लघुग्रह रडारने शोधला हजारावा लघुग्रह

युवा विवेक    08-Sep-2021
Total Views |

लघुग्रह रडारने शोधला हजारावा लघुग्रह
radar_1  H x W:

१४ ऑगस्ट २०२१ रोजी, पृथ्वीजवळून सुमारे १.७ मिलियन किमीवरून एक लघुग्रह गेला. या लघुग्रहाला २०२१ PJ1 असे नाव देण्यात आलेले होते. हा लघुग्रह महत्वाचा असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे , लघुग्रह शोधक रडारद्वारे शोधण्यात आलेला हा १००० वा लघुग्रह होय. गेल्या ५० वर्षांच्या कार्यकाळात पृथ्वीजवळून जाणारा हा १००० वा लघुग्रह या रडार च्या माध्यमातून शोधण्यात आलेला आहे. हा लघुग्रह सुमारे २० ते ३० मीटर इतक्या आकाराचा होता. यानंतर सातच दिवसांनी म्हणजे २१ ऑगस्ट रोजी या रडारने १००१ वा पृथ्वीजवळून जाणारा लघुग्रह शोधला. परंतु हा दुसरा लघुग्रह आधीच्या पेक्षा आकाराने फारच लहान होता.

१९६८ मध्ये पहिला लघुग्रह १५६६ लार्कस शोधल्यापासून जी लघुग्रह शोधण्याची पद्धत या रडारद्वारे वापरण्यात येते तीच पद्धत वापरून हा १००० वा उपग्रह सुद्धा शोधण्यात आलेला आहे. ही अत्यंत प्रगत पद्धत आहे ज्याद्वारे आजपर्यंत अनेक लघुग्रह , धुमकेतू (ज्या सर्वांना पृथ्वीजवळून जाणारे लघुग्रह असे संबोधले जाते) शोधण्यात या रडार किंवा दुर्बिणीला यश आलेले आहे. या रडार च्या माध्यमाने शोधण्यात आलेल्या लघुग्रहांच्या माहितीचा उपयोग करून आपल्याला या पृथ्वीजवळून जाणाऱ्या लघुग्रहांची निश्चित गती तसेच कक्षा सुद्धा शोधून काढता येते. या पद्धतीच्या उपयोगाने आपल्याला या लघुग्रहांची कक्षा ही पुढील काही दिवसांचीच नाही तर पुढील अनेक शतके इतक्या काळाची निश्चित करण्यास मदत झालेली आहे. या प्रगत पद्धतीच्या सहाय्याने गणिते करून पृथ्वीला या लघुग्रहांपासून कितपत जास्त धोका येत्या काळात असू शकेल याची माहिती वैज्ञानिकांना फार आधीच कळते. त्यामुळे येत्या काळातील धोक्याचे मोजमाप करण्यास वैज्ञानिकांना मदत होते. नुकत्याच झालेल्या एका निरीक्षणाद्वारे वैज्ञानिकांनी “अपोफिस” या लघु ग्रहामुळे पृथ्वीला येत्या १०० वर्षात काहीही धोका नाही असे भाकीत केले.

तसेच या पद्धतीद्वारे , रडार वापरून या लघुग्रहाच्या भौतिक रचनेविषयी सुद्धा माहिती वैज्ञानिकांना मिळते आहे. एरव्ही जी माहिती फक्त त्या लघुग्रहावर एखादे अंतराळयान वापरूनच मिळवता येते ती माहिती या रडार च्या माध्यमातून पृथ्वीवरून मिळवता येऊ लागलेली आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ही एक अत्याधुनिक यंत्रच म्हणावे लागेल. रडारद्वारे या लघुग्रहांचे आकारमान आणि वेग यांच्या साह्याने या लघुग्रहांचे छायाचित्र सुद्धा तयार करता येते. याच छायाचित्राच्या मदतीने या लघुग्रहाचा आकार , वस्तुमान , परीवालानाची गती आणि दिशा , तसेच या लघुग्रहांचा एखादा उपग्रह असल्यास त्याची सुद्धा माहिती मिळवता येते. या पद्धतीद्वारे सिग्नल हा त्या लघुग्रहाच्या दिशेने पाठवण्यात येतो. तो सिग्नल जेव्हा त्या लाघुग्रहावर आदळून पृथ्वीवर परावर्तीत होतो त्याच वेळी हा सिग्नल पुन्हा ७० मीटर व्यासाच्या एका डिश अँटेना च्या सहाय्याने पकडण्यात येतो आणि नंतर मग पाठवलेला सिग्नल आणि परावर्तीत झालेला सिग्नल यांच्यामधील फरक शोधून लाघुग्रहाविषयी अधिक माहिती मिळविण्यात येते. आत्ताच जो हजारावा लघुग्रह सापडला त्याच्या बाबतीत सुद्धा सांगायचे झाले तर हा लघुग्रह प्रचंड वेगाने अवकाशात पुढे सरकत होता. या लघुग्रहाचे छायाचित्रण करणे अशक्य होते तरीसुद्धा या लघुग्रहाच्या वेगाचे आणि त्याच्या दिशेचे अगदी अचूक मोजमाप करण्यात या रडार दुर्बिणीला यश आलेले आहे.

ही दुर्बीण नासाच्या JPL प्रयोगशाळेत असून , ती जणूकाही पृथ्वीचे या लघुग्रहांपासून रक्षणच करत आहे. येत्या काळात या प्रकारच्या अधिकाधिक दुर्बिणी कार्यसिद्ध होतील आणि लघुग्रह शोधण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान सुद्धा अधिकाधिक प्रगत होईल यात शंकाच नाही.