व्हिटॅमिन बी १२

युवा विवेक    29-Oct-2022
Total Views |

 vitamin b 12
 
 
व्हिटॅमिन बी १२

सर्व वाचकांना पुन्हा एकदा दीप्तीचा नमस्कार. मित्रांनो, दिवाळी होऊन गेली नुकतीच. आशा आहे की, सर्वांनी खूप धमाल केली असेल. भरपूर गोड पदार्थ, फराळ आणि पक्वांनांचा आस्वाद घेतला असेल. परंतु आता हळुहळू पुन्हा आपल्या सकस आहारावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करूया. गेल्या भागात आपण व्हिटॅमिन डीच्या कमतरतेबद्दल आणि त्यासाठी आपण करू शकू अशा उपायांबद्दल पाहिले. आज आपण अखी एका महत्त्वाच्या व्हिटॅमिन बद्दल माहिती घेऊ. ते म्हणजे व्हिटॅमिन बी १२.

 
आपण सर्व जाणतोच की, रक्तात लोह किंवा हिमोग्लोबीन यापैकी एकाची कमतरता असेल तर व्यक्तीला Anemia होऊ शकतो. परंतू आपल्याला माहित आहे का, व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे सुद्धा Anemia होऊ शकतो? व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर लाल रक्तपेशी तयार होण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परीणाम होतो आणि बिघाड असणाऱ्या लाल रक्तपेशी तयार होतात. या बिघाड असणाऱ्या लाल रक्तपेशी मध्ये प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता नसते. परिणामी लाल रक्तपेशी असूनही नसल्यासारख्या असतात. हाही Anemia चा एक प्रकार आहे. शिवाय व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे DNA Synthesis च्या कामातही अडथळा निर्माण होतो. मेंदूच्या कामावरही या कमतरतेचा विपरीत परीणाम होतो. म्हणूनच शरीरात व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण संतुलित असणे खूप आवश्यक आहे.
 
 
आता पाहूया, याची कमतरता कशी ओळखावी.
व्हिटॅमिन बी १२ कमी असण्याने मुख्यत्वे लाल रक्तपेशी कमी होत असण्याने याची लक्षणे सुद्धा प्रामुख्याने Anemia सारखी असतात. त्यामुळे सतत थकवा वाटणे, थोडे चालले किंवा जलद गतीने काम केले तर धाप लागणे, श्वास जलद होणे ही लक्षणे जशी हिमोग्लोबीनची कमतरता दर्शवतात, त्याचप्रमाणे हीच लक्षणे व्हिटॅमिन बी १२ ची सुद्धा कमतरता दर्शवतात.
रक्तपेशी कमी असल्याने त्वचा आणि नखे फिकट दिसणे, चेहऱ्यावरची चमक नाहीशी होणे, डोळ्यातले तेज नाहीसे होणे ही सुद्धा लक्षणे सामाईक आहेत.
 
 
या व्हिटॅमिन च्या कमतरतेमुळे मेंदूच्या कामावर परीणाम होत असल्याने काहींना सतत मंद स्वरूपाची डोकेदुखी जाणवते. काहींना कामावर, अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अशक्य होते.
यापैकी कोणतीही लक्षणे सतत असतील तर रक्तचाचणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच आणखी एक लक्षण व्हिटॅमिन बी १२ ची गंभीर कमतरता दर्शवते. ते म्हणजे सततचा न थांबणारा डायरीया. कोणत्याही औषधांनी परिणाम होता नाही.
 

त्वरित कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन बी १२ च्या गोळ्या किंवा इंजेक्शन घेणे उत्तम. मात्र कायमस्वरूपी उपाय म्हणून आपल्या आहारात काही प्रमुख बदल करणे गरजेचे असते.

१. रोजच्या आहारात अंडी, मासे यांचा समावेश करावा.

२. आठवड्यातून किमान तीन दिवस ब्रेकफास्ट मध्ये ओट्स, कॉर्न फ्लेक्स किंवा मूसेली दुधातून खावेत.

३. रोज एकदा किमान एक कप दूध प्यावे.

हे नियमितपणे केल्यास व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून निघते.

एक गोष्ट लक्षात घ्या. जसजसे वय वाढत जाते, तसतसे या व्हिटॅमिन ची शरीरात शोषून घेण्याची क्षमता सुद्धा कमी होत जाते. त्यामुळे चाळिशी नंतर अनेक स्त्री पुरुषांना व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दिसून येते. आहारातून योग्य प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ घेऊनही शरीराची क्षमता नसल्याने ते नीट शोषून घेतले जात नाही. त्यामुळे अशा रुग्णांना supplements घेणे आवश्यक असते. वाढत्या वयात किमान वर्षातून एकदा तरी रक्तचाचणी करून घ्यावी. त्यामुळे सर्वच कमतरता वेळेत लक्षात येतात आणि उपाययोजना करणे शक्य होते.

 

पुन्हा भेटू पुढच्या भागात एका नव्या घटकाच्या माहितीसह.

Till then stay healthy, be happy

- दीप्ती काबाडे

आहारतज्ञ