फुलबाजार

युवा विवेक    11-Sep-2021
Total Views |
घमघमला मुंबईचा फुलबाजार

flower market_1 &nbs
चातुर्मासात जशी फळाफुलांनी लगडून सृष्टी नवं रूप धारण करते तसेच सणावारांचेही दिवस सुरू होतात. श्रावण-भाद्रपद हे तर उत्सवांनी भारलेले महिने. मंगळागौर, राखीपौर्णिमा, वेगवेगळ्या पूजा, गणेशोत्सव, गौरी, पितृपक्ष, पुढे अश्विनात नवरात्र आणि दसरा येतातच सावलीसारखे. आपल्या आराध्य देवतेला फुले वाहणे आणि फुलांची आरास ही सणउत्सवांमधील धार्मिक विधींची विशेष ओळख. षोडशोपचार पूजेत फुलांना विशेष स्थान आहे.
बाराही महिने बाजारात फुलविक्री होत असली तरी या दिवसांत बाजारात फुलांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली असते. विशेषतः गणेशोत्सवात तर फुलांची सजावट, हार-तुरे-तोरणं, गजरे-वेण्या, दूर्वा-केवडा, तसेच गणपतीला वाहण्याच्या वेगवेगळ्या पत्री यांना विशेष मागणी असते. मुंबई-पुण्यातील फुलबाजार रंगीबेरंगी व सुवासिक फुलांनी नुसते दुथडी भरून वाहात असतात. प्रचंड गर्दी, लोकलमधील दाटीवाटी याला न जुमानता अस्सल मुंबईकर(बदलापूरपासून बोरिवलीपर्यंत कोठेही राहणारा) बाप्पाला फुलं वाहण्यासाठी दादर मार्केट गाठतोच. या फुलमार्केटच्या निमिताने कोट्यवधींची उलाढाल मुंबईत होत असते, शेतकऱ्यालाही त्याच्या कष्टाचा पैसा मिळतो.
मुंबईचं सुप्रसिद्ध फुलमार्केट
मुंबईत प्रभादेवी(एलफिन्स्टन रोड) आणि दादर पश्चिम या दोन ठिकाणी फुलांचे मोठे बाजार आहेत. 'स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मंडई' आणि 'दादर फुल मंडई' या दोन्ही बाजारात गणेशोत्सवाच्या काळात मोठया प्रमाणात फुलांची उलाढाल होते. १९५० सालापासून दादर स्थानकाजवळच शेकडो फुलविक्रेते फुलांची विक्री करीत आहेत. दादर हे स्थानक खरेदीच्या दृष्टीने मध्यवर्ती असल्यामुळे स्थानकाजवळच हा बाजार सुरू झाला. मुंबई महापालिकेने १९८५ मध्ये येथील विक्रेत्यांना दादर स्थानकापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जागेत हलवलं व त्यास स्व. मीनाताई ठाकरे फुलबाजार असं नाव दिलं गेलं. दादर स्थानकाबाहेर विक्री करणाऱ्या या दुकानदारांना १९९८ मध्ये पालिकेने या भागातच कायमचे वास्तव्य करण्याचे जाहीर केले. या ठिकाणी एकूण साडेसहाशे गाळे आहेत. गणपतीच्या काळात इथे तुडुंब गर्दी असते. मात्र, याच काळात दादर स्थानकाजवळ नवे फुलविक्रेते येऊन व्यवसाय करू लागले. त्यामुळे दादर स्थानक आणि स्व. मीनाताई ठाकरे असे दोन फुलबाजार येथे तयार झाले.
गजबजती पहाट
पहाटे साडेतीन-चारपासून फुलबाजाराच्या या परिसराला जाग येते. पहाटेस शेतकऱ्यांकडून अनेक ट्रक या घाऊक बाजारात निरनिराळी फुले घेऊन येतात. वेगवेगळ्या प्रकारचे झेंडू, मोगरा, सोनचाफा, सोनटक्का, वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब, जास्वंद यांसह डबल डिलाइट पीस, पिटूनिया, फ्लॉक्स, स्नॅप ड्रॅगन, पीस लिली अशी नेहमीच्या फुलांपेक्षा वेगळी आणि महागडी फुलेही इथे मिळतात. गणपतीला वाहण्याच्या दुर्वा, तुळस, बेल, शमी, माका, आघाडा अशा वेगवेगळ्या पत्री, फुलांची तयार आरास अशा अगणित वस्तू येथे विक्रीस असतात. ज्यांच्या घरात पूजा आहे असे अनेकजण, पुरोहित, सार्वजनिक गणेशोत्सव आयोजक, किरकोळ दुकानदार असे अनेकजण या बाजारात येऊन मनसोक्त खरेदी करतात. अगदी एक दोन किलोंपासून पंचवीस-पन्नास किलोपर्यंत फुलांची खरेदी करणारे लोक इथे येतात. एरवी ४०-५० रुपये किलोने मिळणारी फुले या काळात ८०-९० रुपये दराने विकली जातात. सजावटीच्या फुलांचा तर न्याराच भाव असतो. विशेष करून मोगरीचे-जुईचे-सोनचाफ्याचे गजरे, हरितालिका गौरीसाठी शेवंतीच्या वेण्या इथे किरकोळ बाजारभावापेक्षा स्वस्त दराने मिळतात. त्यामुळे त्यांना विशेष मागणी असते. थोडक्यात काय, मुंबईच्या अन्य काही ओळखींप्रमाणेच फुलबाजार ही एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.

