डायबेटीस आणि वेट लॉस

युवा विवेक    25-Jun-2022
Total Views |

 
diabetes

नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण साधे सोपे व्यायाम प्रकार पाहिले. जे आपण घरच्याघरी करू शकतो. आज आपण हे पाहणार आहोत की, जर तुम्हाला डायबेटीस असेल तर त्याचा वजनावर काय परिणाम होतो. डायबेटीसचे प्रकार नेमके कोणते आणि डायबेटिक रुग्णांना जर वजन कमी करायचे असेल, तर कोणती काळजी घ्यायला हवी.

आधी आपण पाहू की डायबेटीस चे प्रकार कोणते आहेत. आपल्या सर्वांना एक गोष्ट माहितीच आहे की, ज्याच्या रक्तात साखरेचे प्रमाण, म्हणजेच ग्लुकोजचे प्रमाण जास्त आढळते त्याला डायबेटिक रुग्ण म्हटले जाते. मात्र या डायबेटीसचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

1. टाईप एक:

या प्रकारचा डायबेटीस शक्यतो असलाच तर जन्मापासूनच असतो. टाईप एक या प्रकारात pancreas या ग्रंथाच्या कार्यात बिघाड असतो. या ग्रंथीद्वारे इन्सुलिन बनत नाही. इन्सुलिन हे एक संप्रेरक (hormone) आहे या संप्रेरकाद्वारे शरीरातील ग्लुकोजचे नियमन होते. अन्न ग्रहण केल्यानंतर त्यातील ग्लुकोजचे विघटन होऊन ऊर्जेत रूपांतर होण्याच्या कार्यात इन्सुलिन चा फार महत्वाचा वाटा आहे. शरीरासाठी जितक्या ऊर्जेची गरज असेल, तितकी ऊर्जा निर्माण करून उरलेल्या ग्लुकोजचे ग्लायकोजेन मध्ये रूपांतर होते आणि ती ऊर्जा त्वरित उपलब्ध होण्यासाठी शरीरात साठवली जाते. साधारणपणे आठ ते दहा दिवस ही ऊर्जा ग्लायकोजेन रुपात राहते. या कालावधीत जर ती वापरली गेली नाही तर त्याचे चरबीत रूपांतर होते. या सर्वच प्रक्रियेवर इन्सुलिनचे नियंत्रण असते. रक्तात उपलब्ध होणाऱ्या साखरेचे योग्य विभाजन करून, जास्तीत जास्त भाग ऊर्जेत रूपांतरित करणे आणि कमीतकमी भागाचे चरबीत रूपांतर करणे, या प्रक्रियेत इन्सुलिनचा सहभाग फार महत्वाचा असतो. हे संप्रेरक जर बनले नाही तर साखरेचे विभाजन आणि नियमन होऊ शकत नाही. त्यामुळे टाईप एक डायबेटीस प्रकारात रुग्णाला इन्सुलिन इंजेक्शन मधून नियमितपणे द्यावे लागते. मात्र अशा रुग्णांना खाण्यापिण्याचे काही बंधन नसते. इन्सुलिन शरीरात बनत नसल्याने काहीही खाल्ले तरी त्याचा परिणाम होत नाही. म्हणूनच टाईप एक प्रकारात फक्त नियमितपणे इन्सुलिन घेत राहिले तरीही हवे ते खाणे शक्य होते. मात्र काही कारणाने इन्सुलिन वेळच्या वेळी जर घेता आले नाही तर मात्र रक्तातील साखर अनिर्बंधपणे वाढू शकते आणि रुग्णाची परिस्थिती बिघडू शकते.

2. टाईप दोन:

सर्वसामान्यपणे 90 टक्के किंवा त्याहूनही जास्त लोकांना होणारा डायबेटीस हा टाईप दोन प्रकारचा असतो. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याचे ताळतंत्र नसणे, व्यायामाचा अभाव, शिस्तीचा अभाव, अवेळी झोपणे, अशा सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टींमुळे व्यक्तीचे मेटबॉलिझम बिघडते. त्यामुळे अन्नपचनाचा वेग मंदावतो. अशा व्यक्तीने अन्न ग्रहण केले की त्यातील साखरेचे विभाजन मंद पचनशक्तीमुळे कमी प्रमाणात होते, त्यामुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे प्रमाणही कमी असते. उलटपक्षी चरबीत रूपांतर होणाऱ्या साखरेचे प्रमाण वाढते. परिणामी चरबी वाढत जाते, वजन वाढत जाते.

रक्तात अति प्रमाणात वाढलेल्या या साखरेमुळे मेंदूला सिग्नल मिळतो की, अति वाढलेल्या या साखरेच्या नियमनासाठी जास्त इन्सुलिनची गरज आहे. त्यामुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते... हे असे सतत घडत राहते आणि एक वेळ अशी येते की शरीर स्वतःच या वाढलेल्या इन्सुलिनला विरोध करू लागते. त्याचा रक्तातील साखरेच्या पचनावर होणारा परिणाम त्यामुळे कमी होऊ लागतो. शरीर इन्सुलिनला जुमानत नाही. इन्सुलिनचे प्रमाण कितीही वाढले तरी, रक्तातील साखर कमी होत नाही. याला insulin resistance म्हणतात आणि अशा प्रकारे रक्तात जास्त ग्लुकोज आढळल्याने होणाऱ्या डायबेटीसला टाईप दोन डायबेटीस म्हणतात.

टाईप दोन डायबेटीस नेहमीच चुकीच्या लाइफस्टाइल मुळेच होतो असे नाही. यात अनुवंशिकता सुद्धा कारणीभूत असते. पालकांपैकी एकाला जर डायबेटीस असेल तर पाल्याला डायबेटीस होण्याचा संभव ४५ टक्के असतो आणि जर दोन्ही पालकांना डायबेटीस असेल तर हेच प्रमाण ९० टक्के असते. म्हणूनच ज्यांच्या पालकांना डायबेटीस आहे अशांनी आपला आहार आणि जीवनशैली यांची कायम काळजी घ्यायला हवी.

प्रकार कोणताही असो, डायबेटीस मुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढते, विशेषतः पोटावर आणि कमरेवर असणारी चरबी डायबेटीसचा धोका दर्शवते. ज्यांचे इतर काही कारणांनी वजन वाढते आणि पोटावर, कमरेवर चरबीचा साठा वाढत जातो, त्यांना डायबेटीस होण्याचा धोका जास्त असतो.

आजच्या भागात इथे थांबू. आज आपण दोन्ही प्रकारच्या डायबेटीसची शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती घेतली आणि हेही पाहिले की, टाईप एक डायबेटीस जन्मापासून असू शकतो त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. मात्र टाईप दोन डायबेटीस मात्र चुकीच्या जीवनशैली मुळे निर्माण होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. अतिरिक्त वजन कमी केले तरीही डायबेटीस नियंत्रणात येतो.

मात्र हे करताना काही काळजी नक्कीच घ्यावी लागते. ती कोणती हे पुढच्या भागात पाहूया.

Till then, Stay Healthy Be Happy

दीप्ती काबाडे

आहारतज्ञ