ठोंब्या

युवा विवेक    17-May-2022   
Total Views |

 
letter

प्रिय जोगिया

तुला जोगिया वगैरे म्हणतीय म्हणून उगीच हरखून जाऊ नकोस, ते असंच प्रेमानं म्हटलंय..... बाकी तुला भेटल्यापासूनचं तुझं पहिलं इंप्रेशन, आज आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसालाही, तितकंच ताजंतवानं आहे..... ठोंब्या..... तू खरंच ठोंब्याच आहेस रे माझा..... आपल्या लग्नाला पंचवीस वर्षं झाली तरीही तू ठोंब्याच राहिलायस आणि मला तू तसाच छान वाटतोस......

 

घाबरू नकोस, "मी आहे म्हणून टिकले, नाहीतर....." असले काहीही पांचट डायलॉग्ज आजच्या दिवशी मी तुला ऐकवणार नाहीये..... याआधीही कधी ऐकवले नाहीत, कारण असं काहीही नसतं, हे आपल्या दोघांना लग्नानंतर चुकून कळलं आणि नंतर ते कळून चुकत गेलं...... माझ्याऐवजी कोणीही असती तरी तू तिच्याशी तितकाच मन लावून, मस्त संसार केला असतास आणि same goes with me..... मुळात संसार म्हणजे काही फार मोठ्ठं काही करायची गोष्ट नाही, हे पंचवीस वर्षांच्या संसारानंच छान शिकवून ठेवलंय..... हां, भांड्याला भांडं लागतं, पण ताकाला जाऊन भांडी लपवली नाहीत की भांडी वाजल्याचा आवाज जरा कमी येतो...... तू पेपर वाचायला टीव्ही पाहायचा चष्मा लावून बसतोस, मी रोज पहाटे उठायचं ठरवूनही उठत नाही...... माझ्या हातात टीव्हीचा रिमोट दिसला की तू मुद्दाम तुझ्या फोनच्या व्हिडिओचा आवाज वाढवतोस आणि मी तुला कारण नसताना दिवसातून पन्नास सूचना देत असते, ज्यांतल्या निम्म्या तू ऐकून न ऐकल्यासारख्या करतोस. पण हे सगळं आता सवयीचं आहे आपल्याला..... त्यामुळे तुझ्या चष्म्यांच्या डब्यांवर मी स्वहस्ताक्षरात "टीव्हीचा, पेपरचा" असलं खरडून ठेवलंय आणि रोज रात्री न चुकता तू पहाटेचा अलार्म लावत आलायस..... हल्ली मी टीव्ही बघणं कमी केलय आणि आजच सकाळी तू ऑर्डर केलेले वायरलेस हेडफोन्स आलेत.... (किती वापरतोयस, देव जाणे, हे माझं वाक्य तू कानामागे, सॉरी, हेडफोनमागे टाकलेलं पाहिलं बरं का मी....) हल्ली सकाळी "पाउले चालती पंढरीची वाट" अशा थाटात तू माझ्याबरोबर फिरायला येतोस आणि मी सोडून बाकी सगळ्या रखमाया एकरकमी पाहून घेतोस...... आता हे मला कसं कळलं, असला भोळसट प्रश्न निदान इतक्या वर्षांनी तरी तुझ्या मनात येऊ नये...... पण आलाच तर त्यावर माझ्याकडे एकच उत्तर आहे - तू पुरुष आहेस..... तू करणारच असले उद्योग...... आणि मला त्या उद्योगांचं आजवर कध्धीच काssssssही वाटलेलं नाही...... हो, अगदी तारुण्यातसुद्धा नाही...... अरे, तसा तू दिसायला बरा आहेस, त्यात प्रोफेसर वगैरे आहेस, त्यामुळे तोंडाचा कायम साखर कारखानाच.....

 

आणि तुला खरं सांगू का, मला माझ्या रूपाचा गर्व तसाही कधीच नव्हता आणि असता तरी तुझ्याबरोबर राहून त्याच्या गोवऱ्या केव्हाच मसणात पोचल्या असत्या...... पण आज तुला एक गोष्ट सांगतेच..... तू कसाही असशील, कोणीही असशील, पण माझा ठोंब्याच होतास, आहेस आणि राहाशील..... तुझ्या त्या कॉलेजमधल्या पोराटोरांनी तुला कितीही "सर सर" म्हणून डोक्यावर घेतलं आणि त्या पोरीसोरींनी कितीही "सोप्प्या डिफ़िकल्टीज" तुझ्याकडून सोडवून घेतल्या ना, तरी तू ठोंब्याच.....

 

कारण गेली पंचवीस वर्षं या तुझ्या ठोंबीबरोबर तू न कुरकुरता, न करवादता सुखानं नांदलास...... तिचा सगळा त्रास, त्रागा, वैताग अगदी हसतमुखानं सांभाळत आलास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, तिच्यावर खूप प्रेम केलंस..... आपल्या मुलांचंही सगळं काही अगदी मायेनं केलंस........ अगदी तृप्त, आनंदात, छान रमले बघ मी तुझ्यासोबत...... न मागता खूप दिलंस आणि न सांगता खूप नेलंसही, पण तुझ्यामाझ्यात कसला हिशोब करायचा रे...... आजच्या दिवशी देवाकडे एकच प्रार्थना..... जन्मोजन्मी मला हाच ठोंब्या मिळो......

 

तुझी ठोंबी......

अक्षय संत