कुल्फी

युवा विवेक    12-May-2022   
Total Views |


kulfi

जो चल रहा था तम गया

जो तम गया था चल पड़ा

उसी पुरानी राहपे

फिर से में निकल पड़ा

पुराने सिक्कों से खरीद ली

कुल्फी, कुल्फी

'१०९ नॉट आउट' सिनेमातील हे गाणं! नॉस्टॅल्जिया आणि आठवणींच्या गल्लीत जायचं असेल, तर नक्की ऐका. आईस्क्रीम आणि कुल्फी तसे एकाच 'फ्रोझन डेझर्ट' वर्गातले; पण तरीही फरक आहे. कुल्फी ही 'आपली' आहे, भारतीय आहे. बासुंदी किंवा रबडीचे सॉलिड व्हर्जन म्हणजे कुल्फी, असं आपण म्हणू शकतो. आज किती आणि काय लिहू असं झालंय, आईस्क्रीमबद्दल लिहितांनाही हीच भावना असणार आहे म्हणून या दोन्ही पदार्थांवर वेगळे लेख लिहायचे ठरवले. कुल्फीची पहिली आठवण म्हणजे मटका कुल्फी. मोठ्या मातीच्या मडक्यात मीठ आणि बर्फ असायचं, त्यात स्टील किंवा ल्युमिनियमचे रबराचे झाकण असलेले कोन, त्यात घट्ट थंडगार दूध (ड्रायफ्रुट्ससह). कुल्फीवाले काका मीठ आणि बर्फात निवांत झोपलेला एक कोन बाहेर काढायचे. कुल्फी सुटी व्हावी म्हणून हातानी चोळायचे आणि एक बांबूची काडी खसकन खुपसून आमच्या हातात कुल्फी द्यायचे. रोज इतक्या बर्फासोबत राहून यांच्या हातांना मुंग्या येत नसतील का? असंही मनात यायचं; पण एकदा कुल्फी हातात आली की सगळं विसरायला व्हायचं. त्यानंतर खाली काही सांडू न देता, कुल्फी वितळयाच्या आत खाण्याची कसरत सुरू. कुल्फीचे साचे आणून घरी तो प्रकार बनवला; पण त्यात मेहनत जास्त; शिवाय चव जमायची नाही म्हणून प्रयत्न सोडून दिला. कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर, ब्रेडचा चुरा, कॉर्नफ्लॉवर, पेढे यापैकी काही तरी घालून दूध लवकर आटवता येतं हे लक्षात आल्यावर आता मात्र बऱ्यापैकी परफेक्ट कुल्फी जमायला लागली आहे.

 

कुल्फीमध्ये आता असंख्य फ्लेवर्स मिळतात. मलई, आंबा, केसर, पिस्ता, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, गुलकंद हे नेहमीचे फ्लेवर्स, तर सर्वांच्या आवडीचे आहेतच; पण आता कुकीज अँड क्रीम, रसगुल्ला, पान, कसाटा, बटरस्कॉच, ब्लॅककरंट असे नवीन फ्लेवर्स आले आहेत. आईस्क्रीमची खासियत म्हणजे ते अगदी मऊसूत असतं. तोंडात क्षणार्धात वितळणारं. मात्र, कुल्फी काहीशी डेन्स असल्याने चावावी लागते. आईस्क्रीमने पोट भरणार नाही; पण एक मलाई कुल्फी खाल्ली की सरळ मुकाट्याने झोपी जावे आणि पोटाला काय ते पचन करायचं ते निवांत करू द्यावं असं वाटतं. आपले भारतीय पदार्थ विशेषतः डेसर्टस असेच पचायला जड असतात! मुंबईला चौपाटीवर बॉंबे कुल्फी मिळायला सुरवात झाली. या कुल्फीचा आकार कोन नसून जाड, गोलाकार होता. त्याचे चौकोनी तुकडे करून, कधीकधी क्रीम किंवा सिरपने सजवून केळीच्या पानावर किंवा द्रोणात ही कुल्फी मिळायची. आजही मिळते. कुल्फी तर कायम आवडीची; पण मला त्या इको-फ्रेंडली द्रोणाचे कायम आकर्षण वाटते. आता या नावाने ब्रॅंडही सुरु झाले आहेत आणि ती परंपरा पुढे नेत आहेत.

 

मला अजूनही वाटते की, कुल्फी जगभर पोहोचली नाहीय. आईस्क्रीमचं मार्केट जास्त मोठं आहे. फालुदासोबत कुल्फी खातात तसे अजून कॉम्बिनेशन करायला हवे. एका इंटरनॅशनल प्रोटिन पावडरच्या ब्रँडने कुल्फी फ्लेवरची प्रोटीन पावडर आणली, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. चव खरंच छान होती. अजून नवीन फ्लेवर्स मिळायला हवे, कॉम्बिनेशन्स हवे, शुगर फ्री आणि व्हिगन कुल्फीही मार्केटमध्ये मिळायला हवी तरच या भारतीय चविष्ट आईस्क्रीमच्या प्रकाराला आपण जगभर नेऊ शकू. आता मोठमोठ्या आईस्क्रीमच्या ब्रॅंड्सने कुल्फी बाजारात आणल्या आहेत, इन्स्टंट मिक्सही मिळतात पण दिल्ली अभी बहोत दूर है! लखनौ, इंदोर, मथुरा, बनारस अशा देशी खाद्यपरंपरा असणाऱ्या शहरांच्या खाऊगल्यांमध्ये कुल्फीचं स्थान अबाधित आहे आणि तिला प्रचंड मानही आहे. कानपूरला एक 'बदनाम कुल्फी' मिळते. काहीशी मऊसर असलेली ही कुल्फी प्रचंड फेमस आहे. या दुकानाची टॅगलाईन तर 'ऐसा कोई सगा नही जिसको ठगा नही' अतरंगी आहे जी नंतर बंटी और बबली या सिनेमातही वापरली गेली.

 

कुल्फी मला कायम नित्यनियमाने शाळेत जाणाऱ्या, चांगले मार्क्स मिळवून इतर स्पर्धांमध्ये चमकणाऱ्या तालुक्यातील एखाद्या गुणी मुलीसारखी वाटते. एके काळी ही गुणी मुलगी पुण्यात आली आणि दोन वेण्या, पंजाबी ड्रेस ही स्टाईल सोडून क्वीनमधील कंगनाइतकी मॉडर्न झाली आहे. तिच्यात पोटेन्शियल खूप आहे; पण अजूनही चांगल्या ग्रुमिंगची आणि मॉडर्न कपड्यांची नव्हे, तर आत्मविश्वासाची गरज आहे बाकी गुण तर आहेतच! मला आशा आहे की, आपली कुल्फी एक दिवस आईस्क्रीमच्या बरोबरीने ग्लोबल मार्केटमध्ये दिमाखात वावरत असेल, स्वतःचे भारतीयपण मिरवत!

- सावनी