सूक्ष्मजीवांची सृष्टी

युवा विवेक    02-May-2022
Total Views |

The creation of microorganisms 
 
कोरोना आल्यापासून सर्व जगाचे लक्ष सूक्ष्मजीवशास्त्राने वेधून घेतले आहे. सॅनिटायझेशन, आयसोलेशन यांसारख्या पुस्तकी संज्ञा रोजच्या संभाषणात वापरल्या जात आहेत. कोरोनामुळे विज्ञानाच्या पुस्तकात बंद असलेली माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली, त्यांना स्वच्छतेचे महत्व पटले, सूक्ष्मजीवांच्या एका वेगळ्या सृष्टीची ओळख झाली आणि त्यांच्या अस्तित्वाने उद्भवू शकणाऱ्या परिणामांविषयी जागरूकता निर्माण झाली, ही अतिशय आनंदाची बाब आहे. परंतु, यामुळे सरसकट सगळ्याच सूक्ष्मजीवांना 'व्हिलन' समजले जाणे चूकीचे आहे.ज्याप्रकारे प्राण्यांमध्ये आणि वृक्ष-वेलींमध्ये विविधता आढळते त्याचप्रमाणे सूक्ष्मजीवांमध्ये सुद्धा ती आढळते. सगळेच सारखे नसतात! त्यामुळे या लेखात मानवी आयुष्याला उपयोगी पडणाऱ्या आणि उत्कर्षासाठी मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांविषयी जाणून घेऊ या.(थोडा इंग्रजी शब्दांचा वापर अधिक जाणवेल; पण जीवाणूंची नावे ही इंग्रजीतच असल्यामुळे त्याला पर्याय नाही.)
अगदी दैनंदिन जीवनात आपण कळत नकळत यांचा वापर करत असतो. दह्याचं विरजण लावण्यापासून, इडली-डोसा, चीज बनवण्यापर्यंत हे आपली साथ देत असतात. दह्यामध्ये 'लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया' असतात. विरजण लावताना आपण दुधात जे थोडं दही घालतो. त्यामुळे ते दुधात प्रवेश करतात आणि त्यावर प्रक्रिया करून काही तासांनी दुधाचे रूपांतर दह्यात करतात. गृहिणींना, आचारींना हे माहिती असेल की, इडली, डोसाचे सारण तयार करताना त्यात 'यिस्ट' टाकलं जातं. 'यिस्ट' हे एका प्रकारचे फंगस (बुरशी) आहे (लाभदायक आहे). यिस्ट त्या सारणावर फर्मेंटेशनची प्रक्रिया करून ते फुगवतात आणि ते खाण्यायोग्य करतात.
चीजच्या बाबतीत देखील हेच आहे.'स्वीस चीझ' म्हणजेच टॉम अँड जेरी मधल्या जेरीचे चीझ 'propionibacterium sharmanii' अशा महाभयानक नावाच्या जीवाणू पासून केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या चीजमध्ये वेगवेगळ्या जिवाणूंचा उपयोग करून प्रक्रिया केली जाते. आता मला सांगा जर हे जीव नसते तर आपण 'श्रीखंड', 'दहीवडा', 'इडली', 'डोसा' किंवा चीज घातलेले स्वादिष्ट पदार्थ खाऊ शकलो असतो का ? खरं तर, याची कल्पनाही करवत नाही आपल्याला.
केवळ घरातच नाही, तर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. ब्रेड, फळांचे रस फर्मेंट करण्यासाठी, वाईन, ब्रॅंडी, रम, डिटर्जंट, इ. करण्यासाठी यांचा उपयोग केला जातो.
आपल्याला सूक्ष्मजीवांनी दिलेली सगळ्यात मोठी देणगी म्हणजे 'ॲंटिबायोटिक'. हेही खरंच आहे की, त्यांच्यामुळेच आजार निर्माण होतात.पण त्या आजारांचे निवारण देखील तेच करतात.'तुही संवारे तुही बिगाडे' असं आहे ! ॲंटिबायोटिकची व्याख्याच आहे की, 'chemical substances, which are produced by one microbe to kill or retard the growth of another microbe'. ॲंटिबायोटिकच्या शोधामुळे आज आपले आयुर्मान वाढले आहे. जगणं सोपं झालं आहे. या व्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्रात 'streptokinase' आणि 'cyclosporin A' सारख्या औषधांमुळे हृदयविकार आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट च्या रुग्णांना आराम दिला आहे.
औद्योगिकरणामुळे आणि शहरीकरणामुळे सांडपाणी व्यवस्थापनाचा म्हणजेच 'sewage management' चा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे.पण इथेही 'मैं हूं ना' म्हणत ते आपल्या मदतीला येतात. ही समस्या एवढी मोठी का आहे ? लक्षात घ्या की, हे पाणी कुठलीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडता येत नाही. कारण अर्थातच यात आपल्याला हानीकारक असे काही जंतू असतात. नद्यांमध्ये ते मिसळल्यास सगळीकडे रोगराई पसरेल आणि म्हणून 'sewage treatment plant' मध्ये सूक्ष्मजीवांच्या मदतीने त्यावर प्रक्रिया केली जाते आणि मग ते पाणी नदीमध्ये सोडले जाते.
बायोगॅस निर्मिती; बी टी कॉटन, बी टी ब्रिंजलसारख्या झाडांची निर्मिती, जैव खतांची निर्मिती अशा अनेक प्रकारे सूक्ष्मजीवांचा वापर आपण आपल्या उत्कर्षासाठी केला आहे. माणसांनाच नाही, तर झाडांनासुद्धा मातीतून पोषण प्राप्त करण्यासाठी ह्यांची मदत होते.
जरी आपल्या डोळ्यांना हे जीव दिसत नसले तरी जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सगळीकडे असतात. अगदी आपल्या शरीरातदेखील. कारण जर हे नसले, तर अन्न पचणार नाही आपल्याला. आमच्या शिक्षकांनी सूक्ष्मजीव शास्त्राच्या पहिल्या लेक्चरला सूक्ष्मजीवांची तुलना देवाशी केली होती. तेव्हा लक्षात आलं की, देवाची सगळीच विशेषणं आणि कृती सूक्ष्मजीवांना अगदी तंतोतंत लागू पडतात. गंमतीचा भाग सोडल्यास आपले जीवन यांच्याशिवाय अशक्य आहे, हे आपण मान्य करायलाच हवे. वरील एवढे उपयोग बघता, काही वात्रट मुलांमुळे सगळ्या वर्गाला शिक्षा करणं चुकीचं आहे, हे पटलं ना तुम्हाला?
- मृण्मयी गालफाडे