तीन दशकांचं शाहरुख पर्व

युवा विवेक    04-Jul-2022
Total Views |


shahrukh khan

२५ जून १९९२ ला शाहरुख खान, दिव्या भारती, ऋषी कपूर अभिनित 'दिवाना' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

सुश्राव्य गाणी आणि दिव्या भारतीचा निरागस चेहरा यांखेरीज हा सिनेमा लक्षात राहिला, कारण ह्याच सिनेमातून बॉलीवूडमध्ये 'शाहरुख पर्व' सुरू झालं.

या सिनेमाला नुकतीच ३० वर्षे पूर्ण झाली आणि पर्यायाने शाहरुखच्या कारकिर्दीने पण तिशी ओलांडली.

खरं तर शाहरुखचा चेहरा भारतीय प्रेक्षकांना त्यापूर्वीच परिचयाचा झाला होता. त्या काळी दूरदर्शनवर गाजलेल्या फौजी, सर्कस, वागले की दुनिया यांसारख्या मालिकांमधून शाहरुख प्रेक्षकांना ज्ञात होता. पण मोठ्या पडद्यावर आल्या

नंतर तो इतका मोठा पल्ला गाठेल ह्याची कदाचित त्याला स्वत:ला देखील कल्पना नसावी.

 

शाहरुखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा अमिताभ नावाचं दोन दशकं घोंगावणारं वादळ शांत झालं होत. व्हिडिओ पायरसी, अंडरवर्ल्ड, दूरदर्शनचा उदय, सुमार दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक, अनेक स्टारपुत्रांचं अपयश अशा वेगवेगळ्या कारणांनी हिंदी चित्रपसृष्टीत मरगळ आली होती. राज्य सरकारच्या चुकीच्या शासकीय धोरणांमुळे बॉलिवूडमध्ये नैराशाचे वातावरण होते. मिथुन चक्रवर्तीसारखा अभिनेता ह्या साऱ्यांना कंटाळून उटीला शिफ्ट झाला होता. शाहरुखने चित्रपटसृष्टीत पाय ठेवला, त्याच्या थोडीफार वर्षे आधीच आमिर खान, सलमान खानने पदार्पण केले होते. गोविंदाला विनोदपटांचा नवा फॉर्म्युला गवसला होता. अजय देवगण, अक्षयकुमार, सुनिल शेट्टी अशी अभिनेत्यांची नवी फळी तयार होत होती, तर गेल्या दशकात पाय रोवून असलेले अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, सनी देओल यांसारखे अभिनेते सातत्याने कमी - अधिक हिट सिनेमे देत आपला हक्काचा प्रेक्षकवर्ग टिकवून होते. राजकीय - धार्मिक ध्रुवीकरणाच्या त्या काळात उदारीकरणाचे वारे वाहू लागल्याने एक वेगळ्या विचारसरणीचा प्रेक्षकवर्ग उदयास आला होता, ज्याची नाळ जागतिककरणाशी जुळली होती.

शाहरुखने काळाची बदलती पाऊले ओळखत बदलत्या प्रेक्षकांची नाडी अचूक शोधली. एखाद्या कुशल व्यावसायिकाप्रमाणे असे काही सिनेमे केले की, निर्विवादपणे तो 'किंग ऑफ बॉलीवूड' म्हणून ओळखला जाऊ लागला.

शाहरुखच्या कारकीर्दीचा मागोवा घेतला तरी लक्षात येईल की, त्याच्या यशस्वी वाटचालीत त्याने वेळोवेळी केलेल्या बदलांचा किती मोठा वाटा आहे.

 

शाहरुखने सुरुवातीच्या काळात 'डर', 'अंजाम', 'बाझीगर', 'राम जाने' यांसारख्या सिनेमातून अँटीहिरो रंगवला. जो स्वत:च इप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही थरावर जाण्यास तयार होता.

आपल्याच नायिकेला उंच इमारतीवर भिरकावून देणारा 'बाझीगर'मधला नायक किंवा 'क क क क किरण' म्हणणारा 'डर'मधला विकृत 'प्रेमवीर' ही त्याची प्रातिनिधिक उदाहरणे सांगता येतील.

'राजू बन गया जंटलमन' किंवा 'येस बॉस'मध्ये वरिष्ठांच्या भल्याबुऱ्या निर्णयात हो ला हो म्हणत साथ देणारा आणि त्यातून आयुष्यात आपण यशस्वी होऊ ही महत्त्वाकांक्षा बाळगणारा नायकदेखील त्याने रंगवला. TRP मिळवण्यासाठी विविध शक्कल लढवणारा 'फिर भी दिल है हिंदुस्तानी'मधला टिव्ही पत्रकार अजय बक्षी हे त्याचेच एक रूप !!!

 

'चांद तारे तोड लाऊ' म्हणणाऱ्या पिढीला शाहरुखमध्ये स्वत:चे प्रतिबिंब दिसत होते.

