श्रीमान योगी

युवा विवेक    22-Jan-2022
Total Views |

shreeman yogi 
#दुमडलेल्या_पानापाशी
माझ्या वाचनाची सुरुवात (म्हणजे इसापनिती वगैरेतून बाहेर पडल्यावर) श्रीमान योगीने झाली. रणजित देसाई यांच्या या कादंबरीने एकूणच मराठी पुस्तकविश्वात 'लोकप्रिय' शब्दाची नवी व्याख्या केली, हे कोणीही नाकारणार नाही. अगदी आजही काय वाचलं? किंवा काय वाचावं असा प्रश्न विचारल्यावर पहिल्या चार-पाच नावातच अनेक जण श्रीमान योगी हे नाव सूचवतात.
एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडणारी ही कादंबरी आहे. 'कादंबरी' या एका शब्दांतच तिची बलस्थानं आणि मर्यादा स्पष्ट होतात. कादंबरी असल्याने रंजकतेला वाव आहे. कल्पनाविलास, संवाद, शब्दफेक, शैली, वातावरण निर्मिती आदी सर्व घटक आहेतच. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्याला कदाचित यातून काही साध्य होणार नाही. स्वत: रणजित देसाई यांनीदेखील तशी स्पष्ट कबुली 'मनसुबा'मध्ये दिली आहे. ते म्हणतात, 'ही कलाकृती म्हणजे शिवचरित्रावरील सर्वांगीण विचार, असा माझा दावा नाही.' हे असं असलं, तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना विषयप्रवेश म्हणून नक्कीच ही कादंबरी वाचायला हवी...!
खरं म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास करून त्यावर कंटाळवाणी किंवा बोजड होणार नाही अशी कादंबरी लिहिणं, हे म्हणजे वादळाला कवेत घेऊन ते इतरांना मात्र 'झुळूक' म्हणून समजावून सांगण्यासारखं आहे. हे कार्य देसाईंनी खूप सुंदर पद्धतीने केलं आहे. छत्रपती शिवराय यांच्या जीवनातील प्रमुख घटना, त्यातील नाट्यमयता, वेगवेगळ्या पात्रांचे संवाद, घटनाक्रम याची बांधणी अतिशय हातोटीने केल्याने कुठेही तुटकता जाणवत येत नाही. कादंबरी तुमच्यासमोर त्या घटना उभ्या करते, असं न म्हणता, त्या काळापाशी नेऊन तुम्हाला सोडते, असं मी म्हणेन. केवळ महाराजच नाही, तर त्यांच्या आयुष्यातील सर्व प्रमुख व्यक्ती आणि घटना तेवढ्याच ताकदीने लेखकाने मांडल्या आहेत. त्यामुळे पुतळा बाईसाहेब अगदी अशाच असतील.. किंवा मासाहेब असंच बोलत असतील, असे विचार मनात येऊन जातात. तोरण्याच्या चढाईपासून ते पावनखिंडीपर्यंत आणि पुरंदरच्या तहापासून ते आग्र्याहून सुटकेपर्यंतच्या सर्व घटना नव्हे नव्हे तो इतिहास देसाईंनी उभा? नव्हे नव्हे तर 'संजीवन' केला आहे.
कादंबरीला नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या बुद्धीवादी भाष्यकाराची प्रस्तावना लाभली आहे. कुरुंदकरांनी तीस पानांमध्ये अकराशे पानांच्या कादंबरीचं आणि छत्रपती शिवाजी या व्यक्तिमत्वाचं केलेलं विश्लेषण अफाट आहे. लेखन आणि महाराजांबाबत त्यांनी केलेली मांडणी नव्याने शिवचरित्राचा ढांडोळा घेण्यास भाग पाडणारी आहे. मात्र, कादंबरी वाचल्यावर ही प्रस्तावना वाचावी असा माझा सल्ला आहे. कारण, ही प्रस्तावना म्हणजे याच कादंबरीवरची उत्तम टीकाही आहे. त्यामुळे आधी मूळ कलाकृती वाचणेच श्रेयस्कर ठरेल.
रसिकहो, मराठी मनाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवराय ज्या कादंबरीतून सामान्य वाचकांपर्यंत पोहोचले, त्याबाबत मला नक्की काय लिहू, असं झालंय.. तुम्ही माझी 'कोंडी' समजू शकाल, अशी आशा आहे. सरतेशेवटी, इतकंच सांगावसं वाटतं की, पुस्तकं आपले मित्र, सखा, वाटाड्या, मार्गदर्शक वगैरे असतात. मात्र, काही कलाकृती आपले श्रद्धास्थान असतात... श्रीमान योगीचं माझ्या आयुष्यातील स्थान तेच आहे....!!
- मयूर भावे