गणेशोत्सव आणि खाद्यसंस्कृती

युवा विवेक    15-Sep-2021
Total Views |

गणेशोत्सव आणि खाद्यसंस्कृती

food culture_1  सर्वप्रथम आपणा सर्वांना रमा केटरिंग सर्व्हिसेसकडून गणेशोत्सवाच्या अनेक शुभेच्छा ! मी, आनंदिता संत..... साधारण दोन वर्षांपूर्वी मी 'रमा केटरिंग सर्व्हिसेस'ची सुरुवात केली आणि महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणाच्या तसंच घरगुती डब्यांच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. फारशी जाहिरात न करताही हळूहळू माऊथ पब्लिसिटीमधून व्यवसायानं वेग घेतला आणि तेवढ्यातच लॉकडाऊनची घोषणा झाली. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवावा लागला. जसजसा लॉकडाऊन शिथिल होत गेला, तशी पुन:श्च हरिओम म्हणत व्यवसायाला सुरुवात केली. परंतु आता आधीचं चित्र बरंच बदललं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेचे नियम जास्त काटेकोरपणे पाळायचे होते. केटरिंगच्या व्यवसायाला मरण नाही, हे कितीही खरं असलं तरी त्या व्यवसायात सुरक्षेची काळजी सगळ्यात जास्त प्रमाणात घ्यावी लागते. मीही ती काळजी घेऊनच हळूहळू डबे द्यायला सुरुवात केली. कोरोना काळात अनेक कुटुंबं किंवा कुटुंबातले एखाददोन सदस्य होम क्वॉरंटाइन असायचे. अशा कुटुंबांकडून डब्याच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. पुन्हा एकदा जोमानं व्यवसाय सुरू झाला आणि अशातच गणेशोत्सव जवळ आला.

गेल्या वर्षी गणेशोत्सवात नेहमीसारखी धामधूम नव्हती. सगळ्या उत्साहावर कोरोनाचं सावट असलेलं जाणवत होतं, पण तरीही आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत होताच, शिवाय अगदी धुमधडाक्यात नसली तरी अगदी मनापासून तयारी करत होता. मीही 'रमा केटरिंग सर्व्हिसेस'तर्फे गणेशोत्सवानिमित्त उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांच्या ऑर्डर्स घ्यायचे ठरवले आणि आनंदाची गोष्ट अशी की, मला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून मी ऑर्डर दिलेल्या सर्वांना मोदकांची घरपोच डिलिव्हरी दिली.

अनेकांनी मोदकांच्या ऑर्डर्स नोंदवल्या होत्या. इतकंच नाही तर मोदक आवडल्याचंही आवर्जून कळवलं. लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मनापासून आनंद झाला आणि आपल्या कामाची सुयोग्य पोचपावती मिळाल्याचं समाधान वाटलं. यामागे माझ्या कष्टांचा जितका वाटा आहे, तितकाच श्रीगजाननाचा आशीर्वादही आहे, असं मला वाटतं. कोरोनाच्या या काळात आपण कोणाच्या तरी आनंदात सामील होऊ शकलो आणि त्यांनीही आपला आनंद आपल्याबरोबर शेअर केला, ही भावनाच मला खूप आशादायक वाटते.

या सगळ्या काळात मला एक व्यावसायिक म्हणून जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशोत्सवासारख्या मंगलक्षणांनी अजूनही आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवलेलं आहे. भले दर वर्षीप्रमाणे गर्दी किंवा मिरवणुकीचा उत्साह नसेल, पण गणेशोत्सव म्हटला की मोदक किंवा गणपतीतल्या बाकीच्या दिवसांमधली ओघानं येणारी खाद्यसंस्कृती अजूनही भक्कम आहे आणि लोकांच्या आवडीनिवडी आजही तितक्याच चोखंदळ आहेत. अर्थातच, त्यामुळे आपल्या कामातही नवनवीन सुधारणा करायला वाव मिळतो, हेही खरंच; पण तरीही एक गोष्ट नक्कीच वाटते. लवकरात लवकर हे कोरोनाचं सावट दूर व्हावं आणि गणेशोत्सव पुन्हा एकदा पूर्वीच्या थाटात अनुभवायला मिळावा, ही श्रीगजाननचरणी प्रार्थना.....

- आनंदिता संत

(रमा केटरिंग सर्व्हिसेस, पुणे)