दर्पण...

युवा विवेक    18-Jan-2022
Total Views |

darpan
 
एका तळ्यात होती,
बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे,
पिल्लू तयात एक.....
 
लहानपणी ही कविता ऐकली की, प्रश्न पडायचा, ते कुरूप, वेडं पिल्लू नक्की दिसत कसं असेल? त्याला कुरूप नेमकं कशामुळे म्हणत असतील? ते इतरांपेक्षा वेगळं दिसतं, म्हणून कुरूप? मुळात सुंदर म्हणजे काय आणि कुरूप म्हणजे काय? त्यानंतर एक वय असंही येऊन गेलं, जिथे आरशासमोर उभं राहून 'सांग दर्पणा, कसा मी दिसतो?' विचारण्याचा मोह त्या वयातल्या स्वप्नांनाच सत्य मानण्याच्या मोहाइतकाच अटळ होता. त्या त्या वयात सौंदर्याची रूढ परिमाणं ही आपण इतरांना कसे दिसतो, यावर जास्त अवलंबून होती. त्यातच टिपिकल भारतीय सौंदर्यदृष्टीला अनुसरून ‘गोरं म्हणजे सुंदर’ असं उथळ (आता उथळ वाटतं, पण त्या वेळी अतिशय महत्वाचं वाटणारं...) नरेटिव्ह डोक्यात फिट झाल्यामुळे ‘आपण आयुष्यभर कुरूप वेडेच राहणार का?’ हा प्रश्न जीवनमरणापेक्षा मोठा वाटायला लागला होता. सामान्यत: पुरूषाचं आदर्श व्यक्तिमत्व ‘Tall Dark Handsome’ या तीन शब्दांत सामावतं. आमच्याकडे यातला डार्क आणि तोही काळा रंग असल्यानं रूप आणि त्यासंदर्भातल्या समस्त चांगल्या गोष्टी आमच्याबाबतीत लागू होऊच शकत नाहीत, याचा कॉम्प्लेक्स त्या एका वयात खूपच जोरावर होता.
आपल्याकडे नेहमी एक वाक्य पुन्हापुन्हा ऐकवलं जातं, "Beauty lies in the eyes of the beholder...." वयाच्या त्या फेजमध्ये कळत नकळत हा बिहोल्डर म्हणजे आपल्याच आजूबाजूचा समाज, अशी समजूत दृढ व्हायला लागते..... दर्पणाला आपल्या रूपाचं वर्णन करायला सांगणारे आपण, कधी कोणाच्यातरी डोळ्यांमध्ये आपला दर्पण शोधू लागतो, ते आपलं आपल्यालाही कळत नाही..... त्यातही सिनेमा, नाटकं आणि भरीस भर म्हणून गल्लोगल्ली निघालेले व्यक्तिमत्व विकास वर्ग यासगळ्यांनी रूप आणि शरीर या नैसर्गिकपणे सुंदर असलेल्या गोष्टींना फक्त एक 'प्रॉडक्ट' म्हणून समोर आणण्याचं काम अनेक वर्षं अव्याहतपणे केलेलं आहे. साहजिकच, काश्मीरच्या सुंदर बागांमध्ये फक्त गोडगोंडस दिसणाऱ्या हिरो-हिरॉईन्सनंच फिरायचं, असा एक विचित्र गैरसमज समाजात अजूनही रुजून आहे. पण, यासगळ्यापलीकडे जाऊन विचार करताना वय वाढताना ज्यांच्याबाबतीत हा समाजाचा दर्पण हळूहळू विरळत जातो, तेचि जीव भाग्याचे!
तळ्यातली सगळीच पिल्लं ज्या वेळी सुंदर दिसू लागतात, तिथे कुरूपतेला जागाच उरत नाही. मुळातच, सुंदर आणि कुरूप यांच्या व्याख्या जसजशा बदलत जातात, तस तसं त्यांच्यातलं अंतरही धूसर होत जातं. चेहऱ्यावरच्या ॲसिडच्या डागांची पर्वा न करता कमालीच्या आत्मविश्वासानं वावरणारी एखादी मुलगीही मधुबालाइतकीच दैवी सौंदर्यवती वाटायला लागते. रणरणत्या उन्हात घामानं चिक्क भिजलेला, रापलेला चेहरा घेऊन राबणारा कामगारही हिरो वाटू लागतो. धूळमाखल्या जमिनीवर फतकल मारून आपल्या खेळण्यात मग्न असलेलं मजुराचं पोर आणि पावसानं भिजून चिंब झालेल्या अंगणात नाचणारा मोर, यांच्यात सौंदर्याची स्पर्धा करायची तरी कशी? दोघेही सुंदरच! नुकत्याच पडून गेलेल्या पावसानं आणि त्यावर उतरलेल्या कोवळ्याशार उन्हाच्या चमकीनं शृंगारलेली ढेकळं आणि त्यांवरनं नागर फिरवत चालणारा शेतकरी, ह्यातलं सौंदर्य उमजायला दर्पणाची नाही, नजरेची भव्यता हवी.
वपु म्हणतात, 'आपल्या नवऱ्याच्या पिवळ्या बनियनची पर्वा न करता जी त्याच्या कुशीत शिरते, तीच त्याची वहिदा रहमान असते.' या पलीकडचा सहज, सार्वत्रिक आणि कोवळा सौंदर्याचा दाखला अजून माझ्या तरी पाहण्यात कुठेच नाही आलाय. देवानं ही विशाल सृष्टी निर्माण करताना एक चेहराही तंतोतंत दुसऱ्या चेहऱ्यासारखा बनवलेला नाही. इतक्याशा गोष्टींमधून इतकी अफाट, अथांग निर्मिती झाली असेल, तर त्याला सुंदर आणि कुरूपतेची परिमाणं जोडणारे आपण खरंच कोणी असतो का? कुरूपता शरीरात नसते, विचारात असते, हे जाणवायला आधी विचारांच्या सौंदर्याशी परिचय तर व्हायला नको का?
दर्पणाशिवाय आपण आपल्याच नजरेतून स्वत:ला संपूर्ण पाहू शकत नाही, तिथे दुसऱ्या कोणाच्या सौंदर्याची तुलना करणार तरी कशाशी? पण हा सगळा विचार तेव्हाच शक्य होतो, जेव्हा चेहऱ्यासमोरचा दर्पण विरळू लागतो आणि आपल्याच मनातला एक अदृश्य दर्पण आपल्यालाच विचारू लागतो, 'सांग दर्पणा, कसा मी दिसतो?' प्रश्न तर पडलाय..... उत्तर ज्याचं त्याने शोधावं!
- अक्षय संत