व्हिटॅमिन डी

युवा विवेक    15-Oct-2022
Total Views |

vitamin D
 
 

पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार.

या लेखांच्या मलिकेमधून आपण वेगवेगळ्या आहार तत्वांची माहिती घेतो आहोत आणि त्यांच्या कमतरता असतील तर आहारातून काय उपाययोजना करता येतील हे पाहतो आहोत. मागच्या भागात आपण पाहिले की, हिमोग्लोबिन कमी असण्याची करणे कोणकोणती असू शकतात, त्याची लक्षणे कोणती आणि त्यावर उपाय काय.

 

आज आपण दुसऱ्या नंबरच्या महत्त्वाच्या घटकाबद्दल माहिती घेऊ. तो घटक म्हणजे कॅल्शिअम.

कॅल्शियमचा आपल्या शरीरात लहानपणापासूनच अत्यंत महत्त्वाचा रोल असतो. हाडांची मजबुती, दातांची मजबुती आपल्या शरीरातील कॅल्शियम च्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणूनच लहानपणापासूनच आहारामध्ये कॅल्शियमचे प्रमाण योग्य राखले गेले तर हाडांची जडणघडण होत असताना ती मजबूत करतात आणि त्यामुळे वाढत्या वयामध्ये कमजोर हाडांमध्ये होणारा त्रास टाळता येऊ शकतो.

 

महिलांना, विशेषतः menopause चे वय जवळ आलेल्या महिलांना आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. याचे कारण म्हणजे, menopause च्या काळात स्त्री मधल्या estrogen या हार्मोनचे प्रमाण कमी झाल्याने हाडे ठिसूळ होऊ लागतात. अशात जर कॅल्शियमची कमतरता स्त्रिच्या शरीरात असेल तर हाडांच्या ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी संधिवात, सांधेदुखी, osteoporosis असे रोग होण्याची शक्यता असते.

 

स्त्रियांनी वयाच्या तिशीनंतर आहारातून कॅल्शियमचे प्रमाण योग्य राखण्यास सुरुवात करायला हवी. कारण या वयापर्यंत जास्त त्या महिलांची किमान एक तरी प्रसूती झालेली असते आणि किमान एका तरी अर्भकाला त्या स्त्रीने स्तनपान केलेले असते. त्यामुळे स्त्रिच्या शरीरात पोषण तत्वांची कमतरता निर्माण होते. या वयानंतर स्त्रियांना हाडांचे दुखणे, फार वेळ चालणे किंवा उभे राहणे झाल्यास पाय दुखणे अशा समस्या सतावू लागतात. याच्यामागे अनेकदा कॅल्शियमची कमतरता हे कारण असू शकते.

 

आणखी एक समस्या आजकाल स्त्री पुरुष दोघांमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता. कोव्हिडच्या पहिल्या लाटेत आपल्या सर्वांवर कडक निर्बंध लादले गेले होते. जवळपास वर्षभर अनेक लोक आपल्या घरातून फक्त अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडत होते. यामुळे पुरेश्या प्रमाणात सूर्यकिरणे न मिळू शकल्याने सुमारे ऐशी टक्के लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता आता सतावू लागली आहे. तुम्ही विचार करत असाल की, कॅल्शियम बद्दल बोलता बोलता मी अचानक व्हिटॅमिन डी बद्दल का बोलू लागले! मात्र हाडे मजबूत राहण्यासाठी व्हिटॅमिन डीचा प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्ष सहभाग असतो. शरीरात व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी असेल तर तुमची आहारातून अगदी मुबलक प्रमाणात कॅल्शियम घेतले तरीही ते हाडांमध्ये शोषले जात नाही. त्यामुळे अगदी कॅल्शियमच्या गोळ्या घेऊनही फायदा होत नाही. म्हणूनच जर कॅल्शियमची कमतरता आहे असे सिद्ध झाले तर तातडीने व्हिटॅमिन डीची सुद्धा टेस्ट करून घ्यावी, म्हणजे नक्की समस्या काय आहे याचा छडा लावणे सोपे जाते.

 

फार जास्त प्रमाणात या दोन्ही पोषण तत्वांची कमतरता असल्यास डॉक्टर कॅल्शियमसाठी गोळ्या सुचवतात. त्या जरूर घ्यायला हव्यात. शिवाय रोजच्या आहारात दूध, मासे, पांढरा ब्रेड, संत्र्याचा रस, ब्रोकोली, कडधान्ये असे परार्थ मुबलक प्रमाणात असायला हवेत. विशेषतः दूध, आणि मांसाहार करत असाल तर मासे! हे दोन्ही पदार्थ कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहेत. याशिवाय जर व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर रोजच्या आहारात अंडी समाविष्ट करावीत. दुर्दैवाने फक्त आहारातून व्हिटॅमिन डीचे संतुलन राखणे शक्य नसते. त्यामुळे रोज कोवळ्या उन्हात किमान वीस मिनिटे चालणे किंवा बसणे हा उपाय व्हिटॅमिन डीची कमतरता बरी करण्यासाठी खूप उपयोगी पडतो.

 

हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक आहेत. म्हणूनच बऱ्याच कॅल्शियमच्या गोळ्यांमध्ये व्हिटॅमिन डीचा सुद्धा समावेश केला जातो. शरीराच्या जडणघडणीत आणि वाढत्या वयात शरीराचे कार्य नीट सुरू रहण्याकरता हाडे मजबूत असणे खूप गरजेचे असते. म्हणूनच जर तुमचे वय तीस पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला हाडे दुखण्याचा त्रास होत असेल तर एकदा या दोन्ही साठी चाचण्या करून घ्या आणि योग्य तो बदल तुमच्या आहारात नक्की करा.

 

पुढच्या भागात एखादा नवा घटक घेऊन पुन्हा भेटू.

Till then stay healthy be happy

दीप्ती काबाडे

आहारतज्ञ