स्वत:च्या शोधातल्या युवकांचा सिनेमा

युवा विवेक    27-Jun-2022
Total Views |


cinema

'चित्रपटात जे दाखवलं जाते त्याचा प्रभाव समाजावर जास्त पडतो' की, 'समाजात जे घडत आहे त्याचे प्रतिबिंब चित्रपटात दिसतं हा' वादाचा मुद्दा आहे. पण एक गोष्ट खरी आहे की, जेव्हापासून भारतात सिनेसृष्टी उदयास आली तेव्हापासून भारतीय 'समाज आणि सिनेमा' ह्यांचा प्रवास समांतररित्या चालू आहे.

स्वातंत्र्यपुर्व काळात जेव्हा आधुनिक भारताची पायाभरणी होत होती, तेव्हा "शेजारी" सारखा चित्रपट हिंदू - मुस्लिम ऐक्याची गरज बोलुन दाखवत असे, तर 'अच्छुत कन्या' सारखा चित्रपट सामाजिक उतरंडीवर भाष्य करत असे.

 

स्वातंत्र्य मिळाल्यावर मधली काही वर्षे रशिया, जपान सारख्या देशांच्या सहकार्याने विकास करावा लागला ज्याचे प्रतिबिंब "मेरा जुता है जपानी, यह पतलून इंग्लीस्तानी" सारख्या गाण्यात दिसत असे. कारण स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण तोकडे होतो.

पण हळहळु हे चित्र बदलू लागले होते. "छोडो कलकी बाते कलकी बात पुरानी" म्हणणारा आणि नव्या युगाची नवी कहानी लिहू पाहणारा तरुणवर्ग उदयास आला. हा तरुण वर्ग विचारांवर ठाम होता. देशावर परकीय आक्रमण झाले असताना "अपनी आझादीको हम हरगिज मिटा सकते नहीं" म्हणणारा होता. तर दुसरीकडे "मेरे देशकी धरती" म्हणत हरितक्रांती घडवू पाहत होता.

 

ही स्वप्नाळू आशावादाची परंपरा राजेश खन्नाने कायम राखली आणि "मेरे सपनोकी रानी कब आयेगी तु?" गाणारा रोमेंटिक नायक तरुणाईला साद घालू लागला. पण नंतर लवकरच परिस्थिती बदलली आणिबाणी, बेरोजगारी, गरिबी ह्यांनी अमिताभच्या रूपाने स्वत:च्या व्यथा बोलुन दाखवणारा ' अँग्री यंग मॅन ' जन्माला घातला. जंजीर,दिवार पासून सुरू झालेला त्याचा प्रवास 'हम' पर्यंत चालू राहिला. विनोद खन्नाचा ' दयावान' सनी देओलचा ' अर्जुन ', अनिल कपूरचा ' तेजाब ', जॅकी श्रॉफचा ' गर्दीश ' हे त्याचं जातकुळीतील सिनेमे !!!

पण ९० च्या दशकात पि.व्ही.नरसिंह राव आणि मनमोहनसिंग ह्यांच्या नेतृत्वाखालील देशाच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानंतर नायकाचं रूपच बदलून गेलं.

 

देशात संगणक क्रांती झाली, आयटी सेक्टर उभे राहू लागले.

शहरात मल्टीप्लेक्स नव्याने सूरु झाले. मॉल उभे राहिले होते, कॉलसेंटर मध्ये काम करणाऱ्या तरुणांच्या हातात पैसा खेळू लागला होता, ऑर्कुट - फेसबुकमुळे जग एका क्लिकवर समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर आमिर, शाहरुख, सलमान, गोविंदा ह्यांनी रंगवलेले विदेशातल्या रस्त्यांवर गाणी गाणारे, श्रीमंत घरातले, NRI वर्गातले नायक भुरळ घालू लागले होतें. श्रीमंती ही अप्राप्य आणि वाईट न वाटता सहजसाध्य वाटू लागली होती

हेराफेरी, कॅश, मालामाल विकली, अपना सपना मनी मनी, हे इझी मनीचे स्वप्न दाखवणारे सिनेमे बनत होते तर दुसरीकडे डर, बाजिगर,वास्तव,कांटे, मुसाफिर, कंपनीने नैतिकतेच्या आणि नायकत्वाच्या व्याख्याच बदलल्या.

