सांधेदुखी किंवा संधिवात

युवा विवेक    10-Dec-2022
Total Views |

sandhedukhi
 
 
 
 
सांधेदुखी किंवा संधिवात
 

नमस्कार मित्रांनो! कसे आहात सर्वजण? मजेतच असाल! चला तर मग, आज आणखी एका महत्त्वाचा विषय घेऊन लेखाला सुरुवात करू. सांधेदुखी किंवा संधिवात हा आजार आपल्या सर्वांना माहीत आहेच. परंतु आज या आजाराची सामान्य लक्षणे आणि काही साधे उपचार पाहू.

 

जसजसे वय वाढत जाते, शरीरातील सर्व सांध्यांच्या कार्याची क्षमता कमी होत जाते. विशेषतः जर तुम्ही महिला असाल आणि तुमचा menopause जवळ आलेला असेल किंवा झाला असेल तर तुमच्या शरीरातील सर्व हाडांची घनता कमी होत जाते. ती ठिसूळ होऊ लागतात. हाडांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण कमी होणे आणि ती ठिसूळ होणे ही संधिवाताची खरी सुरुवात आहे! मात्र हे घडत असताना जर तुम्ही वेळच्यावेळी हेल्थ चेक अप करत नसाल तर स्वतःच्याच शरीरात घडणाऱ्या या बदलाची तुम्हाला जाणीव होत नाही. यापुढची पायरी म्हणजे हाडांच्या दोन सांध्यामध्ये असणाऱ्या वंगणाची झीज होणे. हे वयपरत्वे घडत जाते. जी व्यक्ती हाडांचा वापर अती प्रमाणात करते त्या व्यक्तीच्या सांध्यातील वंगण लवकर झिजते. वंगण कमी झाल्याने दोन हाडे एकमेकांवर घासू लागतात. सततच्या या घर्षणाने हाडांची झीज होऊ लागते. हाडे दुखू लागतात. त्यांना सूज येते. त्यावरची त्वचा लाल होते. यालाच सांधेदुखी म्हणतात. अनेकदा शरीरात वात प्रकृती जास्त असेल तर वंगण वेगाने झिजू लागते. म्हणूनच याला संधिवात असेही म्हणतात. सांधेदुखी म्हणा किंवा संधिवात म्हणा, काही खबरदारी घेतली तर पुढचा त्रास नक्कीच टाळता येतो.

 

जर तुमचे वय चाळीस किंवा त्याहून जास्त असेल तर वर्षातून किमान एकदा तरी तुम्ही पूर्ण हेल्थ चेक अप करून घ्यायला हवे. कॅल्शिअम कमी झालेले आढळले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजेची सप्लिमेंट घ्यायला हवीत. जर गोळ्या घेण्याची गरज भासत नसेल तर आहारात काही महत्त्वाचे बदल नक्कीच करायला हवेत. रोज दूध पिणे, अंडी खाणे, आहारात मासे मांसाहार यांचे योग्य प्रमाण राखणे, आठवड्यातून किमान दोन वेळा हिरव्या पालेभाज्या खाणे असे काही महत्त्वाचे बदल केले तर महिन्याभरात चांगला बदल दिसून येतो.
 

शिवाय जर व्हिटॅमिन-डीची कमतरता आढळली तर रोज सकाळी कोवळ्या उन्हात किमान वीस मिनिटे पाय उघडे ठेवून फिरावे. पायांच्या वेदना कमी होतात. काही कारणांनी तेल तूप आहारातून पूर्ण वगळले असेल किंवा प्रमाण अत्यल्प असेल तरीही संधिवाताचा त्रास होऊ शकतो. सांध्यांमध्ये असणारे वंगण व्यवस्थित टिकण्यासाठी तेल आणि तूप अत्यंत गरजेचे आहे. कोलेस्टेरॉल, हृदयविकार अशा कारणांनी जर तुम्ही तेल टाळत असाल तर किमान एक चमचा गाईचे तूप रोजच्या जेवणात असावे. तुपाने फक्त चांगले कोलेस्टेरॉल वाढते. आहारात तुपाचे योग्य प्रमाण राखल्याने बद्धकोष्ठता सुद्धा कमी होण्यास मदत होते.

 

सांधेदुखी अनेकदा गुढग्यांपासून सुरू होते. कारण, नेहमीच्या वापरातील सगळ्यात महत्त्वाचा सांधा आहे. पूर्ण शरीराचा भार आपल्या पायांवर असल्याने या आजाराची सुरुवात बऱ्याचदा गुडघेदुखी पासून होते. म्हणूनच पाय किंवा गुडघे दुखू लागले, चालताना, जिने चढताना वेदना होऊ लागल्या, खाली मांडी घालून बसताना किंवा उभे राहताना हाडे कडकड वाजू लागली तर ही लक्षणे दुर्लक्षित ठेवू नका. आजार प्रमाणाबाहेर वाढला तर गुडघे ट्रान्सप्लांट करावे लागू शकतात. म्हणूनच लक्षणे दिसू लागल्यावर ताबडतोब डॉक्टर गाठा आणि योग्य उपचार घ्या.

 

पुन्हा भेटू पुढल्या भागात.

Till then stay healthy be happy.

 

दीप्ती काबाडे

आहारतज्ञ