परंपरा... व्यवसाय... परंपरा

युवा विवेक    13-Sep-2021   
Total Views |
परंपरा... व्यवसाय... परंपरा

gouri mukhavte_1 &nb
आजकाल आपल्याला तरुणाई फक्त वरवरच्या चमकीश व्यवसायात स्थिरावते असं चित्र दाखवलं जातं, पण ते कितीसं खरं आहे, हे पाहताना ही 'गणेशोत्सव आणि तरुणाई' ही मालिका केली आणि एक वेगळंच चित्र समोर आलं. त्याच मालिकेतला हा लेख.
परंपरेप्रमाणे गणपती आले की गौरीही येतात. कुणाकडे खड्याच्या तर कुणाकडे उभ्याच्या!!! प्रांत - प्रदेश - गाव बदलला की परंपरा-रूढीही बदलतात. अनेक गोष्टी काळाच्या कसोटीवर बदलत जातात. तशाच पिढ्याही बदलतात. हे बदलेलं रूप पाहणं, समजून घेणं आणि त्यावर विचार करून आपल्या घरातला व्यवसाय पुढे नेणं फारच समंजस ठरू शकतं.
सण आणि बाजारपेठा यांचं एक वेगळं समीकरण आहे, हे आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती असणारं सत्य आहे. पण आजची तरुण पिढी या सगळ्या व्यवसायात कशी उतरते या सगळ्याकडे कशी पाहते आणि तरी आपल्या परंपरा टिकवत व्यवसाय कशी करते हे बघण्यासारखं आहे.
 
गौरी आणि तिचे मुखवटे हा या काळातला परंपरेला धरून असणारा, मनात भक्तिभाव पक्का करणारा व्यवसाय कसा असतो आणि त्यात तरुणांची भूमिका काय असते ते पाहण्यासाठी श्रेया पटवर्धनला संपर्क केला. पुण्यातल्या तुळशीबागेत त्यांचं मराठे स्टोअर्स -नावीन्य आणि परंपरा या नावाचं दुकान आहे, साधारण चार पिढ्या या व्यवसायात आहेत. श्रेया, तिची आई, आजी आणि पणजी. श्रेयाचं कौतुक वाटलं ते अर्थातच ती २६ व्या वर्षी या व्यवसायात स्थिर होऊ पाहते आहे. तिने बालपणापासून हा व्यवसाय जवळून पाहिलेला असल्याने त्यातल्या खाचाखोचा तिला माहिती आहेत. मुखवटे कसे तयार करतात, त्यांची धडं कशी तयार करतात, त्यातले ट्रेंड्स कसे असतात आणि नवीन काळाला अनुसरून त्यात बदल कसे केले पाहिजेत, हेही ती फार कळकळीने मांडते. अर्थात आपली गिऱ्हाईक कशी जोडली पाहिजेत आणि ती जोडताना, नेमकं कधी कोणता निर्णय घेतला पाहिजे हेही ती फार छान सांगते. कुठे ठाम राहिलं पाहिजे आणि कुणाला सवलत दिली पाहिजे, हेही लहान वयात तिला कळलेलं आहे. अर्थात हे तिने सांगितलेल्या दोन उदाहरणावरून सहज लक्षात येतं. कोरोना काळात तिच्याकडे आलेल्या दोन गरीब जोडप्यांशी तिने आत्मीयतेने वागणं आणि आपला व्यवसाय सांभाळत या दोन्ही जोडप्यांना मदत करणं फार कौतुकास्पद आहे. कोरोना काळात गौरी घरात आणण्याची रीत आणि हातात पैसा नाही, असं असताना एक नव्हे तर दोन जोडपी श्रेयाकडे आली आणि स्वतःची परिस्थिती सांगत गौरीच्या मुखावट्यांची चौकशी केली. त्यांची सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आणि गौरीच्या परंपरेत खंड न पडू देण्याची त्यांची तगमग पाहून श्रेयाने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आणि त्यांना गौरी स्थापनेचा आंनद मिळवून दिला. कोण म्हणतं तरुणाईकडे संवेदनशीलता नाही? हे उदाहरण नुसती संवेदनशीलता नाही दाखवत तर त्यातून दुसऱ्याच्या मनातला भाव जपण्याची असोशीही दाखवते. आणि असं एकूणच माणसाबद्दलचा, त्याच्या मनाबद्दलचा तरूणाईकडे असलेलं भानही दाखवते.
पेणला असलेल्या स्वतःच्या कारखान्यातून गौरींचे मुखवटे मागवणे, त्यासाठी वाहतुकीपासून सगळ्याची व्यवस्था करणं आणि त्या ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देणं एवढा व्यवसाय प्रवास श्रेया फार आपलेपणाने मांडते. गौरीचा सण झाला की उरलेले मुखवटे जतन करण्यासाठीही ती तत्पर असते. साधारण एक दीड महिन्याच्या गॅपनंतर नवरात्रीपासून पुन्हा पुढच्या वर्षीच्या गौरीची तयारी सुरू होते आणि श्रेया लगबगीने आणि नव्या दमाने पुढच्या वर्षीच्या गौरींची वाट पाहते.
श्रेया या व्यवसायाकडे फक्त व्यवसाय म्हणून न पाहता, त्यात ती आपल्या परंपरा जपण्याचा एक मार्गही शोधते. म्हणूनच ती जेव्हा म्हणते की, 'सगळे भक्त तीनच दिवस गौरीची पूजा करतात, पण मला तर महिनाभर गौरींची सेवा करायला मिळते.' तेव्हा तिच्या मनातली भक्ती ठळक होत राहते आणि तिच्या मनातली परंपरा आणि व्यावसायिकता यांची सांगड अधिक घट्ट होत राहते.
सणांच्या काळात त्या त्या व्यावसायिकाला खरं तर आपल्या घरात फार काळ देता येत नाही, पण तरी श्रेया घरीही वेळ देते. आपल्या घरातल्यांबरोबर आपल्या वेळा ठरवून आपल्या मनातल्या भक्तीला वाटही करून देते आणि आली गौराई अंगणी... असं म्हणत प्रेमाने गौरीचा सणही आनंदाने साजरा करते. खरं तर ती परंपरा-व्यवसाय-परंपरा अशी साखळी पूर्ण करत राहते.
 
- डॉ. अर्चना कुडतरकर