इंडीपॉप … एक युगांत

युवा विवेक    01-Aug-2022   
Total Views |


indipop

'भारत म्हणजे विविधतेतून एकता' हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य लहानपणापासून ऐकलं असेल. पण ही एकता ज्यांनी टिकवून ठेवली त्यात फक्त महापुरुषच नव्हे, तर इतर अनेक घटक जबाबदार आहेत. कधी मनमोहन देसाईंच्या 'अमर अकबर अँथनी'ची कथा असो किंवा भारतीय क्रिकेट संघाचे पाच विविध धर्माचे कर्णधार, या छोट्या छोट्या गोष्टी समाजावर खुप सकारात्मक परिणाम करतात. 'इंडिपॉप' हे सुद्धा त्याचेच एक प्रतिक आहे.

 

नव्वदच्या (90's) दशकात उदारीकरणाचे, जागतिकीकरणाचे वारे वाहत असतानाच दुसरीकडे बाबरी, बॉम्बस्फोट, दंगली इत्यादी कारणांनी देश धुमसत होता. देशात एकात्मता कायम रहावी म्हणून दूरदर्शनने स्वतः पुढाकार घेत "मिले सूर मेरा तुम्हारा" , "प्यार की गंगा बहे, देशमें एका रहे”, "देश राग" सारख्या कलाकृती सादर केल्या. दरम्यान आय टी सेक्टरमुळे भारतीयांच्या हातात पैसा खेळू लागला होता. राहणीमान सुधारले होते. क्षितिजे विस्तारली होती. आपल्या भारतीय असण्याचा अभिमान बाळगण्याचा काळ आला होता म्हणून आलिशा चिनॉयच्या आवाजात सारा देश म्हणू लागला, "मेरा दिल चाहे बस मेड इन इंडिया",

 

रेहमानने कट्टरतावाद्याना दाद न देता लावलेला "वंदे मातरम"चा उच्च स्वर! लकी अलीने गायलेल्या अनजानी राहोमे तू क्या ढुंढता फिरे"ने अनेक भरकटलेल्या युवकांना मुळ पदावर आणले. पाकिस्तानात देखील त्याचवेळी "सैयोनी"मुळे बदलाचे वारे वाहू लागल्याचे जाणवत होते. बाबा सहगलने तर इंडिपॉपला ऍनिमेशनची जोड देत "हकुना मटाटा" म्हणत वेगळाच फ्युजन स्वर लावला. गोव्याच्या भूमीत रेमो फर्नांडीसने 'ओ मेरी मुन्नी' म्हणत सर्वांना ठेका धरायला लावला. हिमाचलच्या गिरीकुंदरातून 'पिया बसंती रे' ऐकू येत होतं.

 

बंगालच्या शुभा मुदगल ह्यांनी 'रंगीलो म्हारो ढोलना' म्हणत प्रांताच्या सीमा ओलांडत होत्या.

हरिहरन-लेसली लुईस मराठी नसून 'ओहो काय झालं' म्हणत जल्लोष करीत होते. पलाश सेनचा युफोरिया 'कैसे भुलेगी मेरा नाम' म्हणत बंगाली लग्नात हिंदी गाण म्हणत होता. सिल्क रूटचं 'डुबा डुबा रहता हू' प्रवासातल्या प्रत्येक रूटवर वाजत होतं.

 

दलेर मेहंदीच 'बोलो तारारारा' किंवा सुखबीरच 'तारे गिन गिन' वाजल्याशिवाय डान्स पार्टी पुर्ण होत नव्हती. फाल्गुनी पाठकच्या 'ओढणी ओढो ओढो' गीताशिवाय दांडिया नाईट रंगत नव्हती.

ईला अरुण आणि सपना अवस्थीच्या गाण्यातले राजस्थानी 'घागरो जो घुम्यो' कोण विसरेल.

अल्ताफ राजाची कितीही खिल्ली उडवा पण 'तुम तो ठहरे परदेसी' न ऐकलेला संगीत रसिक पडणार नाही.

 

त्या पॉप अल्बममधल्या गीत - संगीताबद्दल लिहिताना एक घटक मात्र कायम दुर्लक्षिला गेला तो म्हणजे त्यातली छोटी छोटी कथानकं! आज शॉर्टफिल्म काढण्याची जी क्रेझ आली आहे, त्याची पाळंमुळं किंवा त्यावरचा प्रभाव निश्चितच त्या काळामुळे आहे !

