केके, याद आएंगे वो पल

युवा विवेक    02-Jun-2022   
Total Views |


kk

कृष्णकुमार कुन्नथ हे अगदी सर्वसाधारण वाटावं असं नाव, चारचौघांसारखं, शब्दशः नॉन ग्लॅमरस. पण या कृष्णकुमार कुन्नथ नावाच्या माणसाने अर्थात गायक केकेने ९०च्या दशकातील तरुणाईला आपल्या सुरांनी मोहवून टाकलं. ३१ मे २०२२ला केकेचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कोलकत्यात निधन झालं. ५३ वर्षांच्या या गायकासाठी अहो, जाहो असं आदरार्थी तोंडात येतच नाही इतका तो तरुणाईशी एकरूप झाला होता. केके गेला आणि मनोरंजनसृष्टीतील एक मेलोडियस आवाज कायमचा शांत झाला. कल रहे या ना रहे हमअसंच जणू त्याचं सूचन आपल्या गाण्यातून केलं होतं.

 

ऐंशी आणि नव्वदचं दशक म्हणजे स्थैर्याचं दशक. ५० ते ७०च्या दशकात मनोरंजनसृष्टीचा, संगीतसृष्टीचा चढत जाणारा प्रगतीचा आलेख ८०च्या दशकात स्थिरावला होता, एकाच लयीत सुरू होता, त्यात एक साचेबद्धपणा यायला सुरुवात झाली होती. गायकांची एक पिढी ज्येष्ठत्वाकडे झुकली होती, तर नवी पिढी अजून उदयाला यायची होती. बॉलिवूड गाण्यांच्या एका साच्यात अडकलं होतं, डान्स नंबर्स किंवा संथ चालीची प्रेमगीतं याची सद्दी होती. कुमार शानू, उदीत नारायण हे आवडते असले तरी या साच्यात अडकले होते. चित्रपटसंगीतसृष्टीला धुगधुगी येण्यासाठी नव्या दमाच्या प्रतिभावान, प्रयोगशील अशा गायकांची गरज होती. अशा काळासाठी आपल्याला सोनू निगम, शान मुखर्जी, शंकर महादेवन आणि कृष्णकुमार कन्नथ मिळाले. गाणं हा केवळ चित्रपटाचा भाग न राहाता, स्वतंत्रपणे त्याचा आस्वाद घेता येऊ शकतो हे या गायकांनी आपल्याला शिकवलं. या फळीतला एक तारा आता निखळला तो केकेच्या रूपात.

 

हम रहे या ना रहे कल, कल याद आएँगे ये पल

चल, सोचे क्या, छोटीसी है जिंदगी

हे १९९९मध्ये लेस्ली लुईसनी संगीतबद्ध केलेलं पलया अल्बममधलं श्रवणीय गाणं. या गाण्याद्वारे केके या गायकाने प्रथम पदार्पणातच रसिकांच्या मनात आपलं स्थान पक्कं केलं. नवीन असूनही आपली गाण्याची बैठक त्याने या गीतातून दाखवून दिली होती. खूप दिवसांनी घडलेली शाळू सोबत्यांची ट्रीप, शालेय-महाविद्यालयीन स्नेहसंमेलनं, कौटुंबिक गेटटूगेदर, मित्रमैत्रिणींची खूप दिवसांनी घडलेली भेट, शाळेचा निरोप समारंभ, एखादा घरगुती कार्यक्रम, रिटायर्डमेण्ट कार्यक्रम अशा अनेक ठिकाणी हे गीत आवर्जून वाजतं, गायलं जातं. प्रत्येकाला आठवणी जपून ठेवायला सांगणारं, जीवनाचं मर्म उलगडून दाखवणारं केकेच्या आवाजातलं हे गाणं त्याची ओळख करून द्यायला पुरेसं आहे.

 

एका मल्याळी कुटुंबात जन्मलेला आणि बालपणी आजीकडून संगीताचे धडे घेतलेला केके किशोरकुमार आणि मोहम्मद रफी यांना ऐकतच मोठा झाला. नंतर संगीताचं शिक्षण खंडित झालं तरी जे कानात शिरलं त्याचे संस्कार मात्र पुरेपूर झाले. खरं तर त्याला गाण्यापेक्षा वैद्यकीय शिक्षणात रस होता, मात्र पुढे आपली गाणीच रसिकांच्या मनाला दिलासा देतील अशी मात्र त्याला तेव्हा कल्पना नव्हती. ९०च्या दशकातील तरुणाईचं कॉलेजलाईफ सुंदर करणारा त्याचा आवाज होता.