संपन्नतेची चाहूल तर लागली होती पण या सर्वात कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं, काहीतरी हरवल होतं. मन:शांती, सुकून, स्वत्व....!!

 

उदाहरणंच द्यायचं झालं तर, अशोका मधला चंडअशोक आठवतो का? सगळं काही जिंकून अखेरीस विरक्त होतो.

स्वदेसचा मोहन भार्गव नासाची नोकरी सोडून चरणपुर गावात परत येतो.

लक्ष्य मधल्या करण शेरगील प्रमाणे "मैं ऐसा क्यूँ हूँ" प्रश्नाचं उत्तर शोधू पाहतो.

"बाप का पैसा है, पडे पडे सड जाता है" म्हणणाऱ्या रंग दे बसंती मधल्या करणला अचानक एका क्षणी 'रूबरु रोशनी'चा साक्षात्कार होतो. अंगावर पोलिसांच्या लाठ्याकाठ्या पडताना सुद्धा हाताच्या मुठी आवळून बसून राहतो.

 

जोधा - अकबर मधला अकबर तर सम्राट असतो पण ' ख्वाजा मेरे ख्वाजा' म्हणताना स्वत:चा शाही रुबाब सोडून त्या सुफी माहौलमध्ये गिरक्या घेताना देहभान विसरून जातो.

3 इडियट्समधला फुंसुक वांगडू, 'मै कहा गई और तुम कहा रह गई', ह्या चतुरच्या डिवचण्याला दाद न देता लद्दाखमध्ये लहानग्या मुलांची शाळा चालवतो.

टॅक्सी नं 9211 मध्ये एक नायक टॅक्सी चालक तर दुसरा बिझनेसमनचा वाया गेलेला मुलगा असतो तरी दोघे 'आझमाले आझमाले' म्हणत स्वतःच्या मनाच्या तळाशी डोकावून बघतात.

 

रॉकस्टारचा जनार्दन जाखड हा जॉर्डन झाला तरी स्वतःला 'ओ नादान परिंदे घर आजा' म्हणतो, तर दुसरीकडे रणबीरच्याच रुपात 'मेरे रुहका परिंदा फडफडाए, लेकिन सुकूनका जजीरा मिल ना पाए' म्हणतो.

आयुष्य त्याला समझावतं की, 'रे कबिरा मान जा, रे फकिरा मान जा' !! पण परतत असताना बेधुंद मनाच्या पायातल्या बेड्या अडवत असतात.

कधी 'वेक अप सिद' म्हणत स्वतःला उठवतो, तर कधी 'रॉकेटसिंग सेल्समन' बनुन पोरसप्रमाणे सिकंदरला भिडू पाहतो.

 

"चक दे इंडिया'तल्या कबीर खान प्रमाणे स्वत:ला सिद्ध करण्याच्या संधीची कैक वर्षे वाट पाहत राहतो.

आदित्य कश्यप बनुन मिटिंगमधून बाहेर आल्यावर गिटार घेऊन वाजवू लागतो, तर कधी जिंदगी मिलेगी ना दोबारामधल्या अर्जुन सलुजाप्रमाणे 'पिघले नीलम सा बहता हुवा यह समा' म्हणत निशब्द बसून राहतो.

केवळ नायकच नाही तर नायिका सुद्धा स्वतःला शोधू पाहतात कधी फॅशन मधली 'मेघना माथूर' तर कधी 'द डर्टी पिक्चर' मधली सिल्क…….!! ही तिचीच स्वत:च्या शोधाची रूपे होती.

 

पिंक चित्रपटातली अमिताभच्या आवाजातील "तु खुदकी खोजमे निकल तु किस लिए हताश है, तु चल तेरे वजुदकी समयकोभि तलाश है" ही कविता हेच अधोरेखित करते.

किती नावे घ्यावी?? हा जागतिककरणानंतरच्या तीन दशकांचा सारांश आहे. सर्व मिळतंय आम्हाला तरी पण या जगाच्या रहाटघाडग्यात आम्ही एकाकी आहोत.

हा स्वतःचा शोध आहे ! एका तरुणाईचा !

एका पुर्ण सिनेयुगाचा !

सौरभ रत्नपारखी