‘ब्लॉग’ नावाचं नवमाध्यम

12 Aug 2022 10:51:44

blog
मोबाईलवर सतत काही ना काही खरडणं हे नित्याचच झालं आहे. मग तो व्हॉट्सअप मेसेज असो वा इन्स्टावरचं पोस्टिंग-चॅटिंग असो किंवा ट्विटरवरचं अल्पाक्षरी मतप्रकटन असो. हल्ली आपण सगळेचजण काही ना काही, कुठे ना कुठे लिहित असतोच. मग ते अभ्यासाशी संबंधित असो वा विचार मांडणं असो. काहींना लेखनाची शैली अवगत असते तर काही आपले पोथीपंडितासारखे पाठ करून लिहितात, तर काही नुसतंच ‘मम’ म्हणत किंवा सहमतीचा अंगठा दाखवून पोस्ट शेअर करतात. लेखनाच्या क्षेत्रात कित्येक वर्षं मुद्रित माध्यमं हा एकच प्रकार अस्तित्वात होता. त्यामुळे आपण काही लिहिलं तरी कुठे छापलं जाईल, कसं छापलं जाईल. दैनंदिन वृत्तपत्रं, त्यांच्या साप्ताहिक पुरवण्या, नियतकालिकं, जर्नल्स, विषयानुषंगिक प्रकाशित होणारी नियतकालिकं असे काही ठराविकच पर्याय उपलब्ध होते. ते वाचकांपर्यंत पोहोचेल का, हा ही एक प्रश्न असायचाच. पण काळ बदलला तसे पर्यायही वाढत गेले आणि ब्लॉगलेखनाचा एक मोठा प्लॅटफॉर्म लेखकांसाठी उपलब्ध झाला.
 
 
तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळे शोध लागले त्यातलाच एक शोध म्हणजे ब्लॉगिंगचा प्लॅटफॉर्म. आपला अभ्यासाचा, आवडीचा विषय संगणकीकृत लेखनाच्या स्वरुपात इंटरनेटच्या माध्यमातून ऑलनाईन पद्धतीने थेट वाचकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे ब्लॉगिंग. इंटरनेटवर तसंच विविध संदर्भग्रंथांच्या माध्यमातून मिळणारी माहिती ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ब्लॉगर्स करत असतात. लेखस्वरुपात ही माहिती आपण निवडलेल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाद्वारे वाचकांना मिळते. विशेष म्हणजे या करिता लिहिणारी व्यक्ती ही सिद्धहस्त लेखक, नामवंत लेखक किंवा कोणी प्रसिद्ध व्यक्ती असण्याची गरज नाही. तुमच्या-आमच्यासारखे अनेकजण स्वयंस्फूर्तीने ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करू शकतात.
 
 
ब्लॉगर्ससाठी आज मोफत आणि पैसे भरून अशा दोन्ही प्रकारे जगभरात वेगवेगळे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. www.blogger.com www.wordpress.com www.tumblr.com www.linkedin.com www.medium.com अशा वेगवेगळ्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण ब्लॉग लिहू शकतो. तथ्याधारित माहिती, योग्य शीर्षक, उपशीर्षकं व्याकरणिक दृष्टीने अचूक असा मजकूर, वाचकांना आकर्षित करणारी आणि मजकुराला शोभणारी शैली, उपयुक्त आणि माहितीपूरक फोटो या सर्व घटकांचा अंतर्भाव करून आपण वाचनीय ब्लॉग लिहू शकतो. साधारणतः ब्लॉगर्सचं दोन प्रकारे विभाजन करता येतं. 
१. वैयक्तिक लेखन करणारे
२. व्यावसायिक दृष्टीने लेखन करणारे.
 
 
काही जणांना केवळ स्वतःचं मत प्रकट करायचं असतं, विचार मांडायचे असतात, वाचकांना माहिती द्यायची असते वा कथा, कविता आदी ललित साहित्य प्रकाशित करायचं असतं. हे ब्लॉगर्स म्हणजे वैयक्तिक स्वरुपात लेखन करणारे. दुसरे असतात अर्थार्जनाच्या दृष्टीने लेखन करणारे. स्वतःच्या व्यवसायवृद्धीसाठी, अन्य व्यावसायिकांच्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी, डिजिटल मार्केटिंगसाठी लेखन करणारे हे ब्लॉगर्स असतात. फॅशन, हेल्थ अँड वेलनेस, मनोरंजन, कोचिंग(प्रशिक्षण), टुरिझम, पर्यावरण हे ब्लॉगिंगमधले सर्वाधिक लेखन केले जाणारे विषय आहेत. खाद्यपदार्थांपासून ते पर्यटनापर्यंत, वस्त्रप्रावरणांपासून स्थानिक लोककलांपर्यंत आणि गणितापासून ते तंत्रज्ञानापर्यंत, राजकारणापासून संरक्षणव्यवस्थेपर्यंत अनेक विषयांवर ब्लॉगर्स वेळोवेळी लिहित असतात. काहीजण इंग्रजीत उपलब्ध मजकूर भाषांतर करून मातृभाषेत शेअर करतात. तुम्ही नियमितपणे वेगवेगळ्या वेबसाईट्सना भेट देत असाल, तर लक्षात येईल की, अनेक वेबसाईट्सवर ब्लॉगलेखनाच्या माध्यमातून विचार मांडण्यासह आपल्या उत्पादनाचीही जाहिरात करण्यात येते. उदाहरणार्थ, सौंदर्य प्रसाधनं विकणाऱ्या कंपनीच्या ब्लॉगवर त्यांच्या उत्पादनातील घटकांची उपयुक्तता मांडणारे लेख असतात किंवा आरोग्यविषयक उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीच्या ब्लॉगवर त्या उत्पादनाची आणि त्यापासून मिळालेल्या फायद्याची मांडणी केलेली असते. अनेक फ्रीलान्सर्स आपल्या लेखनकौशल्याचा वापर या ब्लॉगिंगच्या माध्यमातून करून घेत अर्थार्जन करतात.
 
