मनाचिये गुंती गुफियेला शेला

युवा विवेक    15-Nov-2022
Total Views |

manaachiye guntee gumfiyalaa shelaa
 
 
 
 
 
मनाचिये गुंती गुफियेला शेला
अंधार गर्द जांभळ्या शांततेत पहाट कसलीशी पोतडी घेऊन उभी असते माझ्यासाठी.
तिला द्यायचे आसतात अनंत अनुभव माझ्या ओचे पदतात बांधून, शिदोरी म्हणून...
खराट्याच्याची खरखर, दुधवाल्याच्या आरोळ्या, कुत्र्यांच्या कळवंडी, हमाल गल्लीतली लगबग, नाक्यावरच्या अब्दुल्ला चहावाल्याच्या टीचभर उंचीच्या काचेच्या ग्लासांचा खळखळाट... चहाबरोबर उकळणाऱ्या आल्याचा दरवळ, मारोती मंदिराबाहेरच्या रुईच्या पानांचा ढीग, फुलांचे ढीग,क्लासेसची गडबड असणारी गणवेशातील पोरं, चौकातल्या कामगार पॉइंटवर गुडूप्प अंधारात हजारोंच्या गर्दीत एखादीच विडीचे झुरके ओढत देहाला चार्ज करणारी अर्ध्या वयातली बाई,
अप्पा इडलीवाल्याच्या दुकानातून पखालीच्या पखालभर भूक चाळवणारा इडलीच्या आदणाचा वास, एखाद्या माऊलीची हातात फुलारी, तांब्याभर पाणी घेऊन.. नजणो कोणतं आळवगीत तोंडातल्या तोंडात पुटपुटत; मी म्हणणाऱ्या थंडीत कोणत्याशा देवाच्या ओढीने चालणारी अनवाणी पावलं...आणि त्या संदिग्ध धुक्यात या साऱ्यांना निरखत,अनुभवत चालणारी मी
 
माझ्या मनाचा पसारा अजूनच वेगळा.. कुठल्याशा गुढाच्या ओढीने अख्खा जीव ओढला जाणारा..
तसं पहायला गेलं तर पहाट शांत तरी चलबीचल, स्थिर तरी चंचल असते
त्यातही कर्तिकातली पहाट अगदीच गारूड करुन असते मनावर धुकं भरल्या संदिग्ध वेळा, वाटा
मनाला नजाणो कुठल्या प्रदेशात घेऊन जातात आणि त्यातच ...
 
उठा उठा साधुसंत साधा आपुले हित '
'गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत ..'
 
कानावर पडणाऱ्या काकड्याच्या पुसटशा ओळी मनाला वेगळ्याच मनोअवस्थेत घेवून जातात
दुनियेतल्या करोडो लोकांच्या मनाचा मुस कसा लागायचा,काय चाललेलं असतं त्यांच्या मनात.. अंदाज बांधायचे तरी कसे
आणि बांधावेत तरी का?
प्रत्येकाचे जग वेगळे, प्रत्येकाची माणसं वेगळी, इच्छा वेगळ्या, धेय्य वेगळी, प्रश्न वेगळे एकूणच प्रत्येक माणूस नि त्याचं भावविश्व वेगळं.. जेवढी माणसं तेवढी मनं, तेवढी विश्वं वेगळी...
एक व्यक्ती एक विश्व या न्यायाने पाहिल्यावर अनेक विश्वे आपापल्या तालात, तंद्रीत जगत असतात हेच खरं
अर्थक निरर्थकाच्या पलीकडून विचार केल्यास 'मन' या असणाऱ्या तरीही नसणाऱ्या अवयवा भवती फिरणारा प्रत्येक जीव... कुठल्याशा ईश्वराने नेमून दिलेली कामे किंवा भूमिका अगदी इमाने इतबारे वठवत असतो.
मनाचा वेग, मनाचे बळ, मनाची ताकद.. मन हा विषयच खरतर कधीही संपूर्णत्वा पर्यंत न उकलता येणारा..
बहिणाबाई अगदी अचूक वेध घेतात या मनाचा ज्याचं ठाम असं अस्तित्व देहात नसलं तरी जगणं व्यापून टाकतो
मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.
मन मोकाट मोकाट
त्याले ठायीं ठायीं वाटा,
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्यारे लाटा.
मन लहरी लहरी
त्याले हातीं धरे कोन?
उंडारल उंडारलं
जसं वारा वाहादन.
- अमिता पेठे पैठणकर
क्रमशः