अर्कचित्रे

युवा विवेक    28-Jun-2022   
Total Views |


arkchitre

लिहायला बसलोय... बाहेर पावसाची मंद रिपरिप सुरू आहे. पाणी वाहून जातंय, पुन्हा नवीन थेंब, नवीन पाणी, नवीन वाहणं. असंच अव्याहत सुरू आहे आणि मी लिहायला बसलोय. खूप विचित्र मनोवस्थेत. नागपूरमधल्या रामकृष्ण मठातल्या त्या घुमटाखालची ती ट्रान्स अवस्था. काळाच्या रेषेवरून मला आजही पुसून गेलेले काही क्षण. जगण्याच्या संततधारेतले काही उघडपीचे ते थेंब. बिनआवाजाचे, बिननावाचे, पण तरीही प्रवाहात विरघळून गेलेले. शेगावला मंदिराबाहेरची ती लांबलचक रांग पाहून मी दर्शन घेण्याचं टाळलं. त्या गोष्टीचा मला आजही पश्चात्ताप नाही. पण हो, आजही त्या उघडपीच्या क्षणात काय घडलं याचं कुतूहल; माणूस मेल्यावर कुठे जातो, या प्रश्नातल्या कुतूहलाइतकंच ताजं आणि चिरकालीन आहे. गुलमर्गला जाताना वाटेत दिसलेल्या धुरकट, धुक्यातल्या वाटेनं ते कुतूहल अजून चेतवलं. दरीतली झाडं गर्द धुक्यात दिसत होतीही आणि नव्हतीही. तशीच ती उघडीप होतीही आणि नव्हतीही, म्हणजे बाहेर बसलेल्या लोकांसाठी तो अर्धा तास अथवा एक तास, असा जो काय घड्याळी वेळ असेल तो होता. पण माझ्यासाठी? मी होतोच कुठे? मी वेळेचा नव्हतो, मी जागेचा, अवकाशाचा नव्हतो, मी नव्हतोच, असं म्हणतानाही माझ्या श्वासांत चेतना होती, शरीराचे सबकॉन्शस लेव्हलवरचे सगळे व्यवहार सुरळीत चालले होते, त्या अर्थी मी होतो, पण कुठे होतो मी? धुक्यातल्या त्या गर्द राईत?? की कान्हाच्या अरण्यातल्या त्या अंधाऱ्या वाटांवर? जिथे मी पहिल्यांदा वाघाच्या पावलांचे ठसे उमटलेले पाहिले आणि आमच्या सारथ्यानं आमची जीप तिथून मागे वळवली. वाघाच्या पावलांच्या ठशावर दुसरे कोणतेही ठसे उमटलेले चालत नाहीत, म्हणून तिथे होतो मी? अथर्वशीर्षाचे दाट आघात ऐकू येतायत। बाबा आमटेंची समाधी. आनंदवनची दगडी इमारत. मुक्तांगण. बिनकाट्याचा गुलाब. श्रीनगरच्या रस्त्यांवर चौकाचौकात उभ्या असलेल्या गाड्या. पहलगामच्या रोडवर मिनिटाला जवळपास पंधरा या गुणोत्तरात दिसणारे सामानवाहू ट्रक्स. कारगिलचा एयरबेस. चार रानकुत्र्यांनी मिळून केलेली सांबराची शिकार. एकेक करत येऊन त्याचे लचके तोडत होता. सकाळच्या वेळी एक वाघिण आपल्या गुहेच्या तोंडावर बसून ब्रेकफास्ट करतेय. लांबपर्यंत पसरलेले बर्फांचे डोंगरमाथे, खळाळत वाहणारी नदी. कसं वसवलं असेल बाबांनी आनंदवन या इथे, या काटेरी जंगलात? साप, मुंगसं, किडेकीटक, जंगलातले प्राणी आणि माणसांनी बाजूला फेकलेले कुष्ठरोगी. समोर नुसता अंधार अंधार?? की पुन्हा धुकं?? ढगांचे कापूस उतरलेत बर्फ़ाळ पर्वतांवर. आभाळ जमिनीला टेकून उभं आहे आणि जमीन आभाळाला बिलगून वाहातेय. मध्येच एखादा ब्राऊन रंगाचा मातीचा पट्टा. पाईन्सच्या टोकदार, निमुळत्या पानांनी आच्छादलेला. दल लेकचं चमचमतं पाणी. त्यात टपटप गळणारे पावसाचे थेंब. आणि दोन्हीच्यामधून संथ वाहात जाणारा शिकारा. लांबवर दिसतेय हजरतबलची टेकडी आणि त्यावरचा टीव्ही टावर. इथल्या मुली खूप सुंदर