 
कित्येक वर्षं ब्लॉगिंग ही इंग्लिशमध्ये लेखन करू शकणाऱ्यांची आणि वाचन करू शकणाऱ्यांची मक्तेदारी होती. पण मागील काही वर्षांत हा मोर्चा रिजनल कंटेंटकडे म्हणजेच स्थानिक/परिसर/मातृभाषेत लेखन करण्याकडे वळला आहे. मुळात ब्लॉगच्या माध्यमातून स्वतंत्र लेखन करणारे हे विचारांनीही स्वतंत्र असतात. ते त्यांना हवा तशा पद्धतीने(विवेक बाळगून) लेखन करू शकतात आणि मोफत प्लॅटफॉर्मवर ते प्रकाशित करू शकतात. अनेकदा वृत्तपत्रांतून छापून न येणारा मजकूर, जो संदर्भ म्हणून महत्त्वाचा असू शकतो तो आपल्याला ब्लॉगवर मिळतो. अनेकदा ब्लॉगिंगच्या माध्यमातून केवळ गंमत म्हणून सुरू झालेला प्रवास हा मुद्रित पुस्तकाकडे वा थेट व्यवसायाकडेही वळतो, हे ही आपण पाहिले आहे. एका सुप्रसिद्ध मराठी ब्लॉग लेखिकेच्या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रप्रावरणांवरील लेखनाची परिणिती आज स्वतंत्र स्टुडिओ निर्माण होण्यात झाली आहे. तर काहींच्या लेखकांनी थेट पुस्तकांपर्यंत मजल मारली आहे. अनेक लेखक आपला प्राथमिक लेखनाचा सराव हा ब्लॉगिंगपासूनच करतात. एकाचवेळी अनेक जणांनी मेन्टेन केलेला पण विशिष्ट विषयाला वाहिलेला ब्लॉग हा समुहमनाचं वैचारिक पोषण करण्यात यशस्वी होतो. नीट शोधलं तर इतिहास विषयाशी संबंधित मराठीतले काही ब्लॉग संदर्भग्रंथांपर्यंत जाऊन पोहोचलेले दिसतात.
 
 
ब्लॉगिंगमध्ये सर्वात पहिलं आव्हान असतं ते वाचकांना आपल्याकडे वळवण्याचं. कारण मुद्रित अंक थेट तुमच्या हातात येऊन पोहोचतो. पण ऑनलाईन कंटेंट हा वाचकापर्यंत नेण्याचं आव्हान लेखकापुढे असतं. तसंच त्या ब्लॉगवरील व्हिजिटर्स वाढवण्याचंही काम त्याला करायचं असतं. अशा वेळी मागील लेखांच्या बॅक लिंक देणं आणि आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर सातत्यानं या ब्लॉगबद्दल लिहिणं, त्यातला निवडक भाग तिथे देऊन वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणं आवश्यक असतं. यामुळे आपल्या ब्लॉगवरील ट्रॅफिक वाढण्यास मदत होते. विशेष म्हणजे यात सोशल मीडियाच्या लिंक्स, युट्यूब व्हिडिओच्या लिंक्सही शेअर करता येतात आणि तेथील वाचक-व्ह्युअर्सही वाढवता येतात.
 
 
ज्यांना लिहिता येतं पण माध्यम उपलब्ध नाही, अशांसाठी ब्लॉग हे एक उत्तम माध्यम आहे. लेखनाचा सराव करणं, वैचारिक बैठक तयार करणं, आपल्याला ज्ञात माहिती वाचकांना पुरवणं, शब्दमर्याचेचं बंधन नसल्याने विस्तृत लिहिणं, सोशल मिडियाचा वापर करून आपला वाचकवर्ग तयार करणं अशा अनेक गोष्टी नवोदित करू शकतात. गरज आहे ती पहिलं पाऊल टाकण्याची.
- मृदुला राजवाडे
Powered By Sangraha 9.0