'मेटबॉलिझम' म्हणजे काय?

युवा विवेक    30-Apr-2022
Total Views |

'मेटबॉलिझम' म्हणजे काय?


metabolism

आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदाने जगायचे असेल, तर माणसासाठी सर्वांत जास्त महत्त्वाचं काय? अर्थातच आरोग्य! निरोगी आयुष्यच खरं सुखी आयुष्य असू शकतं. फक्त निरोगी शरीरच सुखी आणि आनंदी आयुष्याचा अनुभव घेऊ शकतं. तुम्ही अगदी राजमहालात जरी राहत असाल, उंची महागड्या वस्तू तुमच्या पावलापावलावर अंथरून ठेवलेल्या असतील, तरी तुम्ही त्या सर्व सुखसोयींचा आस्वाद तेव्हाच घेऊ शकाल जेव्हा तुम्ही निरोगी असाल. अर्थात, शरीर म्हटलं की, कधी न कधी, काही न काही तक्रार तर उद्भवणारच! परंतु काही गोष्टींची काळजी आवर्जून घेतली, तर आपण सर्व जण अशा तक्रारींना जास्त काळ स्वतःपासून दूर ठेवू शकतो. आज-काल प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये एक समस्या सर्रासपणे दिसून येत आहे ती म्हणजे वजन जास्त असणे. वरवर पाहणाऱ्याला नेहमी असेच वाटत असते की जाड व्यक्ती खूप जास्त प्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीने, चुकीचे अन्न सेवन करत राहते, आणि म्हणून ती जाड असते. अशा व्यक्तीला तिच्या आसपासच्या व्यक्तींकडून सतत एकच सल्ला दिला जातो, तो म्हणजे जरा कमी खा! मात्र, खरंच जास्त खाणे हेच वजनवाढीमागचे एकमेव कारण असते का?


निरोगी शरीराची पहिली पायरी म्हणजे उत्तम मेटबॉलिझम (Metabolism). हा शब्द आपण अनेकांच्या तोंडून कधी न कधी ऐकतो. कधी डॉक्टरांच्या तोंडून, तर कधी डाएटिशियन लोकांच्या तोंडून. या शब्दाचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगायचा, तर मेटबॉलिझम म्हणजे आपल्या शरीराची अन्नपचन करण्याची शक्ती. अन्नसेवन केल्यानंतर ते पोटात गेले आणि पचन झाले असे होत नाही. पचनप्रक्रिया फार गुंतागुंतीची असते. पोटात गेलेले अन्न आधी पोटातल्या सिडने विभाजित केले जाते. त्यांनतर त्यातील आवश्यक अशा घटकांचे शरीरास उपयुक्त अशा लहान घटकांमध्ये रूपांतर केले जाते. आणि मग ते घटक रक्तात शोषून घेतले जातात. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे पचन; परंतु मेटबॉलिझम जर उत्तम नसेल, तर ही प्रक्रिया अर्धवट घडते. सामान्यतः आपण सेवन केलेल्या पदार्थाचे पूर्णपणे विघटन होऊन त्याचे संपूर्णपणे रूपांतर शरीरास उपयुक्त अशा घटकांमध्ये होणे गरजेचे असते. तसे घडले तर अन्नातील उपलब्ध असणारी पूर्ण ऊर्जा शरीराला मिळते. असे निरोगी मेटबॉलिझम असणाऱ्या व्यक्तीची पचनसंस्था उत्तम काम करत असते आणि अशी व्यक्ती निरोगी राहते.

जेव्हा मेटबॉलिझम काही कारणांनी बिघडते किंवा त्याची गती मंदावते तेव्हा पचनसंस्था सुद्धा बिघडते. आपण जे अन्न सेवन करतो त्याचे विघटन होण्यास फार वेळ लागतो. अन्नाचे विघटन अर्धवट होते. त्यामुळे फक्त काही भाग पूर्णपणे शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या घटकांत रूपांतरित होतो. फक्त याच भागाचे रक्तामार्फत शोषण होऊ शकते. अर्धवट पचलेला जो भाग पोटात शिल्लक राहतो त्याचे पचनसंस्थेद्वारे मेदात म्हणजेच फॅट्स मध्ये रूपांतर होते. हा मेद म्हणजेच बोलीभाषेत ज्याला आपण चरबी म्हणतो, ती शरीरात साठत जाते; परिणामी, वजन वाढत जाते.

मेटबॉलिझम बिघडण्याचे किंवा त्याची गती मंदावण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळते. याचे कारण हे, की स्त्रियांचे शरीर हार्मोनल पातळीवर अनेकवेळा स्थित्यंतरातून जात असते. विशेषतः गर्भारपण, प्रसूती ही दोन महत्त्वाची कारणे आहेत. याशिवाय मासिक पाळीच्या समस्या असल्या तरीही मेटबॉलिझम मंदावते. प्रसूती जर सिझेरियनद्वारे झाली असेल, तर मेटबॉलिझम स्लो होण्याचे प्रमाण जास्त असते. दोन सिझेरियन झाली असतील, तर हे प्रमाण दुप्पट असू शकते! याचमुळे लग्नाआधी अगदी आदर्श वजन असणारी स्त्री कधीकधी दोन मुलांची माता बनली की तिचे वजन कमालीचे वाढत जाते.

