चित्रपट तयार करताना – संवाद आणि पात्र

युवा विवेक    30-Jul-2021   
Total Views |

dialogue _1  H  
यू ट्युबवर "राजा हरिश्चंद्र' आणि काही समकालीन चित्रपट सहज बघत होतो. त्याकाळचं तंत्र बघता मूकपट म्हणजे एक सुरेख आविष्कार होता. फक्त हावभावांच्या जोरावर एक अख्खा अध्याय साकारणं वाटतं तितकं सोपं नाहीये. आज ते जमणं कदाचित अशक्य आहे. आपल्याला संवादाची सवय झाली आहे. हावभाव, देहबोली यांसारख्या ,अभिनयाची खरोखर जाणीव असलेल्या काही बाबी आज काही ठिकाणी थोड्या कमकुवत वाटतायत. एखादा प्रयोग आणि अभ्यास म्हणून आपल्याला एखादा मुकपट पाहणं आज गरजेचं वाटतंय.
कादर खान...! एक असं नाव, ज्याने हिंदी चित्रपटसृष्टीला भरभरून दिलं. अभिनय, पटकथा आणि संवाद या तिन्ही धुरा त्यांनी तब्बल ३५ वर्षे सांभाळल्या. त्यात संवादात त्यांचे दाखले आणि भाषेवर असलेलं प्रभुत्व सर्वश्रुत आहे. उर्दू आणि हिंदीवर असलेली त्यांची पकड त्यांच्या संवादातून दिसते. असंच एक नाव 'डॉ. राही मासुम रझा'! उर्दू शायरीवर घट्ट पकड असलेल्या रजा साहेबांनी 'महाभारत' या धारवाहिकाचे संवाद देखील लिहिले आहेत. ही दोन नाव आपल्याला लक्षात रहातात. प्रत्येक वयाच्या प्रेक्षकांना सहज कळतील आणि लक्षात रहातील असे त्यांचे संवाद कौशल्य होते.
संवाद लिहिताना लक्षात ठेवाव्या अश्या काही महत्त्वाच्या गोष्टी.
१. काळ - काही शब्द काळाप्रमाणे जन्मला आले आणि लुप्त झाले. चित्रपट जर ८०च्या दशकांतला असेल तर त्याकाळी प्रचलित असलेल्या शब्दांचा साठा तुमच्याकडे हवाच.
२. पात्र - चित्रपटात संवाद हा प्रत्येक पत्राला असतोच. जे पात्र आहे, त्याचा स्वभाव, त्याचे काम, त्याची शारीरिक ठेवण, तो रहातो ते ठिकाण, त्या पात्राची पार्श्वभूमी हे सगळं लक्षात ठेवून त्याला संवाद देणं गरजेचं आहे. पटकथेत एखादा व्यावसायिक असेल, तर त्यांच्या व्यवसायात प्रचलित असलेले शब्द आपल्याला वापरावे लागतील. पडद्यावर त्याचा असलेला प्रवेश जरी काही क्षणाचा असेल, पण त्याला दिलेले संवाद मात्र त्याच्या पत्राला साजेशे असणं गरजेचं आहे.
३. पटकथेचा अभ्यास - काही चित्रपटात संवादातील कमकुवतपणा प्रकर्षाने जाणवतो. कलाकार कितीही पट्टीचा असला आणि त्याला संवाद जर कमकुवत असती तर, प्रेक्षक कंटाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पटकथेत पात्राचं महत्व किती आहे, याचा पूर्ण अभ्यास करून त्याच्यासाठी संवादाची मुद्देसूद बांधणी करणं गरजेचं आहे.
४. परिचय - चित्रपटात संवाद हा पात्र आणि घटनेचा परिचय करून देणारा घटक असतो. त्यामुळे ते लिहिताना शक्यतो अवांतरतेकडे झुकलेले नसावेत.
५. भाषा - मूळ कथा ज्या ठिकाणी घडते आहे, त्या ठिकाणची बोलीभाषा संवाद लिहिताना वापरणं गरजेचं असतं. एखाद्या खेड्यात घडणारी कथा आणि संवाद मात्र अर्ध्याहून अधिक शहरी किंवा पात्रांच्या एकूण 'ॲपिअरन्स'ला जराही 'मॅच'न होणारे असतील तर हे घातक आहे. वाढत्या संपर्कयंत्रणेमुळे ,कोणत्या भागात कोणती भाषा बोलली जाते आणि तिचा बारकावा किती आहे हे आता प्रेक्षकांना कळू लागलं आहे.
६. भाषेचा विस्तार - विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि तळ-कोकण, मुंबई-पुण्यातील शहरी भाग , दक्षिण आणि मध्यमहाराष्ट्र ,ही आपल्या राज्याची भौगोलिक विभागणी आहे. साधारण प्रत्येक २० -३० किमी नंतर बोलीभाषेत थोडाफार बदल असतोच. कथा नेमक्या कोणत्या भागात आहे हे लक्षात घेऊन तिथल्या बोलीभाषेचा आणि संवाद म्हणताना उच्चारांचा पूर्ण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे.