जागतिकीकरणानंतर श्रीमंतीच्या कल्पना बदलू लागल्या होत्या. वाढत्या टिव्ही चॅनल्समुळे पाश्चिमात्य संस्कृती घराच्या उंबरठयाच्या आत पोहोचली होती. चंगळवाद वाईट न वाटता दैनंदिन गरजेचा वाटू लागला होता.

ग्लॉसी लाईफस्टाईल ही अप्राप्य न वाटता सहजसाध्य झाली होती. शाहरुखने 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'दिल तो पागल है', 'कुछ कुछ होता है', 'मोहब्बते', 'कल हो ना हो…' इत्यादी सिनेमांतून रंगवलेले चकचकीत दुनियेतले नायक नवश्रीमंत पिढीला आपलेसे वाटू लागले. हरितक्रांतीच्या अभूतपूर्व यशानंतर सत्तर - ऐंशीच्या दशकात परदेशात स्थायिक झालेला सधन NRI वर्ग डोळ्यांसमोर ठेवून चित्रपट निर्माण होऊ लागले.

सन २००० नंतरच्या काळात जसजशी बॉलिवूडची क्षितिजे विस्तारली तसतशी शाहरुखलासुद्धा ओव्हरसिझ मार्केट खुणावू लागलं. हॉलिवूडमध्ये जाऊन फुटकळ रोल करण्यापेक्षा पूर्वेकडील आशियाई राष्ट्र आणि आखाती राष्ट्रात लोकप्रियता मिळवून समांतर साम्राज्य तयार करण्यातच त्याने आपले हित असल्याचे ओळखले. त्याच्या

"अशोका'सारख्या सिनेमाचं पूर्वेकडील बौद्धराष्ट्रात चांगलं कौतुक झालं. तर 'हे राम', 'माय नेम इज खान', 'चक दे इंडिया', 'रईस' यांसारख्या सिनेमातून जगभरातील मुस्लिम समुदायाला आपलासा वाटेल असा नायक त्याने रंगवला.

 

'वीर झारा' आणि 'मैं हू ना' सारख्या चित्रपटातून भारत - पाक मैत्रीचा सुप्त संदेश देत शेजारी राष्ट्रात पण स्वत:चा प्रेक्षकवर्ग बळकट केला.

हे सगळ नियोजित व्यावसायिक दृष्टिकोनातून घडलं की योगायोगाने जुळून आलं हे सांगता येणं अवघड आहे; पण ह्यामुळेच शाहरुख हा निर्विवादपणे जगभरातील सिनेरसिकांसाठी 'किंग ऑफ बॉलिवूड' झाला ह्यात शंका नाही.

शाहरुखने केवळ मसालापट करत अभिनयाकडे दुर्लक्ष केलं, असं म्हणण्यास सुद्धा वाव ठेवला नाही.

त्याने 'डूप्लिकेट', 'बादशाह', 'ओम शांती ओम'मध्ये रंगवलेल्या भूमिका ह्या विनोदी अंगाच्या होत्या, तर दुसरीकडे अमोल पालेकरांच्या दिग्दर्शनाखाली केलेला 'पहेली' सारखा कलात्मक चित्रपट पण त्याने केला.

 

"स्वदेस" हा त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड म्हणावा, असा चित्रपट आहे. जनसामान्यांचे दु:ख - कारुण्य बघून राजपुत्र सिद्धार्थाने गौतम बुद्ध व्हावे, त्या प्रसंगाची आठवण करून देणारा चित्रपट म्हणजे 'स्वदेस..' शाहरुखने साकारलेल्या 'राज आणि राहुल' सारख्या चकाकत्या दुनियेतल्या नायकांच्या भाऊगर्दीत लक्षात राहणारा आश्वासक चेहरा म्हणजे मोहन भार्गव…!

गेली ३० वर्षे शाहरुखच्या यशाची कमान चढती राहिली आहे, पण गत ३/४ वर्षात तो चार्म कुठेतरी हरवलेला वाटतो आहे. त्याच्या, 'जब तक है जान', 'जब हॅरी मेट सेजल', 'फॅन', 'झिरो…' अशा चित्रपटांना अपेक्षित यश मिळालेले नाही.

आपण वयानुसार भूमिका करण्याची वेळ आली आहे, ह्याची बहुधा जाणीव झाल्याने तो दीर्घकाळ मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

 

आमिर, सलमानसह सातत्याने होणारी स्पर्धा, रणवीर - रणबीर सारखे पुढच्या फळीतले अभिनेते, मुलगा आर्यन खानचा नुकताच झालेला वाद, आयपीएलमधील कोलकता नाईटरायडर्स टीमचं व्यवस्थापन…. इत्यादी अनेक कारणांमुळे त्याने विश्रांती घेऊन ताज्या दमाने सुरुवात करणे, हा त्याच्यातल्या कुशल व्यावसायिकाचं दर्शन घडवणारा निर्णय आहे.

त्याचा आजवरचा प्रवास पाहता तो पुन्हा उसळी मारून परत मोठा पडदा गाजवेल, ह्यात शंका नाही कारण त्याच्याच शब्दात सांगायचं तर

"पिक्चर अभि बाकी है मेरे दोस्त…!"

- सौरभ रत्नपारखी