बदलत्या जगाच्या नायिका

युवा विवेक    11-Jul-2022
Total Views |


heroine

'सत्यमेव जयते'सारख्या आमिर खानच्या गाजलेल्या टी.व्ही. शोमध्ये महिला सक्षमीकरणावर आधारित एका भागात "मुझे क्या बेचेगा क्या रुपैय्या" हे सुंदर गीत आहे, ज्यामध्ये एक भारतीय स्त्री कौटुंबिक अत्याचारांना बळी पडण्याचा निश्चय करत ठणकावून सांगते की कोणत्याही पैशाच्या किंवा पुरुषी ताकदीला शरण जाता मी माझा मार्ग शोधत आयुष्यात पुढे जाणार आहे.

 

भारतीय महिलांच्या जीवनात काय बदल होत आहेत, हे सूचकपणे दर्शवणारे ते शब्द होते. हे स्थित्यंतर केवळ सामाजिक जीवनातच घडत नव्हते तर सिनेमात पण त्याचे प्रतिबिंब दिसत होते.

मोठ्या पडद्यावरची स्त्री प्रतिमा ही आजवर बहुतांश वेळा सोशिक - समंजस अशीच दाखवली गेली आहे. निरुपा रॉयने आयुष्यात निरुपाय असल्याप्रमाणे साकारलेल्या बेबस, बेसहारा मा किंवा अलका कुबलने साकारलेल्या 'माहेरची साडी, लेक चालली सासरला'मधल्या सुनांची परवड बघून बायाबापड्या आपले डोळे पुसत पदर ओले करत सिनेमे बघायच्या. 'दर दरकि ठोकरे खाना' जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते.

 

"हालतसे लढती हुई आणि समाजके घीनोने नजरोसे खुदको बचाती हुई अकेली औरत", सिनेमातील महिलांचे असेच चित्रण थोड्याफार फरकाने असते.

'राजा हरिश्चंद्र'पासून भारतीय सिनेमाचा जो प्रवास सुरू झाला तो आजवर अव्याहत चालू आहे. या प्रवासात आजवर एक गोष्ट समान राहिली ती म्हणजे 'राजा हरिश्चंद्रमधली तारामतीची परवड असो किंवा मीनाक्षी शेषाद्रीच्या दामिनीमधला एका स्त्रीचा न्याय मिळविण्यासाठीचा आटोकाट संघर्ष.

 

अपवाद म्हणून एखादे 'रझिया सुलताना' किंवा 'मदर इंडिया'सारखे खंबीर स्त्रीचे प्रवाहाबाहेरचे चित्रण असायचे. पण गेल्या काही वर्षात ह्या चित्रणात आश्वासक बदल झाला आहे.

निर्भया खटला, शक्ती मिल प्रकरण, डॉ.प्रियांका रेड्डी हत्याकांड यांसारख्या घटनांनी समाजजीवन ढवळून निघाले. जस्टीस फॉर आसिफा, मिटु सारख्या चळवळींनी सोशल मीडियावर वादळ निर्माण केले. या सर्वांचे प्रतिबिंबदेखील समकालीन सिनेमात उमटले असून सक्षम महिलांची एक सकारात्मक विचारधारा पुढे येत आहे.

 

श्रीदेवीने आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात केलेले चित्रपट बघा. 'मॉम' आणि 'इंग्लिश विंग्लिश'मधून तिने गृहिणीपणाची चौकटच जणू मोडली. इंग्लिश - विंग्लिशमध्ये एका प्रसंगात तिचा शिक्षक तिला उद्योजक असल्याची जाणीव करून देतो, तेव्हा तिच्या चालण्यात आलेला सूक्ष्म आत्मविश्वास प्रातिनिधिक स्वरूपात सांगावा असा आहे.

'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत'मधून दीपिकानेसुद्धा लढवय्या महिलांच्या व्यक्तिरेखा साकारल्या.

‘मेरी कॉम’, दंगल’, चक दे इंडिया’, अकिरासारख्या चित्रपटातून क्रीडाविश्वातील महिलांचे समर्थ चित्रण घडवण्यात आले. स्त्रिया खेळू शकतात किंवा त्याही पुढे जाऊन त्यांचे बायोपिक पुढच्या पिढीसाठी आदर्शवत ठरू शकतात, हा क्रांतीकारी म्हणावा असा बदल आहे.