कोरोनामुळे फुलबाजाराला अवकळा
गेली दोन वर्षे कोरोनाने सगळेच ग्रासले आहेत. सगळ्यात बाजारांमध्ये मंदी असताना फुलबाजारही त्याला अपवाद कसा असेल. गेल्या वर्षी जीवघेण्या कोरोनाची नुकतीच ओळख झाली होती, कडक संचारबंदी होती, त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी फुलांची विशेष लागवड केली नव्हती. मंदिरे उघडण्याची-लॉकडाऊन उठण्याची कोणतीही सुचिन्हं नव्हती. त्यामुळे बाजारात फुलांचा माल विशेष आलाच नाही. परंतु, हळुहळू सगळे उघडण्यास सुरुवात झाली. यंदा पुन्हा एकदा लॉकडाऊन असला तरी शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली आणि पीकही अमाप आले. पण मंदिरं आजही बंद आहेत व सणउत्सवाच्या साजरीकरणावर मर्यादा आहेत. अनेकांच्या रोजगारावर गदा आल्याने लोकांनी सजावटीची हौसही बाजूला ठेवली आहे. त्यामुळे फुलांना जिथे ८०-९० रुपये भाव मिळत होता तिथे आज २०-२५ रुपयांनीही कोणी घेत नाही. हा लेख लिहित असताना मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवापूर्वीच्या रविवारपर्यंत फुलबाजारात अमाप आवक झाली असली तरी मागणी अत्यंत कमी होती, अशी माहिती स्व. मीनाताई ठाकरे फुलबाजारातील विक्रेते राजेंद्र हिंगणे यांनी दिली. सोमवारनंतर हळूहळू फुलांची खरेदी सुरू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्लास्टिक फुलांच्या सजावटी नकोत
एकीकडे पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याचं आवाहन पर्यावरणप्रेमी करीत असताना फुलबाजारासमोर मात्र प्लास्टिक सजावटींचे संकट उभे आहे. विशेषतः गेल्या दोन वर्षांत महागडी नाशिवंत खरी फुलं घेण्यापेक्षा नागरिक प्लास्टिकची स्वस्त आणि टिकाऊ फुलांच्या सजावटी करण्याला प्राधान्य देत आहेत. या फुलांपासून केल्या जाणाऱ्या आरास व सजावटीवर बंदी आणली जावी, असे आपले मत असल्याचेही हिंगणे म्हणाले. ही फुलं टिकाऊ असली तरी, ती पर्यावरणाला हानीकारकच आहेत. त्यामुळे नागरिकांनी खऱ्या फुलांची सजावट केली पाहिजे असंही ते म्हणाले.
फुलबाजार ही मुंबईची एक ओळख तर आहेच, त्याचवेळी 'एपीएमसी'सारखंच शेतकऱ्यांना उपजीविकेचं माध्यम देणारं ते एक महत्त्वाचं स्थान आहे. ही खूण येथील सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो जपला पाहिजे, जोपासला पाहिजे.
- मृदुला राजवाडे