दीर्घ आणि चौफेर वाचन , लोकांमध्ये वाढता वावर, निरीक्षण आणि नोंदी याचा संवादलेखनात खूप वापर होऊ शकतो. लोकांना बोलतं करणं आणि त्यांची भाषा, शब्द यांचा संग्रह करत रहावं लागतं. संवाद लिहिताना ते अपडेट हवेत. एखाद्या चित्रपटात काळानुरूप, जर संवाद आऊटडेटेड असतील तर चित्रपट पडू शकतो. नवीन प्रवाह अथवा त्याकाळी त्या ट्रेंडमुळे बोलीभाषेत नव्याने आलेले काही शब्द याचा अभ्यास असावा लागतो. असे शब्द सहज उपलब्ध होत नाहीत. बऱ्याचदा त्या लोकांमध्ये जाऊन आपला संग्रह वाढवावा लागतो.
संवाद लिहिणं जसं एक कौशल्य आहे, तसंच ते फेकणं (डीलिव्हर) करणं देखील एक कौशल्य आहे. एखाद्या शब्दावर जोर देताना त्या वाक्याचा अर्थ किंवा शब्दाच्या जाणिवेचा महत्व कमीजास्त होऊ शकतं. कलाकाराने त्याचा नीट अभ्यास करून येणं अपेक्षित असतं. कलाकाराच्या आवाजाचा चढ-उतार देखील यात महत्वाचा आहे. एखादा धीर-गंभीर आवाज ( खर्जा) असला, तर त्याला आवाजाला साजेशे संवाद दिले पाहिजे. पूर्ण 'कॉन्ट्रास्ट' असल्यास काही हरकत नाही, पण तो कॉन्ट्रास्टसुद्धा matching हवा.
.......
पात्र
शक्यतो पात्रांची निवड कथा-पटकथा आणि संवाद पूर्ण झाल्यावर करावी. पात्रांची निवड आधी केली की कथा त्यांच्यानुसार लिहावी लागते. 'मला अमुक यांना घेऊन चित्रपट बनवायचा आहे !' ही कल्पना सुरवातीला जरी चांगली वाटत असली, तरी पुढे तिचा विस्तार किंवा बदल करताना त्रास होऊ शकतो. कोण्या एका माणसाला ( कलाकाराला) डोळ्यासमोर ठेऊन कथा-पटकथा लिहिण्यास सुरवात करणं चुकीचं ठरू शकतं. बजेटवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. कथा-पटकथा नीट बांधली गेली की कलाकारांचा शोध सुरू करावा. शक्य असेल तर प्रत्येक कलाकाराची एक स्क्रीन टेस्ट घ्यावी. आपली निवड पात्राला व्यवस्थित बसते आहे की नाही हे पडताळून बघण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला आहे.
नव्याने चित्रपट निर्मितीस सुरवात करताना बरेच निर्माते किंवा Production Houses 'Audition' चा आधार घेतात. ऑडिशन म्हणजे नवीन कलाकारांची परीक्षाच असते. मी पाहिलेल्या आणि घेतलेल्या काही ऑडिशन्स मध्ये नवखय्यांची गर्दी पाहून धस्स होतं. Calibar असूनही काही लोकांना योग्य व्यासपीठ मिळू शकत नाहीये, ही खेदाची बाब आहे. काही लोकांच्या मुलाखतीत असे निदर्शनास आले, की दिवसातून दोन किंवा तीन ऑडिशन्स ला हजेरी लावणारे महाभाग देखील आहेत.
ऑडिशन्सला जाताना घ्यावयाची काळजी
१. प्रत्येक ऑडिशन हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या परवानगीनेच होते आहे याची खात्री करून घेणे.
२. ऑडिशन किंवा चित्रपटात काम मिळवण्यासाठी कुठल्याही आमिषाला अथवा दबावाला बळी पडू नये.
३. ऑडिशन साठी किंवा चित्रपटात काम मिळेल म्हणून कुठल्याही प्रकारची आर्थिक मागणी हितकारक नाही.
४. ऑडिशन घेणाऱ्या पॅनल मध्ये कमीत-कमी एखादा सिनिअर मेम्बर असावा याची खात्री करून घ्या. तसेच चित्रपटाशी निगडीत मंडळी, 'अखिल भारतीय चित्रपट महामंडळ' ची सदस्य आहेत का, याची खात्री करून घ्या.
चित्रपटाकडे एखाद्या व्यावसायिक दृष्टीने बघणं चांगलं आहे. पण व्यावसायिकपणा वेगळा आणि लबाडी वेगळी. काही अनुभव असेही आहेत, ज्यात नवीन कलाकार, निर्माते यांच्याकडून अवास्तव पैसा उकळण्याचं काम सूरु होतं. त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच. तूर्तास एवढंच की कुठल्याही कलाकाराला त्याची कला सादर करण्यासाठी पैसे भरण्याची गरज नाहीये. प्रत्येकाला आपली प्रतिभा दाखवण्यासाठी एक संधी नेहमी मिळते. आणि ती मिळाली नसेल, तर वाट पाहूया ! काहीतरी सुंदर घडणार असेल...!
अनुराग
9511841631