आकाशी फुलला चांदण्यांचा मळा...
चंद्राला पत्र लिहिलं, म्हणून तुम्ही रुसून बसलात होय गं सयांनो? आणि म्हणून ढगाआड लपून बसला होतात? अशा गं कशा तुम्ही….सांगा बरं तुम्हाला विसरेन का मी? शक्यच नाही. तुम्ही जर दिसला नाहीत न, तर इथं मला सुनं सुनं वाटतं, एकटं वाटायला लागतं मग आणि तुम्हाला वाटतंय विसरले मी तुम्हाला...नजरेने मारलेल्या आपल्या गप्पा आठवताहेत ना तुम्हाला?
मी लहान असताना रात्री कधी लवकर झोप आली नाही ना तर बाहेर अंगणात टाकलेल्या कॉटवर पडून तुम्हाला निरखत असायचे. काय म्हणताय? 'चंद्राला पण हेच सांगितलं होतं'... हो गं बायांनो... पण त्याला बघताना तुम्हाला बघणार नाही असं कसं होईल. तुमची जोडी म्हणजे अगदी राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच की. एकमेकांना सोडून राहवतं का तुम्हाला? आणि काय गं...तो पौर्णिमेचा चंद्र आकाशात असल्यावर काय होतं तुम्हाला? त्याला पाहून लाजून कुठं लपून बसता? काही ठराविक जणी सोडल्या तर नेहमीच्या बाकी कुठं लुप्त होतात देव जाणे. मी आपली शोधते शोधते पण काssही सापडत नाहीत त्या. ती रोहिणी बघा जरा…कशी त्याच्यापुढं ताठ असते. म्हणूनच लाडकी ना ती त्याची! बरं, तुम्हाला माहितेय...लहान असताना मी रात्री कधी आईपाशी कंटाळा आलाय म्हणून भुणभुण लावली ना, तर ती मला सांगायची...जा... अंगणात जा आणि चांदण्या मोजत बस जा. कंटाळा जाईल लगेच. मॅडसारखी मी पण जायचे अंगणात आणि बसायचे तुम्हाला मोजायला. थोड्यावेळाने त्याचाही कंटाळा यायचा, मग गुमान जायचे झोपायला. तशीच मोजत बसले असते तर सात जन्म त्यातच संपले असते ना?
लहानपणी मला एक प्रश्न पडायचा की, तुम्हां सगळ्यांना नावं असतील का? तुमची नावं जाणून घ्यायची उत्सुकता असायची फार. रोहिणी, ध्रुव, व्याध अशी थोडीफार मंडळी माहीत होती. म्हणून सगळ्यांनाच नावं असतील का अशी शंका यायची. सगळ्यांना नसतात नावं एवढंच कळलं होतं तेव्हा. पण पुढं मोठी झाल्यावर मात्र थोडाफार अभ्यास, निरीक्षण केलं तुमचं मग अधिक ओळख होत गेली आपली. तारे कोणते, ग्रह कोणते, नक्षत्रं. तुमच्याबद्दल असलेल्या पौराणिक आणि ग्रीक कथा सगळं सगळं हळूहळू कळत गेलं. दुर्बिणीतून जेव्हा तुम्हाला निरखलं तेव्हा तर प्रेमातच पडले तुमच्या. किती वेगळ्या आणि किती जवळ दिसत होतात गं तेव्हा! असं वाटलं आत्ता जर हात पुढं केला तर तुम्हाला हलकेच स्पर्श करता येईल. पण हे नुसतंच जर-तर असं होणं थोडीच शक्य आहे...तुम्ही तर माझ्यापासून इतक्या इतक्या लांब की त्या अंतराचा आकडा लिहितानाही दमायला व्हायचं. नुसत्या डोळ्यांनी तुमच्याकडे पाहताना एकट्या दिसणाऱ्या तुम्ही...दुर्बिणीतून पाहिलं की एकदम घोळक्याने दिसायला लागता. घोळका करुन काय करत असता? गॉसिपिंग प्रकार तुमच्यात पण असतो की काय? गंमत हं...पण दुर्बिणीतून किती छान दिसता गं खरंच. त्याबरोबर जर तुमच्याबद्दलच्या कथा आधी माहीत असतील ना तर तुम्ही जास्त ओळखीच्या वाटायला लागता. ही ओळख झाल्यावर, आकाशातल्या तुमच्या जागा माहीत झाल्यावर तुमचे आकार बघितले ना की तिथं खरंच मृग, सिंह किंवा वृश्चिक म्हणजे विंचवाचा आकार बरोबर ओळखू येतो. मग हळूहळू हे आकार शोधण्यात माझी मी कधी रमून जाते कळतही नाही मला.
पण एक सांगू...लहानपणी कोकणातल्या अंगणामधून तुम्हाला बघण्याचं जे सुख होतं ना ते पुढं शहरात गेल्यावर मात्र रुसून बसलं. शहरातल्या दिव्यांच्या झगमगाटामुळे तुमचं लुकलुकणं अगदीच मंदावून गेलं. मग मी खास तुम्हाला भेटायला म्हणून शहरापासून दूर असलेल्या एखाद्या ठिकाणी जायचे. आठवतात का तुम्हाला त्या भेटी? तिथून तुम्हाला पाहिलं तर तुमच्यामुळं आकाश किती खचाखच भरलेलं दिसायचं गं. नेहमीच्या तुम्ही तिथून पटकन ओळखूच यायच्या नाहीत. किती प्रयत्न करुन तुम्हाला त्या गर्दीतून शोधून काढावं लागायचं. चांदण्यांचा मळाच आकाशात फुललाय असं वाटायचं जणू. तिथं गेल्यावर मात्र ते रुसून बसलेलं सुख अगदी मनमोकळेपणाने खुलून यायचं. आकाशातला तुमचा तो तोरा पाहिला की मलाही तुमच्या गर्दीत सामावून जावं वाटायचं. कधी आले तर चालेल का गं तुम्हाला? मला उपरं तर समजणार नाही ना? आणि कधी कधी मधेच काय होतं म्हणे तुम्हाला… तुटणारा तारा बघते ना मी. एकमेकींशी भांडूनबिंडून ढकलाढकली करता की काय? असं तुम्हां कोणाला खाली पडताना पाहिलं की पूर्वी मला आपलं वाटायचं की एखादी तरी माझी सखी माझ्यापाशी येईल. पण कुठंच काय...मधल्यामध्ये हवेतच कुठं गायब व्हायची ती काय जाणे. नंतर नंतर मात्र मी वाट बघणं सोडून दिलं बरं का कंटाळून. म्हटलं लांबून छान मैत्री आहे ती तशीच लांबून बहरत राहू द्यावी. जरा मोठी झाल्यावर कोणी सांगितलं की असा तुटणारा तारा दिसला की मनात काहीतरी इच्छा मागावी, ती पूर्ण होते म्हणे. पण तुम्हाला मनसोक्त बघणं हीच इच्छा आहे गं माझी. ते खट्याळ ढग मधे आले नाहीत तर आपली भेट आहेच कायमची. हो ना? आता रात्र होत आलेय, पत्र बास करते आणि येतेच अंगणात तुम्हाला भेटायला…
एक निशाचर मी….
जस्मिन जोगळेकर.