शरीरात फॅट्स साठण्याचे दोन मार्ग असतात. पहिला, चुकीच्या आहाराच्या सवयी. तेलकट पदार्थ, अतिगोड पदार्थ, प्रोसेस्ड फूड यांचे सातत्याने सेवन करत राहिले तर पचनशक्तीवर अतिरिक्त भार पडत राहतो आणि कालांतराने ती कमकुवत होते. याचमुळे असे पदार्थ सतत खाणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात मेदाचे प्रमाण वाढत जाते. अशा चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे जर वजन वाढलेले असेल तर वजन कमी करणे फार सोपे असते. व्यक्तीला फक्त आपल्या सवयी सुधारून चांगल्या आहाराच्या सवयी लावून घ्याव्या लागतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायामाचा अभाव. पुरुषांमध्ये प्रामुख्याने हे कारण पाहिले जाते. दिवसातून किमान अर्धा ते एक तास व्यायाम केल्यास नक्कीच मेटबॉलिझम सुधारते. या व्यायामासाठी जिम लावणेच गरजेचे आहे असेही नाही! घरच्याघरी करण्यासारखे body weight exercizes आणि cardio workout, भरभर चालणे (Brisk walk), धावणे या व्यायामांनी सुद्धा मेटबॉलिझम जलद होण्यास मदत होते.

फॅट्स साठण्याचा दुसरा मार्ग म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे आहाराव्यतिरिक्त इतर कारणे. यात प्रामुख्याने चाळिशीनंतरचे वय, स्त्रियांच्या बाबतीत हार्मोनल समस्या, शस्त्रक्रिया ही कारणे जास्त दिसतात. या कारणांनी जेव्हा मेटबॉलिझम मंदावते, तेव्हा त्यात आहाराचा फार दोष नसतो. कितीही संतुलित आणि पोषणतत्वांनी परिपूर्ण असा आहार घेतला तरी दोषयुक्त पचनामुळे अन्नाचे फॅट्समध्ये रूपांतर होतच राहते आणि परिणामी आहाराची सर्व काळजी घेऊनही वजन वाढतच राहते!

दोषपूर्ण किंवा मंदावलेल्या मेटबॉलिझममुळे फक्त वजनच वाढते असे नाही. एकंदरच अन्नातील महत्वाचे घटक पूर्णपणे शरीराला न मिळाल्याने शरीरात आवश्यक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. व्हिटॅमिन्स, लोह, कॅल्शियम अशा घटकांची कमतरता शरीरात निर्माण होते. शिवाय सेवन केलेल्या अन्नातील संपुर्ण ऊर्जाही शरीराला उपलब्ध न झाल्यामुळे ऊर्जेचीसुद्धा कमतरता निर्माण होते. म्हणूनच दोषपूर्ण मेटबॉलिझम असणाऱ्या व्यक्ती लवकर थकतात. अन्नाचे पचन वेळेत होऊ न शकल्याने पचनसंस्थेचे त्रास अशा व्यक्तींना जडतात. दुपारी जेवण झाल्यांनातर पोट फुगणे (bloating), बद्धकोष्ठता, सिडिटी, गॅसेस असे पचनसंस्थेशी निगडित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच शरीराचे मेटबॉलिझम उत्तम असणे ही निरोगी आरोग्याची पहिली पायरी समजली जाते.

आपण मेटबॉलिझम बिघडण्याची कारणे तर पाहिली. शिवाय चुकीच्या अन्नामुळे आणि आहाराच्या सवयीमुळे बिघडलेले मेटबॉलिझम सहज सुधारता येऊ शकते, हेही आपण पाहिले. मात्र जर इतर कारणांनी ते बिघडलेले असेल तर? जर आहाराचा दोष नसेल तर? अत्यंत मोजूनमापून आणि काटेकोरपणे काळजी घेऊन चांगले अन्नच सेवन केले, तरीही वजनकाटा अजिबात हलत नसेल तर? व्यायाम करूनही वजन कमी होत नसेल तर? असे काही नैसर्गिक उपाय आहेत का, की जे मेटबॉलिझम पुन्हा सुधारून वजनावर नियंत्रण आणू शकतात? जे पचनसंस्था पुन्हा सुधारून शरीरातल्या आवश्यक घटकांच्या कमतरता भरून काढू शकतात?

हो... निश्चितच असे उपाय आहेत. या उपयांबद्दल आपण सविस्तरपणे पुढल्या भागात बोलू. तोपर्यंत... Stay Healthy and be Happy.

- दीप्ती काबाडे

=Nutrition consultant)