंजळ सुखावली तरी मनात का दुखतं दर वेळी? यात गुंतून पडणं आलंच. मन तेवढ्या काळात कुठे कुठे फिरून आलेलं असतं आणि आपण कॉफी घेत अनिमिषपणे शून्यात बघत बसतो. दर वेळी हे असच होतं आणि तरी प्रत्येक पाऊस आपल्याला दर वेळी वेगळाच वाटतो. त्याततो भारतातला, आपल्या गावचा, आपल्या मातीतला पाऊस असेल तर काय वर्णावं ? बालपणीचे, तरूणपणीचे सगळे संदर्भ त्याला जोडून येतात आणि हरवून जायला होतं. आपल्या मातीचा सुगंध, डोलणारी, भिजलेली झाडं, शेतं, घरं, बांध, जुन्या इमारती, चौक, अड्डे, पायवाटा, थांबे, चहा -भजीच्या गाड्या, गर्दी आणि किती काय काय पावसात नवीन दिसू लागतं आणि पाऊस पडायला लागला की, जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी या सगळ्याचे परिचित गंध आपोआप दरवळतात. या भारतीय गंधाशी नातं सांगतानाच थोडासा वेस्टर्न पाऊसही त्यात मिसळणारे colonial cousins पावसाला एक नवीन आयाम देऊन जातात.
हरिहरन आणि लेसली लुईस या दोघांच्या colonial cousins अल्बममधलं ‘इंडियन रेन’ हे Nostalgia घेऊन येणारं गाणं. या अल्बममधली इतर गाणी जेवढी गाजली तितकं हे गाणं गाजलं नाही. पण हेडफोन्स लावून शांतपणे हे गाणं ऐकत बसावं आणि हलके हलके रिलॅक्स होत जावं इतका त्याचा बाज सुरेख मुलायम आहे. गाण्याची सुरुवात विजांच्या कडकडाटात पावसाच्या आवाजाने होते. लेसली लुईसचा मृदु आवाज आणि त्याची गिटार गाऊ लागते –
Rain Clouds In The Sky I Don't Know Why
They Make Me Blue When I'm Thinking Of You
Maybe They Want To Cry As I Walk On By Hiding My Tears In A World Of Good Byes
कोण्या एका मोरपीसाची सय यावी आणि निरोपाचे कढ आठवून पुन्हा डोळे ओले व्हावेत तसा पाऊस ढगांतून गर्दी करतो. परतीची वाट बंद झाल्यानंतर आता पाऊस काय सांगू पाहतोय? या ओळीनंतर कातर जीवाला आणखी हुरहूर लावायला हरिहरनचा आवाज तराण्यात घुमतो –
धीं त धीं त देरेना तन धीं त धीं त देरेना
Love during summer rain, causes no pain
Cause I'm looking back, at you once again
Memories crowding my mind, you're one of a kind
Life with out love, i'm helpless I'm dying
आठवणींच्या लडी सोडवायला बसलं की उन्हातल्या पावसासारखं वाटू लागतं; एकाच वेळी ऊब आणि गारवा मनात साठू लागतात. मागे वळून बघताना आता तितकं दुखत नसतं कारण त्या प्रेमामुळे जगण्याला अर्थ आहे; हे कळलेलं असतं. हे दुखणारं सुख घेऊन पावसाकडे बघत राहिलं की एक वेगळी शांतता सापडते, थेंबांच्या टापूर-टुपूरीत अद्भुत, आपल्या मनाजोगती लय सापडते. पाऊस झरतो, पडतो, नाचतो, कोसळतो, थांबतो, थांबून पुन्हा सुरू होतो त्या सगळ्यात प्रेमाचे विविध विभ्रम आहेत.
Rain drops and dance, strange kind of romance
I don't know why they cry out loud, but I'm feeling fine
Watch the rhythm of the rain falling down
मळभ दाटून आल्यावर जितकं उदास वाटतं तितकंच पावसाच्या येण्याने मन प्रसन्न होऊन जातं, हुरहूर असली तरी ऊन-पावसाचा खेळ बघून ओठांवर हलकं का असेना स्मित उमटतं. खिडकीवर आपटणाऱ्या पावसाची “उमड घुमड” मनोहारी वाटू लागते; सगळी कुरकुर निवते आणि झाडांसारखं मनही स्वच्छ, मोकळं होऊन जातं.
Rain falling around, Its just the sound
I like to here, when my hearts feeling down
Try to smile once again, as they slash on my window pane
I quiet like that, I don't mind
I've got no complaint
शेवटच्या कडव्यानंतर हरिहरनच्या आवाजात आलापी ऐकायला मिळते आणि त्याच तोडीचे सॅक्सोफोनचे स्वरही ऐकायला मिळतात; त्यात लेसलीचा मऊ आवाज आणि गिटार मिसळतात आणि पुन्हा एकदा पावसाचा रीदम आपल्याला समजावून देतात.
राग मेघवर आधारीत असलेलं हे गाणं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांचा सुरेख मिलाफ आहे. फ्यूजनच्यानावाखाली गाणी केली जातात; त्यात बहुतांश वेळा हे दोन्ही प्रवाह वेगवेगळे दिसून येतात आणि त्यातून एकसंधपणा जातो. इंडियन रेनमध्ये मात्र ऐकणाऱ्याला पाऊस, प्रेम, विरह, रागसंगीतातली मेलडी आणि पश्चिमेकडची हार्मनी याची एकजीव, संपूर्ण अनुभूती मिळते आणि पावसाचा स्वर अखंड कानात अनुनादीत होत राहतो. असं सांगतात की लेसली लुईस जेव्हा जिंगलसमध्ये जम बसवत होता, तेव्हा एक दिवस त्याने हरिहरनला जिंगल गायला बोलावलं. जिंगलचे शब्द हातात यायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत होता तोवर अस्वस्थ झालेल्या लेसली लुईसने गिटार छेडत गुणगुणायला सुरूवात केली. हरिहरननेही त्याच्या सुरात सूर मिसळत आलापी करत “जॅम” सेशन केलं. ही गोष्ट होती १९९२ सालची. या कल्पनेला मूर्त स्वरूप देत चार वर्षानी colonial cousins हा अल्बम आला आणि त्या वेळचे सगळे विक्रम मोडीत निघाले; पुरस्कारांची बरसात झाली. या अल्बममधली ‘कृष्णा’ हे शांतिसंदेश देणारं गाणं खूप गाजलं; इतरही गाणी स्वतःचा वेगळा टच घेऊन आल्यामुळे लोकप्रिय झाली. एम. टीव्ही unplugged मध्ये सादर होणारं “Indian rain” हे पहिलं फ्यूजन गाणं होतं.
‘धीं त धीं त देरेना तन धीं त धीं त देरेना’च्या ठेकयावर १९९६ मधला हा इंडियन रेन आजही आपलासा वाटतो; कारण त्यात ‘आपल्या’ मातीचा गंध आहे, नवेपणाचा साज आहे आणि आठवणींचा गोफ आहे. म्हणून तर डोळे मिटून कॉफीची चव रेंगाळत ठेवत हे गाणं ऐकताना गुंगून जायला होतं आणि आपल्यात लपलेला पाऊस हळूहळू गवसत जातो.
- नेहा लिमये