 

चित्रपटसृष्टीत आल्यानंतर केकेला खरी ओळख मिळाली ती हम दिल दे चुके सनममधील तडप तडप के इस दिल से आह निकलती गईअनेक प्रेमभंग झालेल्या जीवांना या गाण्याने आसरा दिला. विनोदाचा भाग सोडून देऊ, पण या गाण्यानंतर केकेची खरी रेंज आणि सुरांवरील पकड काय आहे ते कळून आलं. या गाण्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. यारों दोस्ती बडी ही हसीं है(झंकार बीट्स), जिंदगी दो पल की(जिंदगी ना मिलेगी दोबारा), तू ही मेरी शब है सुबह है(गँगस्टर), आंखों मे तेरी अजब सी अदाएँ है(ओम शांती ओम), क्या मुझे प्यार है(वो लम्हें), अलविदा(लाईफ इन अ मेट्रो), सच कह रहा दै दिवाना(रहना है तेरे दिल में), खुदा जाने के(बचना ए हसिनों), आशाएँ खिले दिल की(इकबाल), कोई कहे कहता रहे(दिल चाहता है), ओ मेरी जान(लाईफ इन अ मेट्रो), जाने ये क्या हुआ(कार्तिक कॉलिंग कार्तिक) अशी केकेची अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. यांसह अनेक बिगरहिंदी गाणीही त्याने गायली आहेत. विशाल भारद्वाज, ए आर रहमान, प्रीतम, इस्माईल दरबार अशा अनेक संगीतकारांकडे गाण्याची संधी केकेला मिळाली, आणि अर्थातच त्याने त्याचं सोनं केलं.

 

सदैव हसतमुख चेहरा असणारा, कोणत्याही वादामध्ये न अडकणारा, आपल्या कामाशी प्रामाणिक आणि मेहनती गायक अशी केकेची ख्याती होती. कोणत्याही विशिष्ट पॅटर्नमध्ये तो अडकला नाही. ज्यांना धांगडधिंगा आवडतो त्यांच्यासाठी कोई कहे कहता रहे सारखं धमाल गाणं, आशाएँ खिले दिल की सारखं प्रेरणादायी गाणं, सलमानखानवर चित्रित झालेलं कारूण्यपूर्ण तडप, यारों दोस्ती सारखं स्मरणव्याकुळ करणारं गाणं अशी केकेची खूप मोठी रेंज होती. आपली छाप त्याने त्या गाण्यावर ठेवली.

 

केकेच्या काँनसर्टच्या आयोजनात हलगर्जीपणा झाल्याचं हा लेख लिहीत असताना समजलं. हॉलमध्ये वातानुकुलन यंत्रणा नसल्याचं, लोकांनी फायर एग्टिंग्विशर अर्थात अग्नीरोधक फवारल्याचं समाजमाध्यमांवरील काही व्हिडिओतून दिसतंय. खरं काय ते पोलीस तपासानंतर समोर येईलच. पण यामुळे कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आपला अंतिम क्षण जवळ आलेला असताना आवडीच्या गोष्टीत रमलेलं असणं हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. काही नशीबवान कलाकारांना कला सादर करता करता मृत्यू आला आहे. केकेलाही गाणं सादर करताना अस्वस्थ वाटू लागलं व काही वेळाने त्याचं प्राणोत्क्रमण झालं. तत्पूर्वीच्या काही व्हिडिओजमध्ये आपल्याला एसी नसल्याने त्रास होत असल्याचं, उष्णता जाणवत असल्याचं तो वारंवार सांगताना दिसतो आहे. मृत्यू अटळ आहे, तो केव्हाही कसाही आपल्याला गाठू शकतो हे सत्य असलं तरी, केकेला आलेला हृदयविकाराचा झटका निष्काळजीपणाच्या परिणामातून नसेल ना अशी शंकेची पालही मनात चुकचुकते.

 

केके, तू गायलेल्या श्रवणीय गाण्यांद्वारे तू आमच्यात सदैव राहतील. पण तुला गाताना मात्र पाहता येणार नाही. तुझ्या स्वरात चिंब भिजलेले ते क्षण कायम आठवत राहतील. मनात रुंजी घालत राहतील. सुखदुःखाच्या क्षणांत साथ दिल्याबद्दल तुझे आभार श्रोते मानत राहतील. पण, एवढ्या लवकर जायला नको होतंस तू. भैरवीला बराच वेळ होता अजून.

- मृदुला राजवाडे