 

'गल्ली बॉय’मध्ये 'मुराद'ची सफीना (इच्छेचा किनारा) झालेल्या आलियाने 'राझी'मध्ये स्वतःच्याच पतीच्या मृत्यूला कारणीभूत असलेली पाकिस्तानातील अंडरकव्हर एजंट साकारली.

‘नीरजा’, कहाणी’, मर्दानी’, क्वीन’, NH 10, लिपस्टीक अंडर माय बुरखा’, पार्चड’, तुम्हारी सुलू’, नाम शबाना’ या सगळ्या सिनेमांची कथानके महिला प्रधानच आहेत. 'मणिकर्णिका'च्या निमित्ताने पुन्हा एकदा झाशीची राणी मोठ्या पडद्यावर साकारली गेली.

'गुलाब गॅंग' आणि 'सांड की आंख'ची कथानके तर ग्रामीण भागातली, पण तिथेही हा महिला सबलीकरणाचा प्रवाह पोहोचल्याच दिसून येते. 'हसीना'सारख्या सिनेमात तर अंडरवर्ल्डवर सत्ता गाजवणेसुद्धा महिलांना अशक्य नाही, असा वेगळाच कथाविषय समोर आला.

 

पण केवळ 'बंदूक आणि खेळ' याभोवतीच ही कथानके फिरत आहेत, अशातला भाग नाही तर 'मिशन मंगल' आणि 'शकुंतलादेवी'मध्ये बौद्धिक क्षेत्रातली स्त्रियांची वाटचाल देखील सकारात्मकरित्या पडदयावर उतरवली जात असल्याचे दिसून आले आहे. पुरुषप्रधान समाजात पारंपरिक विचारांच्या चौकटी या सहजासहजी तुटत नसतात, त्या तेवढ्याच ताकदीने धडका देऊन मोडाव्या लागतात.

'नो वन किल्ड जेसिका' कथानक सत्यघटनेवर आधारित होते. एखाद्या स्त्रीची अब्रू स्वस्त नाही हे देशाच्या न्यायदान करणाऱ्या यंत्रणेसमोर त्या घटनेतून दिसून आले होते. हीच गोष्ट 'पिंक'मधून म्हणून अधोरेखित करण्यात आली. अमिताभच्याच डायलॉगमधून सांगायचे झाले, तर "जेव्हा एखादी स्त्री तुमच्या मागणीला 'नकार' देते. तेव्हा तो नकार एक पूर्ण वाक्यच असते. त्याला स्वतःचा अर्थ असतो, तिथे आणखी विस्ताराने सांगण्याची किंवा कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज उरत नाही."

 

ह्या छोट्या-मोठ्या संवादातून उमटणारा आश्वासक सूर प्रेरणादायी आहे. स्त्रीची व्यक्तिरेखा 'चिकनी चमेली' किंवा 'मुन्नी बदनाम' या आयटम सॉंगपुरती राहता त्यांच्या कक्षा विस्तारल्या जात आहे. तिची तुलना 'झंडू बाम' किंवा 'तंदुरी मुर्गी'सारख्या शेलक्या शब्दातून व्यक्त न समर्थ- स्वयंप्रज्ञ- स्वावलंबी व्यक्तीचित्रणातून साकार होत आहे, हे निश्चितच स्वागतार्ह आहे.

'थप्पड'मध्येसुद्धा विषय केवळ मारलेल्या एका चापटीपुरता मर्यादित राहत नाही, त्यालाही अनेक कंगोरे प्राप्त होतात. 'छपाक'चे कथानकसुद्धा सत्यघटनेवर आधारित आहे. ऍसिड हल्ल्यामधून वाचलेल्या स्त्रिया स्वतःहून नव्याने उभारी घेतात ही गोष्टही सुखावणारी आहे.

 

'चूल आणि मूल' ह्यात दडपलेला आक्रोश’ या चित्रपटांच्यानिमित्ताने बाहेर येत आहे. माजघरात दाबलेल्या हुंदक्यांना वाचा फुटत आहे. तर मनातली खदखद कथा स्वरूपात मोठ्या पडद्यावरही झळकते आहे.

-- सौरभ रत्नपारखी

(मोबाईल क्र.९८८१७८३४७४)