 

आठवा पलाश सेनच्या 'गली' अल्बमची नायिका (विद्या बालन) ! घरात लगिनघाई सुरू असते. सुरुवातीच्या इन्ट्रोमध्ये ती सांगते की 'तिला तो बंगाली गायक आवडायचा पण कधी प्रेम व्यक्त करू शकला नाही.' नंतर सुरू होते "कभी आना तु मेरी गली' गाण्याची सुरावट ! नंतर लग्नात ऐनवेळेस मुलाकडची मंडळी काहीतरी विघ्न आणत, लग्न मोडल जात असल्याचे दिसताच आपला नायक पुढाकार घेतो आणि वरमाला पडते ती पलाश सेनच्या गळ्यात.

अतिशय छोटं कथानक पण गाण्याच्या जोडीने संस्मरणीय केलं.

 

अलिशा चिनॉयच्या 'मेड इन इंडिया' गाण्यातल्या राजकन्येसाठी येणारे देश-विदेशातले एकेक स्थळ नंतर सर्वात शेवटी येणारा देखणा मिलिंद सोमण ! आज इतक्या वर्षांनी सुद्धा तसाच आकर्षक वाटतो. आर्यन्सच्या 'देखा है तेरी आंखोको' गाण्यात आपल्या आवडत्या कस्टमर मुलीच्या प्रेमात पडून तिच्या ओठांचे ठसे असलेले सारे ग्लास लॉकरमध्ये साचवून ठेवणारा कॉफीशॉपमधला मुलगा आठवतो का?

'गोरी तेरी आंखे कहे' ह्या लकी अलीच्या आवाजातील सुंदर गाण्यात नवऱ्याच्या मृत्यूनंतर शोकाकुल झालेल्या त्याच्या बायकोचं चित्रणही चटका लावुन जायचं.

 

'चंदा की डोली' मध्ये आपल्या चिमुरडीला अंगाई ऐकवणारा सोनू निगम !

पलाश सेनच्याच 'माईरी' गाण्यात रेल्वेच्या डब्यात दरवाजाजवळ उभी असणारी रिमी सेन!

कैलाश खेरच्या 'तौबा तौबा वे' गाण्यात असलेली एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रेमींची शृंखला ! अदनान सामीच्या प्रत्येक नव्या अल्बम मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कथांच्या वेगवेगळ्या नायिका.!

 

शानच्या 'तनहा दिल' मध्ये दिवंगत म्युजिक टीचरच्या हातात असलेला 'Rose expired, Come soon' चा संदेश ! ही सर्व कथानके छोटीशी होती. पण आज शिखरावर असणाऱ्या फरहान अख्तर सारख्या अनेक दिग्दर्शकांची कारकीर्द येथूनच सुरू झाली होती. हळूहळू इंडिपॉपची क्रेझ ओसरली. एकदम शिखरावर असतानाच अचानक ओहोटी लागली. कैलाश खेरचा ''तेरी दिवानी' अल्बम माझ्या मते या युगाचा शेवटचा शिलेदार होता. आज हनी सिंग, बादशाह वैगेरे मंडळी जे म्हणतात त्याला इंडिपॉप म्हणणं जीवावर येत.

 

जुनुन, अग्नी, बँड ऑफ बॉईज, मित ब्रदर्स, कोलोनियल कसीन वैगेरे सर्व काळाच्या ओघात नामशेष झाले आहेत. आज जेव्हाही इंडिपॉप ऐकायचा मूड होतो तेव्हा यु ट्यूबच्या जंजाळात ते व्हिडीओ आवर्जुन बघतो.पण एक सांगता येत नाही की, नेमकं काय गमावलं आहे आपण !!!

अस वाटत की 'मंझिल नही है अंजाना है कारवा" म्हणत आपणच फार काही मागे सोडून काळासोबत पुढे निघून आलो आहोत. मग शानने गायलेलं 'तनहा दिल तनहा सफर' मोबाईलवर लावून इंडिपॉपच्या जुन्या आठवणीत मन रममाण होते.

MISS YOU INDIPOP ! COME SOON !

- सौरभ रत्नपारखी