असतात पण. लाल, गोबऱ्या गालांच्या आणि काळ्याभोर डोळ्यांच्या मुली. त्यांचे डोळे. जंगलातल्या उमलत्या पहाटेसारखे. काळेशार. आणि त्यावर पडलेलं चंद्राचं नाजूक प्रतिबिंब. हो, पहाटेचा प्रकाश कान्हामधल्या गवताच्या पानांवरून झिरपत उतरायचा ना, अगदी तसंच. किंवा काठावरच्या आणि शिकारयांमधल्या दिव्यांचं दल लेकमध्ये पडणारं प्रतिबिंब. चेहरयावर जाळीदार ओढणी. पानांवरच्या जाळ्यांसारखी. किंवा सकाळच्या वेळी अंधुक सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या दर्ग्याच्या मिनारांवरच्या नक्षीसारखी. जीपचा खडखडाट. पाण्याची थरथर. जीपमधून हात बाहेर काढला की हाताला जंगलाचा वास चिकटतो. शिकाऱ्यातून पाण्यात हात बुडवला की हाताला अत्तराचा आणि काश्मिरी केशराचा गंध बिलगतो. भीती वाटते जीपमधून खाली उतरण्याची. भीती वाटते, श्रीनगरच्या चिंचोळ्या गल्लीत एकट्यानं फ़िरण्याची. कोणीतरी खाईल, कोणीतरी मारेल. एकप्रकारचा जड, शापित डार्कनेस आहे वातवरणात. अशा वेळी झाडांच्या ढोल्या आणि घरांवर बसवलेल्या काचेच्या असंख्य खिडक्या, दोन्ही एकाच मुशीतून बनल्यासारख्या वाटू लागतात. भगीरथाचे हिमालयातून गंगा आणणारे हात आणि आनंदवनातले चादरी विणणारे हात आणि त्यावरच्या रेषाही, सारख्याच वाटू लागतात.. दूर डोंगरांमध्ये एक बासरीचा नाद घुमतो. धुपाचा सुगंध दरवळू लागतो. जन्मजन्मांतरीचे धागे पुन्हा जुळू लागतात. स्पेस अवकाश, काळ आणि कामाची सगळी बंधनं एकेक करत त्या बर्फ़ाळ टेकडीवरच्या बर्फाच्या गोळ्यांसारखीच वितळू लागतात. त्या सैनिकांच्या हातातल्या बंदुका आणि ते रेशमी डोळे. वाघिणीचे भेदक डोळे. जंगलात झाडीझाडीतून, सांदीकोपरयातून रोखलेले असंख्य डोळे. वृंदावनातल्या कृष्णराधेच्या मूर्तीचे डोळे, तिथल्याच विधवांचे डोळे. पांढरा बर्फ. पांढरी साडी. दोन्ही आतल्याआत गोठलेले. दोन्ही आत्मा नसलेली शरीरं घेऊन मुकाट स्तब्ध झालेले आणि तितक्याच मुकाटपणे वितळून जाणारे. त्या ताजचा पांढरा रंगही आता विरत चाललाय हळूहळू. आणि राजघाटावरची ती हे राम ही अक्षरं पुसट होत चालली आहेत. रानकुत्रे आणि सांबर. चारास एक या रेश्योनं जागोजागी दिसतात आणि विणकराचे हात मात्र रोज धाग्याधाग्यानं उसवतात. तरीही तो विणत राहातोच. कसा आणि का हेही एक धूसर कोडंच. बाबांच्या समाधीसमोर हात जोडले गेले आपोआपच. राजघाटावरच्या ज्योतीसमोर डोळे मिटले गेले आपोआपच आणि खाडकन उघडलेही गेले. गोळ्यांच्या त्रिवार जयघोषानं. तीन गोळ्या. त्या आवाजानं दचकून जाऊन उभा राहिलो मी अमर जवान ज्योतीसमोर. एक बंदूक आणि त्यावरची टोपी. पुन्हा एकदा एक कळ उठली आत कुठेतरी. खोलवर. आणि मग पुन्हा एकदा ट्रान्स. डोळे उघडले तेव्हा समोर धुरकट अंधार आणि कातरप्रकाश होता. परमहंसांची मूर्ती पाहात होती माझ्याकडे निरागस, हसरया कुतुहलानं. ते डोळे दिसले आणि आता लिहायला बसलोय. बाहेर पावसाची मंद रिपरिप सुरु आहे. पाणी वाहून जातंय, पुन्हा नवीन थेंब, नवीन पाणी, नवीन वाहणं. असंच अव्याहत सुरू आहे.

अक्षय संत