खाकरा

08 Jul 2022 11:27:04


khakra

हेल्दी स्नॅक्स या कॅटेगरीमध्ये मोडणारा, कुरकुरीत पण न तळलेला खाकरा न आवडणारी व्यक्ती सापडणं अवघड आहे. जैन, मारवाडी आणि गुजराती लोकांचा आवडता पदार्थ. कणिक/मटकीचे पीठ यांची अतिशय पातळ पोळी मंद आचेवर तव्यावर दाब देऊन भाजली जाते. यामुळे खाकरा अतिशय कुरकुरीत होतो, तेलात न तळता! मेक्सिकन नॅचोजपेक्षा खाकरामध्ये नक्कीच खूप व्हरायटी आहेत, कमी कॅलरीज आहेत. पापडासारख्या दिसणाऱ्या या पदार्थाबद्दल लेख लिहावा इतका फेमस हा पदार्थ आहे का? हा प्रश्न नक्कीच पडू शकतो. मग कधीतरी इंदूबेन खाकरावाला हे दुकान फिरून या. लगेच अहमदाबादला जाणं शक्य नसेल तर निदान वेबसाईट पाहा. गुगलवर सर्च केल्यास खाकऱ्याचे अक्षरशः शेकडो फ्लेवर्स मिळतील. पाणी-पुरी, नूडल्सपासून तर साध्या मसाला खाकरापर्यंत!

 

या पदार्थाचे गुपित आहे, भाजण्याच्या पद्धतीत आणि तापमानात! तसं पाहिल्यास साधे पीठ भिजवतो, तसे मसाले टाकून पीठ भिजवले जाते, थोडेफार तेल जास्त वापरावे लागते, पण नीट भाजणे ही कला आहे. तापमान कमीजास्त झाले, तर दशमी व्हायची किंवा अर्धवट कडक दशमी. असं म्हणतात की जास्तीच्या उरलेल्या चपात्या वाया जाऊ नये म्हणून त्यातील आर्द्रता कमी करण्यासाठी त्यांना भाजले गेले आणि खाकऱ्याचा जन्म झाला. डोसा खाकरा मी अहमदाबादला खाल्ला होता. चक्क डोस्यासारखा, पांढराशुभ्र, कुरकुरीत, जाळीदार, अतिशय पातळ खाकरा पॅक केलेला होता आणि काही महिने टिकू शकतो. मी पाहिलेला आतापर्यंतच्या खाकऱ्याच्या प्रकारातील अत्यंत वेगळा प्रयोग. आता तर चॉकलेट, व्हॅनिला असे आईस्क्रीमचे फ्लेवर्सही आले आहेत. हेच या पदार्थाचे वैशिष्ट्य आहे, कोणतेही फ्लेवर्स सहज अड्जस्ट करता येतात.

 

आता अमेझॉनवर, बिग बास्केटवर आणि किराणा दुकानातही सहज हा पदार्थ उपलब्ध आहे. पारंपरिक आकार गोल पापडासारखा असला तरी खाण्यासाठी सोयीचा म्हणून आयताकृती लहान खाकराही आता मिळतो. सगळं ऍटोमेटिक असल्याने चव, टेक्श्चरमध्ये सातत्य राखता येतं. तारक मेहता का उल्टा चष्मामधील जेठालाल या गुजराती पात्रामुळे घरोघरी हे नाव ओळखीचे झाले आहे. त्यातील सर्वच पात्रांनी आपापल्या खाद्यसंस्कृतीचे गोडवे गायले आहेत आणि इतरांनी चक्क त्याने मनापासून स्वागतही केले.

 

गुजरातमध्ये ही इंडस्ट्री अनेक महिला ग्रुप्स आणि बचत गटांनी चालवली आहे. गुजराती लोक तसे उद्योगीच असतात, दुपारच्या वेळी झोपण्यापेक्षा अनेक गृहिणी पापड, लोणची, कुरडया करतात तसे तिकडे खाकरा भाजत बसतात, कारण तसे हे पेशन्सचे काम आहे. आता हा पदार्थ भारतभर मिळतो. जगभर पसरलेल्या गुजराती लोकांनी अमेरिका, कॅनडामध्येही याला फेमस केलं आहे. कमी कॅलरीज आणि तरीही टेस्टी स्नॅक असं रेप्युटेशन त्याला आहे. त्यामुळे लहान मुलांपासून-सर्व वयोगटातील लोकांचा आवडता. तरीही मला वाटतं जसं नॅचोज वेगवेगळ्या प्रकारात मिळतात, तसा खाकराही मिळावा. नॅचोजवर थोडे चीज आणि गार्निशिंग करून स्टार्टर म्हणून सर्व्ह केले जाते, तर मग खाकरा का नको? इतका व्हर्सटाईल पदार्थ आहे हा की त्याचे अनेक प्रकार होऊ शकतील. भेळेत याचे तुकडे टाकले जातात, पण त्यापेक्षा जास्त पोटेंशिअल त्याला आहे. कोणीतरी मनावर घेतले तर हा साधाभोळा पदार्थ ग्लॅमरस होऊन फाईव्ह स्टारमधील प्लेटमध्ये सर्व्ह होऊ शकतो. टी-स्नॅक म्हणून प्रसिद्ध होऊ शकतो आणि क्रॅकरची जागा पटकावू शकतो. छानशा डिझाइनर प्लेटमध्ये डीप, चटणी आहे आणि सगळे परदेशी लोक खाकऱ्याचे तुकडे त्यात बुडवून खात आहेत, गप्पा मारत आहेत हे माझं या पदार्थासाठीचं मिनी स्वप्न आहे.

- सावनी

Powered By Sangraha 9.0